Farmers Katta : ‘रेसिड्यू फ्री’ मालाला बाजारपेठ देणारा ‘फार्मर्स कट्टा’

अकोला जिल्ह्यातील शेतकरी गटाद्वारे एकत्र आले. बाजारपेठ व अर्थकारण विस्तारण्यासाठी त्याचे सातपुडा नॅचरल्स फार्मर प्रोड्यूसर’ कंपनीत रूपांतर झाले. अकोला शहरात ‘सातपुडा नॅचरल’ ब्रॅंडने फार्मर्स कट्टा, अर्थात दोन विक्री केंद्रे सुरू केली. ‘रेसिड्यू फ्री’ मालाचे उद्दिष्ट ठेवून ताजा भाजीपाला- फळे, जात्यावरील डाळी, ‘कोल्डप्रेस’ तेल, प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ देत उलाढाल वाढवण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.
Residue Free Product
Residue Free ProductAgrowon

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सातपुडा नॅचरल्स शेतकरी गट (Farmers Group) तयार केला. मात्र अर्थकारण व कार्यविस्तार साधण्यासाठी शेतकरी कंपनी (Farmer Company) स्थापण्याची गरज होती. त्यातून गटाच्याच नावे कंपनीत रूपांतर झाले. नोव्हेंबर २०२१ मध्ये नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले. दहा संचालक व २५० सभासद आहेत. अकोलापासून नजीकच्या गावातील रूपेश नामदेवराव लडे कंपनीचे अध्यक्ष आहेत.

खरे तर २०१९ मध्ये गटाने कोरोना काळात अकोला शहरातील ग्राहकांना ‘जिजाऊ बास्केट’ नावाने थेट भाजीपाला- फळे पुरवण्यापासून (Vegetable Supply) सुरुवात केली. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांनी संपूर्ण सहकार्य केले. या वेळी २३ लाखांची उलाढाल करण्यात यश मिळाले. कंपनीची सुरुवात करण्यासाठी हीच प्रेरणा व आत्मविश्‍वास मिळाला.

Residue Free Product
Residue Free : बाजार व्यवस्था रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबल होणार

शहरांमध्ये दोन ‘आउटलेट्‍स’

आज ‘सातपुडा’ने अकोला शहरात ‘सातपुडा नॅचरल’ ब्रॅण्डने ‘फार्मर्स कट्टा’, अर्थात दोन विक्री केंद्रे उभारली आहेत. ग्राहकांकडून रसायन अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) अन्नाची मागणी होत आहे. त्यादृष्टीने विविध धान्ये, फळे व भाजीपाला व प्रक्रियायुक्त पदार्थ तेथे उपलब्ध केले आहेत.

जिल्ह्यातील आठ ते दहा गावांतील शेतकरी कंपनीला माल पुरवत आहेत. त्यामुळे मध्यस्थांची दलाली कमी होते. दरांचा फायदा होतो. शिवाय ग्राहकांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण धान्य मिळते.

अकोला येथे शेतकरी कंपनीचे हे पहिलेच ‘आउटलेट’ आहे. कंपनीने १३ जणांना रोजगार दिला आहे. दोन ठिकाणी गोदाम आहेत. येथे अन्नधान्य स्वच्छता, वाळवणीचे काम करण्यासाठी महिला, तरुण कार्यरत आहेत.

Residue Free Product
Residue Free Agriculture : विषमुक्त शेती हेच हवे लक्ष्य

कंपनीची विविध उत्पादने

‘कोल्डप्रेस’ तेलाला मागणी

कंपनीने लाकडी तेलघाणीवर बनवलेल्या (कोल्डप्रेस) तेलांची निर्मिती सुरू केली आहे. त्यसाठी ‘फार्मर्स कट्टा’ केंद्रावर युनिट बसवण्यात आले आहे. शेंगदाणा, तीळ, नारळ, जवस, मोहरी, करडई, सूर्यफूल, बदाम आदी तेलांचे उत्पादन घेण्यात येते.

काही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या समोरच उत्पादन करून देण्यात येते. त्यामुळे शुद्धतेबाबत कुठल्या अडचणी येत नाहीत. महिन्याला शेंगदाणा तेलाची १५ क्विंटलपेक्षा अधिक, तर करडईच्या पाच- सात क्विंटल तेलाची व महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांच्या तेलाची विक्री होते. सुरत व अहमदाबाद येथेही तेल जाते.

जात्यांवरील डाळी

खेडोपाडी आजही जात्यांवर डाळी तयार केल्या जातात. त्यांना विशिष्ट चव असते. शहरी ग्राहकांना या डाळी मिळाव्यात म्हणून कंपनीने या शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांची थेट विक्री सुरू केली आहे.

यातील मारोती तूरडाळीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार झाली आहे. तसेच बन्सी, खपली, सोनामोती या गहू वाणांची विक्री होते. व्यापारीदेखील येथून खरेदी करतात.

गूळ, हळद विक्री

जिल्ह्यात ऊस लागवड कमी आहे. मात्र अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात गुऱ्हाळे आहेत. कंपनीने या भागासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणलेल्या गुळाची मागील वर्षभरात २५० क्विंटलपर्यंत विक्री केली.

राज्यात प्रसिद्ध वायगाव हळदीलाही अकोले शहरात ग्राहक तयार झाले असून, वर्षभरात ५० क्विंटलपर्यंत विक्री झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होते. वर्षभरात एकूण सुमारे ४० लाखांपर्यंत उलाढाल झाली आहे. आकर्षक पॅकिंगमधून मिरची पावडर देखील उपलब्ध केली आहे.

भरडधान्ये

यंदाचे वर्ष (२०२३) भरडधान्य वर्ष आहे. त्यादृष्टीने ज्वारी, बाजरी यांच्यासह नाचणी, भादली, भगर, राळा, कोदो, कुटकी आदी मालही विक्रीस उपलब्ध केला आहे. त्यासाठी नंदूरबार. प्रकाशा आदी भागांतील शेतकऱ्यांकडून माल घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबतही त्यासाठी करार करण्यात आला आहे.

निर्यातीत उतरणार

‘रेसिड्यू फ्री’ अन्नधान्य उत्पादनातील संधी पाहता कंपनी येत्या काळात निर्यातीत उतरण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांनाही त्या प्रकारच्या उत्पादनाकडे वळविण्यात येत आहे. अन्य कंपन्यांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळाही घेण्यात आली.

प्रमाणीकरण

कंपनीने सेंद्रिय शेतीमालाचे तृतीय पक्ष प्रमाणीकरण (थर्ड पार्टी) करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण कंपनीच्या काही सभासदांनी घेतले आहे. आपला माल रासायनिक अवशेषमुक्त असावा यासाठी प्रयोगशाळांमधून नमुन्यांची तपासणी देखील करून घेतली आहे.

रूपेश नामदेवराव लडे

‘अध्यक्ष’, ‘सातपुडा नॅचरल’

९८२२७७२२७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com