Flower Farming : फुलांच्या शेतीतून अकोळनेरला मिळाली ओळख

नगर जिल्ह्यातील अकोळनेरची ओळख फूल उत्पादकांचे गाव म्हणून सर्वदूर झाली आहे. साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सुरू झालेली फुलशेतीची परंपरा आजही जोपासण्यात येत आहे. सिंचनाचा अभाव असूनही पाण्याच्या सुविधा व काटेकोर नियोजनातून शेवंती, गुलाब, जरबेरा, झेंडू, गलांडा आदी फुलांची विविधता शेतकऱ्यांनी जपली आहे. राज्यासह परराज्यातील बाजारपेठ व बारमाही शेतीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon

जिल्हा नगर व याच तालुक्यातील अकोळनेर, भोरवाडी, रायतळे या गावांचा परिसर तसा दुष्काळी (Drought). भागाला शाश्‍वत पाणी (Sustainable Water) नाही. बहुतांश शेती पावसावरच अवलंबून असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत अकोळनेर गावाने फूलशेतीत (Flower Farmer) वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमारे साठ ते सत्तर वर्षांपूर्वी येथे फुलांचे उत्पादन (Flower Production) घ्यायला सुरुवात झाली. येथील नामदेव शेळके व हनुमंत शेळके यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत अर्ध्या एकरात शेवंतीची लागवड केली. आर्थिकदृष्ट्या ही फुलशेती किफायतशीर वाटू लागल्यानंतर हळूहळू गावातील शेतकरी त्याकडे वळू लागले.

Flower Farming
Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

फुलशेतीचे नियोजन

अकोळनेर व परिसरात सुमारे सव्वाशे ते दीडशे एकर परिसरात फुलशेती होत असावी. गावातील सुमारे ७० टक्के शेतकरी या शेतीत गुंतले आहेत. प्रति शेतकरी क्षेत्र अर्धा एकरापासून ते तीन एकरांपर्यंत आहे. सर्वाधिक शेवंतीची लागवड होते. याशिवाय गुलाब, झेंडू, ऑर्किड, ॲस्टर, गलांडा आणि पॉलिहाउसमध्ये जरबेरा अशी विविधता दिसून येते. मार्गशीर्ष महिन्यासह श्रावण, गणेश उत्सव, नवरात्र- दसरा, दिवाळी व अन्य सण- उत्सव व लग्नसमारंभ अशी वर्षभर असलेली मागणी लक्षात घेतली जाते. त्यादृष्टीने लागवडीचे नियोजन केले जाते. अकोळनेरच्या फुलशेतीचा आदर्श परिसरातील भोरवाडी, कामरगाव, सुपा, चास, भाळवणी, गोरेगाव आदी गावांनीही घेतला. तेथेही फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

पाणी नियोजन

साधारण वीस वर्षांपासून गावातील शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. अशा वेळी शेतकरी हार न मानता टॅंकरच्या पाण्यावर फुलशेती जगवतात. टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून एक लाख लिटर क्षमतेच्या सिमेंट टाक्या बांधल्या आहेत. पन्नास ते साठ शेतकऱ्यांकडे शेततळी दिसून येतात.

Flower Farming
Artificial Flower : प्लॅस्टिक फुले विक्रीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादासमोर

रोजगारनिर्मिती

एकेकाळी अकोळनेर भागातील लोक मजुरीसाठी अन्यत्र जात. आता मात्र याच गावाने शंभराहून अधिक मजुरांना रोजगार दिला आहे. वर्षभरातील बहुतांश कालावधीसाठी भागातील मजुरांना लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे काम मिळते. तीनशे रुपये प्रति दिन हजेरी दिली जाते. मजुरीची उलाढालही कोटींच्या घरात असावी.

