Coconut Processing : करवंटी, झावळांपासून शोभीवंत, गृहोपयोगी वस्तू

Coconut Products : कलाकौशल्यातून नारळाचे व्यावसायिक मूल्यवर्धन
Coconut Processing
Coconut ProcessingAgrowon

एकनाथ पवार

Coconut : भोगवे (जि. सिंधुदुर्ग) येथील राजाराम प्रभू यांनी नारळाच्या विविध भागांपासून कलात्मक, गृहोपयोगी वस्तू निर्मितीचे कौशल्य आत्मसात करून नारळाचे मूल्यवर्धन साधले आहे. सुमारे ५० हून अधिक प्रकारच्या वस्तू तयार करून व्यवसायाला चालना देत आर्थिक उलाढाल वाढवली आहे. कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीतून त्याला मोठा आधार मिळाला आहे.

नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. जगातील प्रमुख नारळ उत्पादक देशांचा समावेश असलेल्या ‘एशियन ॲण्ड पॅसिफिक कोकोनेट कम्युनिटी’ या संघटनेने (एपीसीसी) ने २००९ मध्ये दोन सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. त्या माध्यमातून जागतिक नारळ शेती व उद्योगाचे महत्त्व व विस्तार वाढीस अजून चालना मिळाली. भारत हा देखील नारळ उत्पादक देश असून कोकणातील शेतकऱ्यांचे ते अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक आहे. धार्मिक कार्यापासून रोजच्या जेवणापासून ते झावळ्या, करवंटी, सोडणे आदींचाही विविध कामांसाठी वापर होतो. सिंधुदुर्ग जिल्हयात सुमारे १८ हजार १८१ हेक्टरवर नारळ असून आंबा, काजू नंतर जिल्ह्यातील ते मुख्य व्यावसायिक पीक आहे.

प्रभू यांची शेती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे गाव समुद्री बीचमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. देश- परदेशातील असंख्य पर्यटक येथे येत असतात. पूर्वी गावात भात हे मुख्य पीक होते.
मात्र आता नारळ, आंबा, काजू आदी व्यावसायिक पिकांवर ग्रामस्थांनी अधिक भर दिला आहे.
गावापासून कोंड व पुढे करवतवाडी येथे राजाराम प्रभू यांची शेतीवाडी आहे. शेतीतील त्यांचा वीस वर्षांचा अनुभव आहे. नारळाची सुमारे १२०, सुपारी ५०० ,आंबा ५५, काजू ६० याशिवाय कोकम व मिरी आदी मसाला पिकांची लागवड आहे.

कलेतून साकारले मूल्यवर्धन

लहानपणी गुरे राखण्यासाठी प्रभू जायचे. अंगभूत कला कौशल्य, सर्जनशीलता व नवे काही करण्याची आस असलेले प्रभू माळरानावरील गवत, झाडांची मुळे यापासून काहीतरी कलाकृती वा वस्तू बनविण्याचा प्रयत्न करायचे. विहीर खोदताना त्यांना एक दगड आढळला. त्यापासून आकर्षक पुतळा तयार केला. जंगलात फिरताना एकदा कुंबया वनस्पतीचे सुकलेले मोठ्या आकाराचे मूळ दिसले. त्यापासून ‘ॲनाकोंडा’ अजगराची प्रतिकृती तयार केली. ती खूप आकर्षक झाली होती. पण त्याचे मूळ कुजल्याने ती फार दिवस टिकू शकली नाही. पण इथेच प्रभू यांच्या कलाकारीला अधिक चालना मिळाली. बागेतील नारळांच्या विक्रीतून उत्पन्न मिळायचे. पण त्याच्या झावळ्या, करवंट्या, सोडणी
आदी वाया जाणाऱ्या बाबींचे मूल्यवर्धन करून त्यापासून गृहोपयोगी वस्तू तयार करण्याचा छंद त्यांना जडला. त्यातून एकेक करीत आजमितीला पन्नासहून अधिक प्रकारच्या वस्तूंचा जन्म झाला आहे.

