Horticulture : नगदी पिकाला दिली फळबागेची जोड

Orchard Farming : सातारा जिल्ह्यातील जयपूर येथील किशोर व दत्तात्रेय या कुलकर्णी बंधूनी ऊस, आले व पपई, कलिंगड अशा फळ आणि नगदी पिकातून कुटुंबाची घडी बसवली आहे.
Horticulture
HorticultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : शेतीत मजूरटंचाई ही सर्वांत मोठी समस्या होऊन बसली आहे. अनेक शेतकरी यांत्रिकीकरण तसेच उपलब्ध यंत्रांमध्ये सुधारणा करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यातील जयपूर (ता. कोरेगाव) येथील किशोर व दत्तात्रेय हे कुलकर्णी हे त्यापैकीच एक आहेत.

त्यांचे वडील विजय देखील शेतीच करायचे. त्या काळात ऊस तसेच अन्य हंगामी पिके ते घेत. त्यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर किशोर यांनी काही काळ पुणे येथे नोकरी केली. मात्र मिळणाऱ्या पगारातून उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी गाव गाठले.

शेतीच्या विकासाला चालना

शेतीतच पूर्ण लक्ष घातल्यानंतर किशोर यांनी सुधारित तंत्राच्या वापरावर भर दिला. वांगी, टोमॅटो, मिरची आदी पिकांची निवड केली. दरम्यान, दत्तात्रेय बारावीचे शिक्षण संपवून पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करू लागले. काही दिवसानंतर तेही गावी आले. आता दोघे बंधू, आई (विद्या) व वडील असे सर्व जण शेतीत राबू लागले. किशोर यांच्या पत्नी पल्लवी व दत्तात्रेय यांच्या पत्नी नेहा यांचीही मदत मिळू लागली. त्यातून शेतीच्या विकासाला चालना मिळाली. क्षेत्र कमी असल्याने खंडाने शेती करण्यास सुरुवात केली. सध्या घरची व खंडाने अशी मिळून १५ एकर शेती कुलकर्णी करीत आहेत. चार म्हशी व एक देशी गाय आहे.

Horticulture
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

शेतीचे व्यवस्थापन व तंत्र

ऊस, आले, पपई, कलिंगड ही कुलकर्णी यांची प्रमुख पिके आहेत. यामध्ये प्रत्येकी चार एकरांवर ऊस, व आले, त्यात पपई व अन्य शेती ते चक्राकार पद्धतीने घेतात. मुरमाड, हलके क्षेत्र जास्त आहे. प्रति वर्षी चार ते पाच एकरांत आडसाली ऊस असतो. शक्यतो खोडवा घेतला जात नाही. त्यामुळे पिकांच्या ‘रोटेशन’साठी जमीन उपलब्ध होत असते. एकरी सरासरी ८० ते ९० टन ऊस उत्पादन मिळते.

गाव परिसरात पाऊसमान कमी तसेच पोषक वातावरणामुळे आले पीकही दरवर्षी सरासरी तीन ते चार एकरांवर घेतले जाते. शेणखत व साखर कारखान्याकडील मळी यांचे मिश्रण करून एकरी पाच ते सहा ट्रॉली असा त्याचा वापर होतो. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन पुढील पिकांस हे खत उपयुक्त ठरते. जूनमध्ये सुमारे साडेचार फुटी गादीवाफ्यावर (बेड) आले पिकाची लागवड केली जाते. एकरी सरासरी २५ ते ३० गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) त्याचे उत्पादन मिळते.

Horticulture
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

आंतरपीक पपई

दरवर्षी आले पिकात आंतरपीक म्हणून पपई घेण्यात येते. जूनमध्ये आले लागवड केल्यावर साधारण तीन महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पपईची लागवड होते. पपईच्या दोन सरींतील अंतर नऊ फूट, तर दोन रोपांतील अंतर सहा फूट ठेवले जाते. आले पिकाच्या दरात दरवर्षी चढ-उतार होत असतात. त्या अनुषंगाने पपई आंतरपीक असल्याने आल्याच्या दरांतील जोखीम कमी होऊन जाते.

यांत्रिकीकरणावर भर

कुलकर्णी बंधू अधिकाधिक क्षेत्रावर शेती करू लागले तसतशी मजूर समस्या जास्त जाणवू लागली. त्यानंतर ट्रॅक्टर, पल्टी नांगर, फणपाळी, रोटर, रेजर, तसेच ऊस व आले या पिकांसाठी स्वतंत्र दोन पॅावर टिलर्स, फळबागा फवारणीसाठी ब्लोअर व पेरणीसाठी छोटा ट्रॅक्टर असे यांत्रिकीकरण केले आहे. शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर आहे. पपई विक्रीसाठी बागेबाहेर काढण्यासाठी छोटा ट्रॅक्टर घेतला असून सोबत साडेचार फूट रुंदी व १० फूट लांबी असलेली ट्रॉली देखील बनवून घेतली आहे. ट्रॅक्टर बागेत सहज फिरण्यासाठी फळबागांमध्ये योग्य अंतर ठेवले जाते. हंगामी पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ यंत्राचा वापर केला जातो.

मल्चिंग पेपरचा वापर

कोरोनाच्या काळात २०२० मध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात कलिंगड घेतले जात होते. त्यासाठी पॉली मल्चिंग पेपरचा वापर होत असल्याने मजूर टंचाई जाणवत होती. तसेच एकरी सहा ते सात हजार रुपये मजूरखर्च येत होता. हा खर्च तुलनेत खूप जास्त वाटत असल्याने ट्रॅक्टरचलित मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र कुलकर्णी यांनी उस्मानाबाद येथून ३३ हजार रुपये किमतीला आणले.

यंत्रात केली सुधारणा

कलिंगडात यंत्राद्वारे मल्चिंग पेपर अंथरणी व्यवस्थित होऊ लागली. पण ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरणे व रोपांच्या दोन्ही बाजूंना ठिबकच्या नळ्या अंथरण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत होते. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न किशोर करीत होते. अनुभव, कल्पनाशक्ती व कौशल्यबुद्धीतून त्यांनी यंत्रात सुधारणा करून घेण्याचे ठरवले. त्यासाठी स्थानिक कारागिराची मदत घेतली.

त्यानुसार यंत्राच्या दोन्ही बाजूंस दोन लोखंडी पट्ट्या वाढविल्या. त्यास आडव्या पद्धतीने गॅल्व्हनाइज्ड रॉडचा वापर केला. ठिबकची नळी ‘बेडच्या टॉप’च्या मध्यवर्ती भागातून दोन्ही बाजूंना अंथरण्यासाठीची व्यवस्था केली. आता मल्चिंग पेपर तसेच ठिबकच्या नळ्या अंथरणे व ही कामे एकाचवेळी करणे सोपे झाले आहे. त्यातून ठिबक नळी पसरवण्याचा एकरी १५०० रुपये व बेडचा टॉप करण्याचा एकरी एक हजार रुपये अशा २५०० रुपये खर्चात बचत झाली आहे.

किशोर कुलकर्णी ८२७५३७०२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com