Flower Farming
Flower Market : फूल उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

राज्याबाहेर बाजारपेठ

नगर येथील बाजार समितीत फुलांचे मोठे मार्केट आहे. मात्र अकोळनेरमध्ये उत्पादित फुलांपैकी साधारण वीस टक्के फुलांची तेथे विक्री होते. उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबई, कल्याण, पुणे, नागपूर, बडोदा, हैदराबाद, इंदूर आदी भागांत फुले पाठवली जातात. अकोळनेरला रेल्वे थांबा आहे. दक्षिण व उत्तर भागात येथूनच रेल्वे जातात. तीस वर्षांपूर्वी येथून मुंबईला जाणारी रेल्वे होती.

त्याद्वारे फुले पाठवली जायची. आता वैयक्तिक वाहने, ट्रॅव्हल बसेसमधून फुले पाठवण्यात येतात. थेट खरेदीदारांशी संपर्क होत झाल्याने देशाच्या कोणत्याही भागात फुले पाठवणे सोपे झाले आहे. दरांबाबत उदाहरण द्यायचे तर शेवंती, झेंडू आदी फुलांना किलोला १० रुपयांपासून ते ७०, १०० व क्वचित १५० रुपयांपर्यंत दर मिळतात. जरबेराच्या १० फुलांच्या व गुलाबाच्या २० फुलांच्या गड्डीला १० रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत दर मिळतो.

आर्थिक समृद्धीला हातभार

दुष्काळी अकोळनेरमधील शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावण्यात फुलशेतीचा महत्त्वाचा वाटा आहे. दरवर्षी विविध फुलांचे मिळून काही टन उत्पादन होते. गावातील युवा शेतकरी सागर विलासराव शेळके सुमारे सात वर्षांपासून या शेतीत आहेत. त्यांची दोन एकर फुलशेती व रोपवाटिका देखील आहे.

ते म्हणाले, की या शेतीतून ५० ते ६० हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळवणारे देखील शेतकरी आहेत. आर्थिक सक्षमता त्यातून आली आहे. बहुतांश शेतकरी लागवडीपासून काढणीपर्यंत, विक्रीसह अनेक बाबींमध्ये ‘एकमेकां साह्य करू’ या भूमिकेतूनच काम करतात. समस्यांवर चर्चा करतात. एकमेकांचे मार्गदर्शन घेतात. नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. अकोळनेर भागातील फुलशेतीला त्याचा मोठा फटका बसला. तोडणीला आलेल्या फुलांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र खचून न जाता धैर्याने मार्ग काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

संत दासगणूचे जन्मस्थळ

अकोळनेर गावाच्या अन्य काही ओळखीही सांगता येतात. महिपती संत, कवी दासगणू महाराज यांचे जन्मगाव हेच आहे. दासगणू महाराज यांना संत साईबाबा यांचा सहवास लाभला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या गाजलेल्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण याच गावात झाले असल्याने ते चर्चेत आले होते.

आमच्या आजोबांनी सुरुवातीला फुलशेती केली. त्यानंतर गावांतील अनेक शेतकरी त्याकडे वळले. अनेक तरुण शेतकऱ्यांनी फुलशेतीला प्राधान्य दिले आहे. मी रोपवाटिकाही सुरू केली आहे. गावाला आर्थिक सक्षमता देण्यामध्ये फुलशेतीचा महत्त्वाचा वाटा आहे.
सागर विलासराव शेळके ९६०४४४००५५
आम्ही अनेक वर्षांपासून फुलांचे उत्पादन घेतो. पॉलिहाउस उभारून जरबेरा फुलांची लागवड केली आहे. दुष्काळी अकोळनेरला फुलशेतीमुळे वेगळी ओळख मिळण्यास मदत झाली.
रघुनाथ शेळके- ९८५०६०४७९७
गावातील शेतकरी आणि त्यातही तरुणवर्गाला लागवडीपासून ते ‘मार्केटिंग’पर्यंत फुलशेती अवगत झाली आहे. त्यामुळेच फुलशेतीत आमचे गाव यशस्वी झाले असल्याचा अभिमान वाटतो.
प्रतीक शेळके, सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com