Indian Agriculture : ‘गंगामाई’च्या शिवारात नावीन्यपूर्ण, प्रयोगशील शेतीची बीजे

औरंगाबाद येथील ज्येष्ठ व आघाडीचे उद्योजक पद्माकरराव हरिभाऊ मुळे यांच्या मार्गदर्शनातून व नेतृत्वातून ‘गंगामाई कृषी उद्योग’उभारला आणि विकसितही पावला. यशस्वी, प्रयोगशील व नव्या दृष्टिकोनाने युक्त शेतीची बीजे या उद्योगाने मराठवाड्यासह राज्याच्या मातीत पेरली आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

कृषी व अन्य क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले व कंपनी समूहाचा वेगळा ठसा उमटवलेले व अभियंता असलेले पद्माकरराव मुळे यांची यशोगाथा सर्वांसाठी आदर्शदायी व प्रेरणादायी अशीच आहे. त्यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्‍यातील बाणखेल.साधारणतः: १९५६ ला गावावरून औरंगाबाद हे मराठवाड्याच्या राजधानीचे शहर गाठणाऱ्या पद्माकररावांचा प्रवास एका पुस्तकाच्या दुकानापासून सुरू झाला.

शेतकरी कुटुंबात (Farmer Family) जन्मलेल्या व वेगळे काहीतरी करून दाखविण्याची ऊर्मी घेऊन त्यांनी सुरू केलेली वाटचाल आजही अविरत सुरू आहे. पुस्तकाच्या दुकानापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती आस्था व गरज ओळखून त्यांनी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था सुरू केली.

Indian Agriculture
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

त्यात कृषी महाविद्यालयासह (Agriculture University) जवळपास पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्र, बीजोत्पादनात (Seed Production) नावलौकीक असलेली कंपनी अजित सीड्‌स (Ajit Seeds0 व आर्या सीड्‌स, गंगामाई शुगर (Gangamai Sugar), गंगामाई कृषी उद्योग असे त्यांचे विस्तृत कार्यक्षेत्र आहे. पैकी बांधकाम क्षेत्र व ‘गंगामाई शुगर’ची जबाबदारी पद्माकरराव यांचे मोठे चिरंजीव रणजित मुळे तर अजित सीड्‌सची जबाबदारी समीर मुळे सांभाळतात.

गंगामाई कृषी उद्योगाचे अध्यक्ष म्हणून पद्माकरराव यांच्याकडे नेतृत्व आहे. त्यात समन्वयक व शेती व्यवस्थापक मोहनराव तपसे यांच्या नेतृत्वात योगेश जाधव, कैलास ठोकळ, एकनाथ गिरी, एस. डी. साळुंके, मुकुंद वाघ ही सर्व मंडळी शेती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. औरंगाबाद जिल्ह्यातील घाटनांद्रा, भगतवाडी, ब्रह्मगव्हाण, खामजळगाव, पेंढापूर आदी गावांच्या शिवारात ‘गंगामाई’ उद्योगाच्या प्रयोगशील नावीन्यपूर्ण देशी व परदेशी पिकांचा विस्तार झाला व होतो आहे.

गंगामाई कृषी उद्योग पीकपद्धती

(आकडे एकरांचे)

(कंसात लागवड अंतर)

खजूर- १० एकर (लागवड २५ बाय २५ फूट).

महोगनी वृक्ष- १२५ एकर (१० बाय १० फूट).

मोसंबी- १४० एकर (२० बाय १० फूट)

संत्रा- २६ एकर (२० बाय १० फूट)

लिंबू- २० एकर (१६ बाय २० फूट, १९ बाय १९ फूट, १४ बाय १४ फूट )

ड्रॅगन फ्रूट- ६७ एकर

बांबू- २५ एकर (१५ बाय १० फूट, १५ बाय ८ फूट)

चिंच- ३ एकर ( २० बाय २० फूट)

नारळ- १ एकर (१३८ झाडे)

सुपारी- बांधावर ३८ झाडे

केसर आंबा- २५० झाडे

पेरू- ३ एकर (१२ बाय ८ फूट)

Indian Agriculture
Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

ॲव्होकॅडो- सुमारे तीन ते साडेतीन एकर लागवड पूर्ण, उर्वरित तीन एकरांत नियोजन सुरू. (१५ बाय १५ फूट)

गावशिवारनिहाय पीकपद्धती

घाटनांद्रा- लिंबू, महोगनी

भगतवाडी- खजूर, संत्रा, मोसंबी, लिंबू, महोगनी, चिंच

ब्रह्मगव्हाण- ड्रॅगन फ्रूट, मोसंबी, नारळ, सुपारी, ॲव्होकॅडो

खामजळगाव- ड्रॅगन फ्रूट, मोसंबी

पेंढापूर... महोगनी, बांबू

सिंचन व्यवस्था

नाथसागर धरणालगत स्वमालकीच्या जमिनीत पाच बोअर्स, एक विहीर धरणातून सहा इंची व एक चार इंची पाइपलाइन करून पाणी शेतात आणले. गाव शिवारनिहाय शेततळे संख्या (कंसात एकूण पाणीक्षमता) भगतवाडी- ६ (५ कोटी लिटर) पेंढापूर- १ (६० लाख लिटर) खामजळगाव- २ (२ कोटी लिटर) ब्रह्मगव्हाण- १ (१ कोटी ६१ लाख ९१२लिटर) (आकारमान : ३३० बाय १३९ मीटर)

