कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप कापसे व कुटुंबीयांनी लाकडी घाण्यावरील तेलनिर्मितीचा ‘स्टार्टअप’ केला आहे. सुमारे नऊ प्रकारच्या शुद्ध आणि आरोग्यदायी तेलांचे उत्पादन घेतले जात असून, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत सुमारे ३० विक्री केंद्रांमध्ये त्यास बाजारपेठ मिळवण्यात कापसे यशस्वी ठरले आहेत. कापसेवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे संदीप कापसे या युवा शेतकऱ्याची २२ एकर शेती आहे. वडील नंदकिशोर आणि चुलते नेताजी असे एकत्रित कुटुंब आहे. शेती बागायती असून, १२ एकर द्राक्षे, दोन एकर ज्वारी, सहा एकर भुईमूग, दोन एकर करडई अशी पिके आहेत. संदीप यांचे वडील नंदकिशोर शिक्षक, तर चुलते नेताजी शेती करतात. संदीप ‘बी.ई’.(मेकॅनिकल), तर बहीण विशाखा यांनी ‘बीएएमस’चे शिक्षण घेतले आहे. चुलत भाऊ समर्थ, साईराज यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित कामांतूनच शेती व्यवसायाला चांगली उभारी मिळाली आहे. कौशल्यातून उद्योगाला खतपाणी संदीप यांनी दोन वर्षे पुण्यात खासगी कंपनीत नोकरी केली. पुढे नामवंत चारचाकी वाहन कंपनीच्या शोरूममध्ये ‘मार्केटिंग’ विभागाचा अनुभव घेतला. कौशल्याच्या आधारे कमी कालावधीत १० ते १५ लाखांच्या ८ ते १० वाहनांची विक्री आपल्याला शक्य होत असेल तर स्वतःच व्यवसाय सुरू करून त्यात असे यश का मिळवू नये असा विचार संदीप यांच्या मनात आला. दरम्यान, लॉकडाउनही सुरू झाला होता. संदीप गावी परतले. लाकडी घाण्यावरील तेलनिर्मितीत संधी दिसली. शेतकरी उत्तम पिकवतात. त्यांना अन्नही तसेच मिळाले पाहिजे असाही विचार होता. घरातील सदस्यांसोबत चर्चा, अभ्यास, अर्थकारण तपासल्यानंतर उद्योगात उतरण्याचे निश्चित केले. बहीण विशाखानेही मदत केली. खाद्यतेल अधिक शुद्ध, सात्त्विक असणं गरजेचं आहे. अलीकडील काळात बाजारात प्रक्रिया केलेले म्हणजे ‘रिफायन्ड’ तेल मिळते. मात्र लाकडी घाण्यावर गाळलेले तेल अधिक नैसर्गिक, चवीला नैसर्गिक ताजे व आरोग्यदायी असल्याने ग्राहकांचा त्याकडे अधिक ओढा आहे. दोन स्तरांवर निर्मिती माढ्यातच वैराग रस्त्यावर प्रकल्प उभारला, सुमारे अडीच लाखांचे दोन घाणे खरेदी केले. सुरुवातीला दहा लाखांचे भांडवल उभारले. आजची गुंतवणूक सुमारे १४ लाख रुपयांची आहे. एका घाण्यावर व्यावसायिक निर्मिती होते. तर दुसऱ्या घाण्यावर शेतकरी वा ग्राहकांकडील धान्यापासून केवळ धान्यपेंडीच्या बदल्यात गाळप करून दिले जाते. त्यासाठी अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत. आज सुमारे नऊ प्रकारचे म्हणजे शेंगादाणा, सूर्यफूल, करडई, बदाम, मोहरी, तीळ, जवस आणि एरंडी तेलाचे उत्पादन करण्यात येते. तेल गाळपाची प्रातिनिधिक पद्धत (भुईमूग)
उत्पादकता सुमारे एक किलो शेंगदाण्यापासून ४० टक्के तेल मिळते. एका लिटरसाठी किमान पावणेतीन किलो शेंगदाणे लागतात. पाच किलो करडईपासून एक लिटर तेल मिळते. सूर्यफुलासाठीही हेच प्रमाण आहे. कच्चा माल शेतकऱ्यांकडून तसेच खरेदीदारांकडून घेतला जाते. एकसारख्या गुणवत्तेचा कच्चा माल मिळण्यासाठी ठरावीक शेतकरी निश्चित केले आहेत. त्यांना त्यासाठी बियाणेही पुरवण्यात येणार आहे. स्वतःच्या शेतातही सहा एकरांत भुईमूग व दोन एकरांत करडई लागवड केली आहे. ‘रहस्य’ तेल ब्रॅण्ड किमती (प्रति लिटर)
पेंडीची विक्री गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या पेंडीची दूध उत्पादकांना विक्री होतो. धान्याच्या प्रकारानुसार ३० ते ४० रुपयांपासून ५० ते ६० रुपयांपर्यंत विक्री होते. उत्पन्नाचा हा अतिरिक्त स्रोत मिळाला आहे. मार्केट संदीप सांगतात, की बाजारातील रिफाइंड तेलापेक्षा थोडे जादा पैसे या तेलासाठी मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना ते महाग वाटते. मात्र आमच्याकडे या, प्रत्यक्ष उत्पादन व त्याची गुणवत्ता, फायदे पाहा असे आवाहन त्यांना करतो. ते पूर्ण नैसर्गिक असून त्यात कोणतेही रासायनिक घटक वापरले जात नाहीत. विविध प्रदर्शने, जाहीर कार्यक्रम, परिसंवाद, मॅार्निंग वॉकच्या जागा आदी ठिकाणी स्टॉल्स लावून तेलाचे ‘प्रमोशन’ केले. सोलापूर जिल्ह्यात सुमारे २५ दुकाने तर पुणे, औरंगाबाद व मुंबई (अलीकडेच सुरू) येथे मिळून ३० पर्यंत व्यावसायिक तयार केले आहेत. विक्री सध्या महिन्याला सुमारे १५०० ते १६०० लिटर तेलाची विक्री होते. त्यात शेंगदाणा आणि करडईचे प्रत्येकी ५०० लिटर, खोबरेल तेल ३०० लिटर आणि उर्वरित २०० लिटरमध्ये अन्य तेलांचा समावेश आहे. २०० मिलि, ५०० मिलि, एक लिटर ते पाच लिटरपर्यंतचे आकर्षक पॅकिंग, ब्रॅण्डिंग केले आहे. ‘फूड सेफ्टी’, शॉप ॲक्टचे परवाने व आयएसओ ९००१-२०१५ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. संपर्क- संदीप कापसे, ७८४३०२२३३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.