Farmer Producer Company : दोन मित्रांची शेतकरी कंपनी करतेय सहा कोटींची उलाढाल

Success Story : नोकरी करणाऱ्या उच्चशिक्षितापासून १८ जणांना नोकरी देणाऱ्या उद्योजकापर्यंतचा त्यांचा हा प्रवास प्रेरणादायक आहे. अल्प भांडवलातून उभारलेल्या या कंपनीने आज वार्षिक सहा कोटी रुपये उलाढालीचा पल्ला गाठला आहे.
Farmer Producer Company
Farmer Producer CompanyAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : धानाचे किंवा भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील दुर्गम अशा सिंधपुरी (ता. तुमसर) येथील रहिवासी असलेले पवन कटनकार व रवी रहांगडाले हे दोघेही उच्चशिक्षित. प्राथमिक शिक्षण गावस्तरावर पार पडल्यानंतर त्यांनी अनुक्रमे केमिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

पवन यांचे वडील शिक्षक, तर रवी यांचे वडील शेतकरी असून लहानपणीची मैत्री पुढेही कायम राहिली. इंजिनिअरिंगनंतर दोघांनी दोन वर्षे दोन वेगवेगळ्या कंपन्यांत कामही केले. स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग उभारणीचे स्वप्न दोघांनी मिळूनच पाहिले.

२०१५ मध्ये स्वप्नपूर्ती नावाने दुग्ध व्यवसायाला सुरुवातही केली. पण २०१६ मध्ये रवी यांना दुबई येथे नोकरीची संधी मिळाली. ही संधी घेतली, पण स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये रवी यांनी परत येण्याचा निर्णय घेतला.

...अशी झाली सुरुवात

२०१५ मध्ये तीन लाखांमध्ये चार गाई विकत घेत ‘स्वप्नपूर्ती’ या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू वाढवत जर्सी आणि एचएफ जातीच्या गायींची संख्या शंभरावर पोहोचली. उत्पादित होणारे ३०० ते ३५० लिटर दूध ‘तुमसर मिल्क’ या संकलन केंद्राला पुरवले जाई.

मात्र परदेशी गाई अधिक दूध उत्पादन देत असल्या तरी त्यांची निगा व काळजी प्रचंड घ्यावी. त्यातच काही जनावरे अचानक दगावल्याने ते जागे झाले. गोपालनातील अन्य पर्यायांचा शोध सुरू केला. सुनील मानसिंहका यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथील देशी गोवंश पालन आणि त्यांच्या उपउत्पादनाविषयी माहिती मिळाली. तिथे दोघांनी आळीपाळीने दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले.

Farmer Producer Company
Agriculture Success Story : एकीच्या बळावर पाटील बंधूंची नेत्रदीपक भरारी ; ५ एकरांपासून ८० एकरांपर्यंतचा प्रवास

देशी गोपालन, उत्पादनांवर भर

सुरुवातीला विदर्भात उपलब्ध पाच गवळाऊ गाई देवलापार संशोधन केंद्रातून मोफत मिळाल्या. त्यानंतरच्या टप्प्यात गीर सात आणि साहिवाल पाच या गोवंशाची प्रति गाय ४५ हजार रुपये या प्रमाणे खरेदी करण्यात आली.

आज स्वप्नपूर्ती फार्ममध्ये ५४ देशी गाईंचा सांभाळ होतो. समूहातील सदस्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे ३५ गाई दिलेल्या आहेत. अन्य शेतकऱ्यांच्या देशी गाईचे शेणखत ५० पैसे व गांडूळ खत सहा रुपये प्रति किलो या प्रमाणे विकत घेतले जाते.

या सर्वांचे पॅकिंग स्वप्नपूर्ती या ब्रॅण्ड खाली विकले जाते. त्यासाठी सिंधपुरी येथे तीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर अडीच एकर जागा घेतली आहे. येथे २०० मे. टन क्षमतेचे गोदाम, भात, गहू, हरभरा क्‍लिनिंग ग्रेडिंग युनिट, गांडूळ खत प्रकल्प व इतर उत्पादने निर्मितीची व्यवस्था व उत्तम असे कार्यालयही उभारले आहे.

शेतकरी कंपनीची केली उभारणी

गांडूळ खत, गोमूत्र व अन्य उत्पादनाची विक्री विविध कृषी प्रदर्शनातून करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या विविध संस्था आणि कृषी विभागाकडून स्वयंसाह्यता समूह किंवा शेतकरी उत्पादन कंपनींना प्राधान्य मिळते. हे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांनाही जोडून घेत स्वप्नपूर्ती शेतकरी दुग्ध उत्पादक समूहाची बांधणी केली.