Coconut Processing
Maharashtra GI Rating : महाराष्ट्राचा GI मानांकनात पहिला नंबर, वस्तू उत्पादकांना चांगला फायदा

प्रभू यांची मूल्यवर्धित उत्पादने (झावळ्या, करवंटी, सोडणे आदींपासून)

-समई, पेन स्टॅन्ड, चहाचा कप, घरटे, कंदील, टोपी, वाइन ग्लास, बाउल, चमचे, राखी, फुलदाणी.
- झावळांपासून आंबा बॉक्स (एक ते दोन डझन क्षमता). त्याचे वरचे आवरण सुपारीच्या पोयीपासून तयार केले.
-झावळ्यांपासून आंबा करंडी देखील. त्यात दोन- तीन डझन आंबे सहज राहतात. पर्यावरणपूरक व दिसायला अतिशय सुंदर असल्याने देशी- परदेशी पर्यटकांना ती भुरळ घालते आहे.
-बदक, वाघ, पोपट, घुबड, उंदीर यांच्या प्रतिकृती, वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे उदा. वाघ- सिंह मुखवटे, प्रभू यांचे कृषी पर्यटन केंद्र आहे. तेथील उंच जागेत (मचाणावर) पर्यटकांच्या बसण्याच्या जागी ते ठेवले जातात.

Coconut Processing
DBT Scheme : डीबीटी टाळण्यासाठी कृषी खात्याची शक्कल; स्वयं उत्पादित वस्तू ‘एसएओ’ खरेदी करणार

-झावळ्यांपासून आकर्षक हिरव्या रंगाची टोपी. जिच्या प्रेमात परदेशी पर्यटक पडले आहेत.
-वस्तूंच्या किमती प्रकार व गुणवत्तेनुसार ५० रुपयांपासून ते एकहजारांपर्यंत.
-पर्यटन केंद्रात येणारे ग्राहक वस्तू खरेदी करतात. स्थानिक ठिकाणीही विक्री होते.
दिवाळी, सुट्टी व उन्हाळी सुट्टी हे मुख्य हंगाम असतात. हा काळ पकडला तर एक लाखांपर्यंत उलाढाल वस्तू विक्रीतून होते.
-मुख्य म्हणजे कोणत्याही यंत्रांचा आधार न घेता केवळ हस्तकौशल्यातून वस्तू तयार केल्या आहेत.
-तारकर्ली येथील एका व्यावसायिकाकडे प्रभू यांच्या वस्तू विक्रीसाठी होत्या. एका पर्यटकांकडून
माशांच्या प्रतिकृतीची मागणी झाली. मात्र तशी तयार केलेली नव्हती. मात्र हे आव्हान स्वीकारून
नारळाच्या झावळ्यांपासून तशी प्रतिकृती बनवण्यात प्रभू यशस्वी झाले. एका परदेशी पर्यटकाला ती पसंत पडून त्याने चांगली किमतीही दिली.

कृषी पर्यटन

प्रभू यांनी घरच्या नारळ, सुपारी, आंबा,काजू यांच्या बागेचा पुरेपूर वापर करीत शेती व कलाकृती निर्मिती व्यवसायाला दोन वर्षांपूर्वी कृषी पर्यटनाची जोड दिली आहे. भोगवे बीचला हजारो पर्यटक येत असतात. त्यापैकी पर्यटकांना आपल्या पर्यटन केंद्राकडे वळविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रभू यांच्या बागेची भौगोलिक नैसर्गिक रचना अतिशय सुंदर आहे. बागेतून छोटासा नाला वाहतो. तेथे साकव उभारला आहे. नारळाच्या झाडांच्या सावलीखाली ‘इको फ्रेंडली स्टेज’ (मचाण) उभारले आहे. पर्यटक बागेत फिरतात, कोकणातील निसर्ग वैभवाचा मनमुराद आनंद लुटतात. चहा, नाष्टा व जेवण करतात. राहण्यासाठी ‘एसी’ व ‘नॉनएसी’ खोल्यांची व्यवस्था केली आहे. परदेशी पर्यटकही येत
आहेत. या केंद्रापासून समुद्र बीच पायी केवळ दहा मिनीटांवर आहे.

प्रभू यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

-सर्व फळबागांमधून एकूण सहा ते सात लाखांची वार्षिक उलाढाल.
-नारळाची आठ ते नऊ वर्षे वयाची झाडे दर दोन महिन्यांनी ७० ते ८० नारळ देतात.
प्रति ८ रुपयांपासून ते १५ रुपये त्यास दर मिळतो. कुडाळ ही त्यासाठी बाजारपेठ.
-पर्यटन केंद्रातच आंबा विक्री होते. काजू बी वर प्रकिया करून काजूगरही विक्रीसाठी बागेत ठेवले जातात. कोकम सोलचीही अशीच विक्री होते.


राजाराम प्रभू- ८५५४०४५३१७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com