Indian Agriculture
Indian Agriculture : नवे वर्ष, नवी उमेद

सौर पॅनेल व ‘ट्रान्स्फॉर्मर’

भारनियमन व शेती सिंचनाच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी सौर पंपासाठी ब्रम्हगव्हाण व खामजळगाव शिवारातील शेतीत १० एचपीचे प्रत्येकी दोन सोलर पॅनेल आहेत. भगतवाडी शिवारात ३० एचपी क्षमतेचे एक सोलर पॅनेल आहे. शिवाय २५ ते ६३ केव्ही क्षमतेचे स्वतंत्र १० ‘ट्रान्स्फॉर्मर्स’ विविध शिवारांमध्ये बसविले आहेत.

शेणखताच्या वापरावर विशेष भर

ब्रह्मगव्हाण व भगतवाडी येथील शेतात असलेल्या गोठ्यात ३० देशी गायी व १० बैल आहेत. जनावरांच्या मूत्राचा व शेणाचा वापर स्लरीनिर्मितीसाठी केला जातो. प्रत्येक पिकासाठी शेणखत वापरावर भर असतो. क्षेत्र अधिक असल्याने वर्षाला १० ते १२ लाख रुपयांचे शेणखत खरेदी करून वापरले जाते.

Indian Agriculture
Agriculture Festival : ‘पंदेकृवि’च्या कृषी महोत्सवात वाशीम ‘केव्हीके’चा सहभाग

डिसेंबरपर्यंत विविध गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले हे शेणखत साठविले जाते. एक ट्रॉली शेणखतात एक ट्रॉली कंपोस्ट मळी मिसळून त्यावर ‘डीकंपोजर’चा वापर होतो. चांगले कुजल्यानंतर एकरी चार ट्रॉली या प्रमाणात त्याचा वापर होतो. ड्रॅगन फ्रूटसाठीच्या शेणखतात मात्र कंपोस्ट मळी मिसळली जात नाही.

मेक्सिकोचे ॲव्होकॅडो मराठवाड्यात

ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर आता अलीकडेच अमेरिका- मेक्सिकोकडील ॲव्होकॅडो फळपिकाचा प्रवेशही मराठवाड्यात ‘गंगामाई’ रूपाने झाला आहे. हे फळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याने त्याला ‘सुपर’ फळाचा दर्जा दिला गेला आहे असे अभ्यासक म्हणतात. भारतात या फळाची शेती उत्तराखंडमध्ये असल्याचे सांगितले जाते.

Indian Agriculture
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

त्याचे आरोग्यविषयक महत्त्व लक्षात घेऊनच सुमारे ११५० रोपे मेक्सिकोहून आणली. अलीकडेच १५ बाय १५ फूट अंतरावर ब्रह्मगव्हाण शिवारात त्याची लागवड झाली आहे. बहुतांशी पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यापासूनही लवकरच उत्पन्न सुरू होईल. महोगनी देखील येत्या काळात लाकूड उद्योगासाठी वापरात येणार आहे.

बाजारपेठ, विक्री व्यवस्था

पिकांमध्ये विविधता जपताना बाजारपेठ वा विक्री व्यवस्थाही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक फळाची प्रतवारी करून विक्री करण्याचे तंत्र स्वीकारले आहे. राज्यात ड्रॅगन फ्रूटचे ६८ एकरांपर्यंत क्षेत्राचे नियोजन करणारा ‘गंगामाई’ हा पहिलाच उद्योग असावा. अर्थात, या क्षेत्रापैकी काही लागवड नवी आहे. तरीही सुमारे ४६ एकरांतील उत्पादनाची विक्री करणे ही सोपी गोष्ट नव्हती.

लागवडीपासून आतापर्यंत एकच उत्पादन म्हणजे एकूण ७५ टन उत्पादन हाती लागले आहे. फळाची प्रतवारी ४०० ग्रॅम, ३०० ग्रॅम, २०० ग्रॅम व १०० ग्रॅम अशा चार प्रकारांत केली. त्यामुळे प्रति किलो १०० रुपयांपासून ते २१० रुपयांपर्यंतचे दर वाशी, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील बाजारपेठेत मिळवले आहेत.

लिंबू, खजूर, आंबा आदींची थेट विक्री केली आहे. कंपनीचे विविध उद्योग व संस्थांमध्ये व्यक्‍तींच्या मागणीनुसार फळांचा पुरवठा केला जातो. शिवाय शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ स्टॉल थाटला जातो. शहरी ग्राहक तेथून खरेदी करतात. औरंगाबाद शहरातील विविध भागांतही स्टॉल मांडण्यात येतात.