व्यवसाय वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेवर काम करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून मिळाला. त्यानुसार २०२१ मध्ये तुमसर ऑइल प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्यात आली. संचालक मंडळात लोकेश कटनकार, अक्षय शेंडे, राकेश शिंगाडे, महेंद्र गिरडकर, शशिकुमार तोरणकर अशा दहा जणांचा समावेश आहे. कंपनीचे ७५३ भागधारक असून, प्रति शेअर एक हजार रुपये याप्रमाणे भांडवल गोळा केले आहे.

भातामध्ये यांत्रिकीकरणाला चालना ः

परिसरातील बहुतेक शेतकरी भात उत्पादक असून, भागत लागवडीसाठी मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याची समस्या लक्षात आली. भात रोपांची रोवणीची साडेचार लाख रुपयांची दोन संयंत्रे विकत घेतली. सामान्यतः मजुरांद्वारे भात लागवडीसाठी एकरी

२५०० रुपयांपर्यंत खर्च होतो. यंत्राद्वारे रोवणीचा एकरी दर १५०० रुपये आकारला जातो. हंगामात १०० एकरांपर्यंत यंत्राद्वारे रोवणी होते. भात बियांची पेरणी करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पातून सुपर सीडर हे यंत्र साडेचार लाख रुपये खर्चून खरेदी केले आहे.

हे यंत्र रोटाव्हेटरने जमिनीचे सपाटीकरण व नंतर पेरणीचेही काम एकाच वेळी केले जात असल्याने पवन यांनी सांगितले. त्याच प्रमाणे वीस लाख रुपये किमतीची राइस मिलची यंत्रणा बसवून झाली असून, पुढील खरिपानंतर ती कार्यान्वित होईल. या सर्व उभारणीसाठी आजवरचा नफा आणि बॅंकेकडून कर्जाऊ एक कोटी रुपये वापरण्यात आले आहेत.

Farmer Producer Company
Agriculture Success Story : बारमाही उत्पन्न देणाऱ्या शेतीत मिळविली हातोटी

तेल उद्योगासाठी घेणार पुढाकार

परिसरातील अनेक शेतकरी रब्बीमध्ये जवस आणि मोहरी ही पिके घेतात. त्यांच्या उत्पादन खरेदी करून तेल निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. सध्या तीस टन जवस आणि पाच टन मोहरी खरेदी केली असून, त्यावर अन्य घाण्यातून तेल काढून घेतले जात आहे. या तेलाची विक्री ‘स्वप्नपूर्ती ब्रॅण्ड’ खाली करत आहेत.

नोकरी करणारे नाही, तर देणारे बना!

उच्चशिक्षित असलेल्या पवन किंवा रवी यांना चांगली नोकरीही मिळालेली होती. पण स्वतःचा उद्योग उभारण्याचे ध्येय ठेवत त्यांनी नोकरी करणारे नाही, तर देणारे बनण्याचा ध्यास घेतला. कारण त्यांच्या गाव परिसरातील धानपट्ट्यामध्ये केवळ हंगामी रोजगार उपलब्ध होतो. परिसरातील मजुरांना कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. अशा स्थितीमध्ये दोघा मित्रांनी उभारलेल्या या कंपनीमुळे १८ व्यक्‍तींना वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे.

...अशी आहेत उत्पादने

अ) गोवंशावर आधारित उत्पादने ः

भूसुधारक खत (५ आणि ५० किलो पॅकिंग), दर - १०५० रुपये प्रति ५० किलो

गांडूळ खत (१, ५, २५ किलो), दर - दहा रुपये प्रति किलो

फ्लोअर क्‍लिनर दर - ७० रुपये प्रति लिटर

दंत्त मंजन ४० ग्रॅम बाटली- २४ रुपये, धूपबत्ती दर - १५ रुपये प्रति पाकीट, अगरबत्ती दर - १०० ते २०० रुपये प्रति किलो, डिशवॉश दर - ३५ रुपये प्रति २०० मिली.

ब) जैविक उत्पादने ः सहा महिन्यांपूर्वीच परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत ५ लाख रुपये खर्चून जैविक निविष्ठा केंद्राची उभारणीही केली आहे. त्यामध्ये उत्पादित ट्रायकोडर्माचा दर २०० व ४०० रुपये प्रति लिटर, ह्युमिक ॲसिड व इतर जैवखते दर ५० रुपये प्रति लिटर.

सहा कोटींची उलाढाल

नागपूरला कंपनीने छोटे दुकान भाडेतत्त्वावर घेतले आहे. तिथे दोन कर्मचारी नियुक्‍त केले आहे. त्यांच्या माध्यमातून ऑर्डर घेत ग्राहकांना पुरवठा केला जातो. ॲमेझॉनवर देखील कंपनीची उत्पादने उपलब्ध केलेली आहेत. अशा सर्व प्रयत्नांतून कंपनीने अल्पावधीतच वार्षिक सहा कोटी रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठला आहे.

पवन कटनकार, ७७६९९९५१४७

रवी रहांगडाले, ९६२३८०२९६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com