Success Story of Dragon Fruit : आदिवासी बहुल कोरडवाहू भागात यशस्वी ‘ड्रॅगन फ्रूट’

Dragon Fruit Farming : यवतमाळ जिल्ह्यातील आनंदवाडी या आदिवासी बहुल गावातील अमोज चव्हाण या युवा शेतकऱ्याने कोरडवाहू शेती पद्धतीत ड्रॅगन फ्रूटचा आधार शोधला.अभ्यासातून हे पीक यशस्वी केले.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon
Published on
Updated on

Story of Dragon Fruit : यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी हे सुमारे १२०० लोकवस्तीचे गाव आहे. खेकडी गटग्रामपंचायत अंतर्गत गावाचा समावेश होतो. गावात बहुसंख्य आदिवासीची वस्ती आहे. गावातील युवा शेतकरी अमोज चव्हाण यांची बारा एकर शेती आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद यांसारखी पिके ते घेत.

हा भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे पाण्याची कायम टंचाई भासते. अमोज यांच्याकडे सिंचनासाठी एकमेव विहिरीचा पर्याय होता. परंतु पाणी कमी असल्याने कमी क्षेत्र ओलिताखाली यायचे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ६० लाख लिटर पाणी क्षमतेचे शेततळे त्यांनी घेतले आहे. सोबत ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केला आहे.

ड्रॅगन फ्रूटचा शोध

कोरडवाहू पद्धतीला अनुकूल ठरणारे पीक निवडण्यासाठी अमोज प्रयत्नशील होते. विविध माहिती स्रोत व यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट पिकाविषयी माहिती मिळाली. हे पीक त्या दृष्टीने आश्‍वासक वाटले. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या वतीने नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अमोज यांनी सोलापूर, सातारा या भागांतील शेतीची पाहणीही केली.

त्यातून पेरू पिकालाही मागणी असल्याचे लक्षात आले. सन २०२० मध्ये दीड एकरात ड्रॅगन फ्रूट लागवडीचे नियोजन झाले. सुमारे २७०० रोपे कर्नाटक भागातून प्रति रोप ६० रुपये याप्रमाणे आणली. निवडुंग प्रकारातील या पिकाची वा वेलींची लागवड करण्यासाठी सिमेंटचे खांब (पोल) गरजेचे असतात. त्या दृष्टीने दोन ओळींत ११ फूट तर पोल-टू पोल अंतर सात फूट ठेवले. बागेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च आला. लागवडीआधी सुमारे सहा महिने केलेला अभ्यास उपयोगात आला.

पहिल्या वर्षी दीड एकरामधून साडेतीन टन, तर त्यापुढील वर्षी साडेआठ टन व यंदाच्या वर्षी साडेनऊ टन उत्पादन हाती आले. बाजारपेठांचा अंदाज व अनुभव चांगला आला. अर्थकारण जुळणारे ठरले. त्यामुळे नव्याने तीन एकरांवर लागवड वाढवण्यात आली आहे. त्यातून एकूण क्षेत्र आता साडेचार एकर झाले आहे. नव्या बागेत दोन ओळींत दहा फूट, तर दोन रोपांमध्ये दोन फूट असे अंतर ठेवले आहे. लागवडीचे अंतर कमी केल्याने रोपांची संख्या वाढून उत्पादनही वाढेल असा विश्‍वास अमोज यांनी व्यक्त केला आहे.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : काबाडकष्टाच्या शेतीत ‘ड्रॅगनफ्रूट’ ने दाखवला मार्ग

विक्री व्यवस्थापन

अमोज सांगतात, की लागवडीनंतर १५ ते १८ महिन्यांपासून व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. मे ते ऑक्‍टोबर- नोव्हेंबरपर्यंत फळे मिळतात. ड्रॅगन फ्रूटला सर्वत्र मागणी चांगली आहे. अमरावती, यवतमाळ, नागपूर, नांदेड येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. ही बाजारपेठ तयार करण्यासाठीसुरुवातीला व्यापाऱ्यांना फळांचे नमुने दाखविण्यात आले.

१३० ते १६० रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. मात्र केवळ व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता थेट विक्री करण्याचेही नियोजन केले. यामध्ये अमरावती, दिग्रस आदी भागात स्टॉल उभारले. तेथे कुटुंबातील एक व्यक्ती नेमण्यात आली. थेट विक्रीतून प्रति किलो २०० ते २५० रुपये दर मिळाला. या फळात औषधी गुणधर्म आहेत.

ग्राहकांना त्याचे महत्त्व माहिती झाले आहे. त्यामुळे दीड महिन्यांपूर्वी डेंगी, मलेरियाची साथ पसरली असताना१६० रुपये प्रति किलो दराने विक्री शक्य झाली. ड्रॅगन फ्रूटला जोड म्हणून दोन एकरांत मागील वर्षी पेरूची लागवड करण्यात आली आहे. यात तैवान पिंक आणि मोट्या आकाराचा पेरू असे दोन वाण घेतले आहेत. सध्या किलोला ६० ते ७० रुपये प्रति किलो दराने बाजारपेठेत विक्री केली आहे.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : ड्रॅगन फळशेती कार्यशाळेला बारामतीत उत्तम प्रतिसाद

गावकऱ्यांना मिळाले बळ

आमच्या भागात ड्रॅगन फ्रूटची लागवड करणारा मी पहिलाच शेतकरी असावा असे अमोज म्हणतात. त्यांनी हे पीक यशस्वी करून दाखवले. आता गावातील सुमारे सात शेतकरीदेखील या पिकाच्या लागवडीसाठी पुढे आले आहेत. सध्या गावात या पिकाखाली १० एकरांपर्यंत क्षेत्र आले आहे.

अमोज चव्हाण ९५१८३५०५६६

किफायतशीर ठरलेले पीक

अमोज सांगतात, की या पिकात सुरुवातीलाच मोठा भांडवली खर्च करावा लागतो. लागवडीनंतर सुमारे वीस वर्षे तरी उत्पादन मिळत राहते. उन्हाळ्याच्या काळात लहान रोपांना पाणी लागतेच. पण एक वर्षाहून अधिक वयाच्या झाडांना एप्रिल- मे या काळात पाणी थांबवले तरी चालते. पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास ‘सन बर्निंग’ची समस्या निर्माण होत नाही.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत किमान पाच पटीने उत्पन्न या फळपिकाने वाढवले आहे. शिवाय घरच्या दोन व्यक्तीदेखील संपूर्ण फळबागेचे संगोपन करण्यासाठी पुरेशा ठरतात असा अनुभव अमोज व्यक्त करतात. त्यांना पत्नी नीता यांची शेतीत मोठी साथ लाभते. आता त्यांनी या पिकाची रोपे तयार करण्यावर भर दिला आहे. प्रति रोप ४० रुपये असा दर आहे.

पुसद, दिग्रस भागांतील शेतकऱ्यांना सुमारे १४ हजार रोपांची विक्री केली आहे. तसेच बुकिंगही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. हा अतिरिक्‍त उत्पन्नाचा पर्याय ठरला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी विभाग- आत्मा प्रकल्पाचे संचालक संतोष डाबरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर बोंडे यांचे मार्गदर्शन अमोज यांना लाभले आहे. नाशिक येथे यंदाच्या जूनमध्ये जागतिक आदिवासी दिनादिवशी झालेल्या कार्यक्रमात अमोज यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com