Fruit Crop Farming : फळपिकांतून गाठली आर्थिक सक्षमता

Horticulture : परभणी जिल्ह्यातील पेडगाव (ता.परभणी) येथील विजय गंगाधरराव जंगले हे आठ वर्षापासून फळ पीक केंद्रित शेती करत आहेत. संत्रा आणि लिंबांची विक्रीसाठी स्वतःच्या विक्री व्यवस्थेसोबतच थेट शेतातून विक्रीचे दोन्ही पर्याय अवलंबले जातात.
Horticulture
HorticultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पेडगाव (ता. परभणी) येथील परभणी ते पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर गंगाधरराव जंगले यांची वडिलोपार्जित ३० एकर शेती आहे. त्यांना अशोक, संजय आणि विजय अशी तीन मुले आहेत. त्यापैकी विजय हे कॉमर्सच्या पदवीचे शिक्षण घेत असल्यापासून स्टुडिओ थाटून फोटोग्राफीचा व्यवसायही करत. एकत्रित शेतीची वाटणी झाल्यानंतर त्याच्या वाट्याला ९ एकर शेती आली. शेती आणि फोटोग्राफी अशा दोन्हींमध्ये लक्ष देताना ओढाताण होऊ लागली. २०१० पासून ते पूर्णवेळ शेतीकडे वळले.

शेतीमध्ये पूर्वी सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, गहू अशी पारंपरिक पिके घेताना त्याला तब्बल सात वर्ष लाल कंधारी गो वंशाच्या पालनाची जोड दिली होती. मात्र आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पशुपालन व्यवसाय थांबवला. शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीतून फारसे काही हाती लागत नाही, हेही त्यांच्या लक्षात येत होते.

शेती कशी फायद्यामध्ये आणायची, यासाठी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यातून किमान १५ ते २० टक्के क्षेत्रावर फळपीक लागवडीमुळे उत्पन्नाची जोखीम कमी होऊ शकते हे समजले. त्यानंतर संत्रा आणि लिंबू या फळपिकांची निवड केली.

फळबाग केंद्रित शेती....

२०१६ मध्ये शेंदूरघाट (जि. अमरावती) येथून प्रतिनग १६ रुपये दराने नागपुरी संत्रा वाणांची ४०० रोपे खरेदी केली. १ हेक्टर क्षेत्रावर १६ बाय १६ फूट अंतरावर लागवड केली. त्यात पहिली तीन वर्षे सोयाबीन, गहू आदी आंतरपिके घेतली. त्यातून मुख्य फळ पिकांचा खर्च निघाला. चौथ्या वर्षापासून संत्रा उत्पादन सुरू झाल्यामुळे आंतरपीक घेणे बंद केले. झाडाचा आकार वाढत गेला तशी फळधारणा वाढत गेली.

चक्क संत्रा झाडांना आधार देण्यासाठी बालाघाट येथून तीन लाख रुपयाचे बांबू विकत आणले. २०१६ मध्येच श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून प्रती रोप २० रुपये दराने ३५० लिंबाची रोपे खरेदी केली. साडे तीन एकरमध्ये २० बाय २० फूट अंतरावर लिंबू लागवड केली. २०२१ पासून लिंबू उत्पादन सुरू झाले.

लिंबाचे मृग, हस्त बहर ते घेतात. गतवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उती संवर्धन केंद्रातून केळीच्या ग्रॅन्ड नैन जातीची १२५ रोपे आणून लागवड केली. सध्या या केळीचे उत्पादन सुरू आहे. घरी भट्टी लावून पिकवलेल्या केळीची विक्री ते परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकरी मित्र पंडित थोरात यांच्या मदतीने ते स्वतः करतात.

Horticulture
Horticulture : बारमाही उत्पन्न देणारी फळबागकेंद्रित शेती

थेट विक्रीसाठी कराराचे नियोजन

संत्रा व लिंबांची शेतातून व्यापाऱ्यांना विक्री करतात. यामध्ये काही झाडे विक्रीसाठी स्वतःकडे ठेवली जातात. उदा. ३०० संत्रा झाडे व्यापाऱ्यांना दिली तर स्वतःकडे ५० ते १०० झाडे ठेवली जातात. दरवर्षी संत्रा व लिंबू बागेचा सौदा करतेवेळी खरेदीदार व्यापाऱ्यासोबत बॉन्ड पेपरवर करार करताना त्यात अटी, शर्ती ठरवलेल्या असतात.

दरवर्षी जून महिन्यात संत्रा बागेचा, तर पोळ्याला (ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये) लिंबू बागेचा सौदा करतात. व्यापाऱ्याबरोबर सौदा ठरवतानाच ठरलेल्या संत्र्याच्या एकूण किमतीच्या सुमारे ५० टक्के चुकाऱ्याची रक्कम व्यापाऱ्याकडून घेतली जाते.

तर उर्वरित ५० टक्के रक्कम फळ तोडणीनंतर घेतली जाते. लिंबाबाबत एकूण किमतीपैकी ५० टक्के रक्कम करारावेळीच घेतली जाते. तर उर्वरित ५० टक्के रक्कम नोव्हेंबर व मार्च महिन्यात दोन वेळा विभागून घेतले जातात. त्यामुळे वर्षभरातील शेती व्यवस्थापनासाठी खेळते पैसे उपलब्ध होतात.

