Chana Processing Industry : उसाच्या पट्ट्यात युवकाचा हरभराडाळ निर्मिती उद्योग

Rural Entrepreneurship : कोल्हापूर जिल्‍ह्यातील नेज-शिवपुरी (ता हातकणंगले) येथील सौरभ नेर्ले या युवकाने कुटुंबातील सदस्यांच्या निर्मितीतून उसाच्या पट्ट्यात हरभराडाळ निर्मिती उद्योगातून रोजगार निर्मितीची वेगळी वाट शोधली आहे.
Chana Processing Industry
Chana Processing Industry Agrowon
Published on
Updated on

Rural Food Industry : कोल्हापूर जिल्‍ह्यात हातकणंगले तालुक्यातील नेज- शिवपुरी येथे नेर्ले कुटुंब राहते. त्यांची सात एकर शेती आहे. ऊस, सोयाबीन, शाळू आदी पिके ते घेतात. त्यांचे हातकणंगले येथे कापड दुकानही आहे. कुटुंबातील नव्या पिढीतील सौरभ यांनी ‘मेकॅनिकल’ विषयात पदविका संपादन केली आहे. नोकरीपेक्षा एखादा व्यवसाय करावा व तोही शेतीशी संबंधित असावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे वडील शिक्षक असून, काका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून शाखा अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत.

वडील व काका यांचे मार्गदर्शन घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून नवे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातूनच डाळ मिलची कल्पना पुढे आली. खरं तर परिसरात फारशा कुठे डाळमिल नव्हत्या. त्यामुळे ही एक प्रकारची संधी देखील होती. काकांनी तर सेवानिवृत्ती नंतर मिळालेली रक्कमही या व्यवसायासाठी गुंतवण्याचे ठरवले. सौरभ यांनीही काही डाळ मिल उद्योगांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली.

नगर जिल्ह्यातील एका उद्योगात दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वमालकीच्या जागेत शेड उभारून २०२१ च्या दरम्यान उद्योगाला प्रारंभ केला. खरे तर कोल्हापूर भागात हरभरा अर्थात कच्चा माल मिळण्याची शक्यता कमी होती.

त्यामुळे दूरच्या अंतरावरून म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधून हरभरा उत्पादक व व्‍यापारी यांच्याकडून तो घेण्यात आला काही कालावधीनंतर सांगली जिल्ह्यातील आष्टा, पलूस, तासगाव आदी तालुक्यांमध्‍ये तो चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. त्यातून वाहतूक खर्चही कमी झाला. जानेवारी ते एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून तो घेण्यात येतो.

Chana Processing Industry
Food Processing Success Story: १० हजारांपासून १० लाखांपर्यंत! विजयमाला देशमुख यांचा उद्योग प्रवासाचा यशोगाथा

...अशी होते प्रक्रिया

प्रक्रियेसाठी आवश्‍यक ती सर्व यंत्रसामग्री घेतली आहे. प्रक्रिया अवस्थेत हरभरा सुरुवातीला डिस्टोनरमधून जातो. यात दगड, काडी- कचरा वेगळा केला जातो. त्यानंतर क्लीनरमधून त्याची अजून एकदा स्वछता होते. त्यातून उत्तम प्रतीचा हरभरा मिळण्यास मदत होते. त्यानंतर पाणी व बॉयलरच्‍या माध्यमातून तापवण्याची प्रक्रिया होते. रोलरमधून गेल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचे डाळीत रूपांतर होते. सुमारे दोन टनांची प्रक्रिया पूर्ण होऊन डाळ तयार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो.

सॉर्टेक्स यंत्राच्या साह्याने आकारमानानुसार डाळीचे वर्गीकरण होते. पाच किलो तसेच तीस किलोमध्ये पॅकिंग होते. घरच्या व्यक्तीसह तीन कामगार उद्योगात कार्यरत असतात. पॉलीश व विनापॉलीश अशा दोन्ही पद्धतीने डाळ उपलब्ध होते. हरभरा कळण्याचीही विक्री केली जाते. मुख्यत्वे पशुखाद्य म्हणून त्यास शेतकऱ्यांकडून मागणी असते. वर्षभरात सुमारे १२५ टन हरभऱ्यावर प्रक्रिया होते. सहा महिन्यांपूर्वी बेसन मिलही आणली आहे. त्याद्वारेही हरभऱ्याचे मूल्यवर्धन केले आहे.

विक्री व्यवस्था

सौरभ यांच्याकडे हरभरा खरेदी- विक्री, शेतकरी, व्यापारी संपर्क ते डाळ निर्मितीपर्यंत सर्व जबाबदारी आहे. काका देखील या सर्व प्रक्रियेत सहभागी असतात. सौरभ यांचे बंधू देवदत्त पीठ विक्रीची जबाबदारी सांभाळतात. श्री गणेश डाळ मिल असे उद्योगाचे नामकरण केले आहे. तर किचन क्वीन हा डाळीचा ब्रॅण्ड तयार केला आहे.

डाळीची विक्री ७२ ते ७५ रुपये प्रति किलो दराने तर कळण्याची विक्री २५ रुपये प्रति किलो दराचे होते. डाळीला वर्षभर मागणी असली तरी श्रावणानंतर व दिवाळीच्या कालावधीत मोठी मागणी असते. कोल्हापूर मार्केट यार्ड, जयसिंगपूर, सांगली, आष्टा बाजारपेठ किंवा पन्नास किलोमीटर परिसरातील किराणा माल व्यापाऱ्यांना पुरवठा होतो. स्थानिक ठिकाणीच दर्जेदार डाळ बनत असल्याने परिसरातील गावांतील दुकानदार याबरोबर घरगुती ग्राहकही तयार झाले आहे.

Chana Processing Industry
Women Food Processing Business: महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी

अनेक ग्राहक युनिटमध्ये येऊन खरेदी करतात. पिठाची विक्री ८० ते ८५ रुपये प्रति किलो दराने होते. वर्षाला सुमारे चाळीस ते पन्नास लाखांची उलाढाल करण्यापर्यंत उद्योगाचा विस्तार झाला आहे. पुढील कालावधीत महिन्याला वीस ते पंचवीस टन हरभऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. सौरभ सांगतात की अन्य उद्योगांच्या तुलनेत नफा कमी राहात असला वर्षभर मागणी असल्याने व त्यामुळे प्रक्रिया सुरु राहिल्याने आर्थिक डोलारा सांभाळला जातो.

शेडसह सर्व यांत्रिक सेटअपसाठी आत्तापर्यंत साठ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात कुटुंबाकडील रक्कम तसेच कर्ज स्वरूपात आर्थिक तजवीज केली आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गतही अनुदानासाठी अर्ज केला आहे. कोल्हापूर जिल्हा किंवा हातकणंगले परिसरात ऊस हे मुख्य पीक असतानाही नेर्ले कुटुंबीयांनी डाळ मिल प्रकल्प उभारून वेगळी वाट शोधली ही उल्लेखनीय बाब आहे. आम्‍ही येथील कृषी महाविद्यालयाच्या साह्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करतो आहोत. उसाला हरभऱ्याचा बेवड चांगला असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कलही दिसतो आहे अशी प्रतिक्रिया कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील विस्तार केंद्राच्या हातकणंगले विभागाचे कृषी साहायक बाबूराव आवळे यांनी दिली आहे.

सौरभ नेर्ले ८८८८०६२७१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com