अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कागदी लिंबाच्या बागा (Lemon Orchard) आढळतात. तज्ज्ञांच्या मते हे क्षेत्र जिल्ह्यात एकूण २२२५ हेक्टरपर्यंत असावे. अकोला कृषी विज्ञान केंद्रामार्फत (Akola KVK) (केव्हीके) सन २०११ पासून लिंबाचा हस्त बहर (Lemon Hast Bahar) नियमित करणे व त्याची तंत्र प्रात्यक्षिके राबवली जात आहेत. यात कृषी विभागाच्या आत्मा विभागाचाही समावेश आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले हे तंत्रज्ञान आहे. अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतकरी त्याद्वारे हस्त बहर घेऊन फायदा घेऊ लागले आहेत.
...असे आहे हस्त बहर तंत्र
कागदी लिंबात तीनही बहर घेण्याकडे कल असतो. साधारण आंबिया ६० टक्के, मृग ३० टक्के तर हस्त बहर १० टक्के असे प्रमाण असते. मृग आणि आंबिया बहराच्या तुलनेत हस्त बहरासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी झाडांत काही बदल (बहर चक्र) घडवून आणावे लागतात.
१) सवय लावणे
एखाद्या बहराची सवय झाडाला लागली की त्यानुसार त्याचे चक्र व फळधारणा सुरू राहते. ती बदलून हस्त बहरातील फलोत्पादन घेण्याची सवय झाडाला लावली जाते. झाडावर मृग बहराची फुले जूनच्या दरम्यान उमलतात. ती टाळण्यासाठी मे आणि जूनमध्ये हलके ओलित नियमित सुरू ठेवावे लागते. त्यामुळे फुले न येता नवती निघते.
२) वाढ नियंत्रक व विद्राव्य खतांचा वापर
हस्त बहर येण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत शाकीय वाढ थांबवून विश्रांती देणे गरजेचे असते. त्यामुळे पानांत आणि फांद्यात अन्नद्रव्यांचा (कर्ब/नत्र) संचय होतो. त्यादृष्टीने क्लोरमेक्वाट क्लोराइड या वाढ नियंत्रकाच्या विशेषतः काळ्या मातीत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दोन फवारण्या सुचविण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये पोटॅशिअम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणीचा सल्ला दिला आहे.
३) सिंचन
बऱ्याच वेळेस सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस निघून जातो. यामुळे बागायतदार ओलित सुरू करतात. त्यापेक्षा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ओलित सुरू करावे असे या तंत्रात सांगण्यात येते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ओलिताच्या आधी प्रति झाड ३०० ग्रॅम नत्र अधिक ३०० ग्रॅम स्फुरद अधिक ३०० ग्रॅम पालाशची शिफारस केली आहे. उर्वरित अर्धा नत्र (३०० ग्रॅम प्रति झाड) फळधारणा झाल्यावर एक महिन्याने नोव्हेंबरमध्ये द्यावयाचा आहे.
४) फळांची प्रत सुधारणे
हस्त बहराची फळे उन्हाळ्यात काढणीस येतात. अन्य बहरांच्या तुलनेत ती आकाराने लहान असतात. त्यांचा आकार आणि चकाकी वाढण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर या काळात प्रति १०० लिटर पाण्यात ५०० ग्रॅम झिंक सल्फेट, ५०० ग्रॅम फेरस सल्फेट व ४०० ग्रॅम चुन्याच्या निवळीचे मिश्रण करून फवारण्याचा सल्ला दिला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एक महिना अंतराने दोन फवारण्या अपेक्षित आहेत.
५) गवताचे आच्छादन
उन्हाळ्यात अचानक वाढणाऱ्या तापमानामुळे आणि जमिनीतील कमी ओलाव्यामुळे फळागळ होते. फळांची प्रत बिघडते. त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झाडाचा वाफा वाळलेल्या गवताचा पाच सेंटिमीटर जाडीचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे गळ थांबेल. जमिनीत ओलावा टिकून राहील आणि जमिनीतील तापमान संतुलित राहील. हस्त बहराची फळे मार्च-एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काढणीस येतात. पक्व झालेली पिवळी फळे खुंटीने काढावी. प्रतवारी करून ती बाजारपेठेत पाठवावी.
फायदा देणारा बहर
लिंबाच्या प्रति १५ किलो वजनाच्या कट्ट्यास आंबिया बहरात २५० ते ४०० रुपये , मृग बहरात ६० ते ७५ रुपये तर हस्त बहरात ५००, ६०० ते कमाल ८०० रुपयांपर्यंत दर मिळतो. यावरून हस्त बहराचा फायदा लक्षात येतो. केव्हीकेच्या निरीक्षणानुसार एकरी १०० झाडे धरली व सहा वर्षे वा त्यापुढील वय धरल्यास प्रति झाड ६० ते ७० किलोपर्यंत उत्पादन देऊ शकतो. या हिशेबाने एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळू शकते. या तंत्राच्या वापरातून जिल्ह्यातील अनेक लिंबू उत्पादक एकरी एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न घेऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांचे अनुभव
माझी लिंबाची दोन एकर बाग आहे. पूर्वी मृग, आंबिया आणि हस्त असे तीनही बहर घेत होतो. मृग आणि आंबिया बहरापासून उत्पन्न फार कमी असायचे. बाजारात उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी असायची. परंतु आमचा नेमका हस्त बहर कमी फुटायचा. केव्हीकेने राबविलेल्या प्रात्यक्षिकामधून तंत्र अभ्यासता आले. आता त्यात कुशल होत आहोत. खर्च कमी होऊन ६ ते ७ कट्टे प्रति झाड उत्पादनापर्यंत मजल मारली आहे. दरही चांगला मिळाला.
विनोद क्षीरसागर, विवरा, ता. पातूर
९९७०३५७४५६
लिंबाचा हस्त बहर मार्चपासून सुरू होतो. तंत्रातील बाबींचा अवलंब केल्याचा फायदा होऊ लागला आहे. सहा वर्षांपुढील झाडे असून, प्रति झाड चार ते पाच कट्टे फळे मिळतात. सुमारे ५० ते ६० किलोपर्यंत त्यांचे वजन मिळते. एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
-संतोष खिरोडकार, डोंगरगाव
९६३७३५१११०
हस्त बहराच्या नियोजनात सुरुवातीला एक ते दोन वर्षे क्लोरमेक्वाट क्लोराइड वा वाझ नियंत्रकाची फवारणी घेतली. त्यानंतरच्या वर्षांत झाडांना हस्त बहराची सवय लागली आहे. प्रति झाड चार ते सहा कट्टे फळे मिळतात. ५०० ते ८०० रुपयांपर्यंत प्रति कट्टा दराने विक्री होते. यंदा दोन एकरांत लागवडीचे नियोजन केले आहे. यापुढे फक्त हस्त बहरावर लक्ष केंद्रित करणार आहे.
देविदास धोत्रे, विवरा, ता. पातूर
अकोला जिल्ह्यात लिंबू पिकाखाली अधिक क्षेत्र असून, एकूण फळपिकात हे पीक तिसऱ्या स्थानावर आहे. अन्य बहरांच्या तुलनेत लिंबाचा हस्त बहर अधिक फायदेशीर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता (उद्यानविद्या) डॉ. प्रकाश नागरे, फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशांक भराड, शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांनी आम्ही घेत असलेल्या प्रात्यक्षिक प्लॉटना भेटी देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याच फायदा आता दिसत आहे.
गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), केव्हीके, अकोला ८२७५४१२०६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.