नैसर्गिक शेतीसाठी घरगुती निविष्ठा निर्मिती....

नैसर्गिक शेती पद्धतीचा अंगीकार करताना आवश्यक निविष्ठा शेतामध्येच तयार केल्या जातात. त्यात जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गांडूळ खत यांचा समावेश आहे. आवश्यक शेणखत, गोमूत्र यासाठी एक गीर गाय जोपासलेली आहेत. अर्काच्या निर्मितीसाठी दहा ड्रम पद्धतीचा अवलंब केला आहे. बांधावर चिकू, सीताफळ, नारळ, सफरचंद, अॅपल बेर लागवड आहे. घरगुती वापरासाठी भाजीपाला, तूर, मूग, उडिद, गहू, ज्वारी इ. पिकांचे उत्पादन घेतात. भाजीपाला कधी विकत आणावा लागत नाही.

स्वतःच्या विक्री व्यवस्थेमुळे मिळतो अधिक नफा...

परभणी आणि परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी -अधिकारी गट आणि इतर गटांमध्ये नियमित कार्यरत राहून समाज माध्यमावरून संत्रा, केळीची मागणी घेतात. मागणीनुसार परभणी शहरात घरपोच शेतीमाल दिला जातो. स्वतः फळाची विक्री केल्यास अधिक फायदा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

सध्या केळीची प्रतिडझन ५० ते ६० रुपये दराने विक्री सुरू आहे. आजवर ५०० डझन केळी विकली असून, २५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षी स्वतःकडे विक्रीसाठी ठेवलेल्या संत्र्याच्या ५० झाडाला ४ क्विंटल फळे निघाली. त्याची प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने विक्री केली.

Horticulture
Horticulture : नगदी पिकाला दिली फळबागेची जोड

फळ पिकांचे अर्थकारण...

अ) पहिल्या वर्षी संत्र्याचे ४ टन उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो ५० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले. पुढे उत्पादन वाढत गेले. मागील वर्षी संत्र्याचे २० टन उत्पादन मिळाले. खर्च जाता ६ लाख ५० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. यंदा संत्रा बागेतील ३०० झाडांचा सौदा ८ लाख रुपये किमतीला केला. करारानुसार व्यापाऱ्याने ५० टक्के म्हणजे ४ लाख रुपये हाती आले आहेत. उर्वरित ५० टक्के रक्कम २५ जानेवारीला व्यापाऱ्याकडून मिळेल.

ब) लिंबाचे उत्पादन वर्षभर सुरू राहते. पहिल्या वर्षी लिंबाचे अडीच लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षी लिंबाचे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा लिंबू बागेतील ३५० झाडांचा सौदा ३ लाख ५० हजार रुपयाला केला आहे. करारानुसार व्यापाऱ्याने १ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. लिंबाची उर्वरित २५ टक्के रक्कम नोव्हेंबरमध्ये, तर फेब्रुवारीमध्ये उर्वरित १ लाख रुपये मिळतील. लिंबाची २२ झाडे स्वतः विक्री करण्यासाठी ठेवली आहेत.

क) केळीच्या १२५ झाडापासून खर्च वजा जाता ४० ते ४५ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची जोखीम कमी करण्यासाठी दरवर्षी हवामानाधारित फळ पीकविमा योजनेत संत्र्यासाठी विमा संरक्षण घेतात. २०१८ मध्ये संत्र्याचा विमा परतावा मिळाला होता.

खर्च व बचत...

विजय यांच्या ९ एकर पैकी जुनी संत्रा लागवड अडीच एकर आहे, तर २०२३ मध्ये दीड एकरवर नवीन संत्रा लागवड आहे. साडेतीन एकर लिंबू लागवड आहे. बहुतांश वेळी स्वतः विजय आणि पत्नी सौ. सीमा हे दोघेच शेतातील बहुतांश कामे करतात. गरजेनुसार आवश्यक तिथेच मजूर घेतले जातात. त्यासाठी वर्षभरात साधारणतः दीड लाख रुपये खर्च होतो.

फळबागेव्यतिरिक्त अन्य पिकांसाठी प्रामुख्याने घरचे बियाणे वापरले जाते. घरगुती निविष्ठा निर्मितीमुळे खर्चात बचत होते. खर्च जाता फळबागेतून एकरी निव्वळ उत्पन्न एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची मुलगी वसुधा, मुलगा अभिषेक यांच्या शिक्षणावर वर्षाकाठी दीड लाख रुपये खर्च होतात. मागील दहा वर्षापासून पोस्टात मुलीच्या नावाने १० हजार रुपये बचत सुरू आहे. डाक विमा योजनेत स्वतःचा वर्षाला १० हजार रुपये विमा हप्ता भरतात. शेती उत्पन्नावर जागा खरेदी केली आहे.

संरक्षित सिंचनासाठी शेततळे- सौर कृषीपंप

सिंचनासाठी विहीर, बोअरची सुविधा आहे. पण त्याचे पावसाच्या प्रमाण कमी अधिक होते. उन्हाळ्यातही फळबागेला पाण्याची शाश्वत सोय म्हणून २४ बाय २४ मीटर आकाराच्या शेततळे केले आहे. पाणी असले तरी भारनियमनामुळे सिंचन अडचणीत येते. ते टाळण्यासाठी त्यांनी सौर कृषी पंपही बसविला आहे.

- विजय जंगले, ९९७०५४४७७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com