खजूर, लिंबाचे अर्थकारण

अलीकडील दोन वर्षांपासून दहा एकर क्षेत्रावरील खजुराचे उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्या वर्षी सात टन उत्पादित खजुराचे मुंबई व औरंगाबाद येथील बाजारपेठांत तसेच थेट स्टॉल उभारून विक्री केली. १०० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळाला.

लिंबाबाबत सांगायचे तर आठ वर्षांची व दहा वर्षांची अशा दोन वेगवेगळ्या अंतरावर लागवड केलेल्या बागा आहेत. प्रत्येक वर्षी तीन बहर येतात. म्हणजे साधारण वर्षभर उत्पादन सुरू राहते. विक्री टप्प्याटप्याने औरंगाबाद बाजारपेठेतच केली जाते. उन्हाळ्यात लिंबाचे दर तेजीत असतात. बागेतून ५० हजार ते सव्वा लाख रुपयांप्रमाणे प्रति महिना उत्पन्न मिळते.

शेकडो हातांना बारमाही रोजगार

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या चारही गावांत मिळून असलेल्या सुमारे साडेतीनशे वा त्याहून अधिक क्षेत्रातून बाराही महिने किमान २५० महिला व शंभराहून अधिक पुरुषांच्या हाताला काम मिळते आहे. त्यातून स्थानिक रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे.

काही पिकांतील प्रातिनिधिक व्यवस्थापन

ड्रॅगन फ्रूट

जून २०२१ च्या सुमारास या पिकाची लागवड केली आहे.

एकरी ५ टन शेणखत ४ फुटी बेडमध्ये वापरले.

सुरुवातीला एकरी दोन टन कंपोस्ट मळी व एकरी एक किलो ह्युमीक ॲसिड १५ दिवसांच्या अंतराने वापरले.

जिवाणू कल्चरचाही एकरी १५० ते २०० लिटरप्रमाणे ठिबकमधून वापर.

सिलिकॉनचाही वापर. तणनाशकाचा वापर टाळला जातो. बेड कायम वाफसा स्थितीत राहील याची काळजी घेतली जाते.

राज्यात या पिकाच्या लागवडीची पद्धत पाहता एका खांबावर सिमेंट चक्रीवर सभोवताली चार रोपे लावण्यात येतात. त्यात बदल करताना एकाच रांगेत दोन अँगलमधील रॉडला लागून ११ बाय ९ फुटांत १४ रोपे लावण्याचा प्रयोग केला. त्यामुळे एका रिंगभोवती चार रोपांतून २ ते ३ किलो उत्पादन मिळत असेल तर या पद्धतीमुळे ते ७ ते ९ किलोपर्यंत अपेक्षित आहे.

साधारणतः मेमध्ये फ्लॉवरिंग झाल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत फळांचे उत्पादन सुरू राहते. कळी लागली, की १५ दिवसांत फूल उमलते. तिथून पुढे ३० दिवसांत फळ बाजारात विक्रीसाठी जाण्यास तयार होते. ४५ दिवसांचे हे चक्र नोव्हेंबरपर्यंत एकीकडे फळकाढणी व दुसरीकडे फळ लागणे असे सुरू राहते.

मोसंबी

पहिल्या वर्षी प्रति झाड २० किलो दिले शेणखत, वयानुसार त्याचा ३० किलोपर्यंत वापर वाढविणार. --दोन वर्षांच्या झाडाला एसएसपी दाणेदार ५०० ग्रॅम, पोटॅश ४०० ग्रॅम, सूक्ष्मअन्नद्रव्य ५० ग्रॅम प्रति झाड

झिंक, बोरॉन, फेरस, विद्राव्य खते एकरी एक किलो ठिबकद्वारे प्रति महिना.

पिकाच्या दोन्ही बाजूंना इनलाइन लॅटरलद्वारे वाढीच्या अवस्थेनुसार पाणी.

बाग स्वच्छ ठेवण्यावर भर

बुरशीनाशकाचा परिणामकारक वापर

खजूर

पाच वर्षांची झाडे झाली आहेत.

तीन वर्षांपासून सुरू आहे उत्पादन.

डिसेंबर, जानेवारीला धरला जातो बहर.

बहर लागल्यानंतर दिवसाआड ४ तास दिले जाते पाणी.

बहर धरण्याआधी २५ किलो शेणखत, १०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य, २०० ग्रॅम १९-१९-१९, निंबोळी पेंड ४०० ग्रॅम आदींचा वापर.

औरंगाबाद जिल्ह्यात सतत निसर्गाचा लहरीपणा दिसून येतो. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीच्या शाश्‍वत उत्पन्नासाठी पारंपरिक पिकांसोबत वेगवेगळ्या फळपिकांची व वृक्षशेतीची जोड देण्याची गरज आहे. तशी पावले उचलून शाश्‍वत शेतीची ‘मॉडेल्स’ उभी करण्यावर आमचा भर आहे. उत्पादन खर्चाला परवडतील अशी पद्धती अंगीकारून कृषी उत्पादनावर आम्ही भर दिलेला आहे.

पद्माकरराव मुळे

अध्यक्ष, गंगामाई कृषी उद्योग, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com