Agriculture Robots : एकाच वेळी अनेक कामे करणारा यंत्रमानव विकसित

Agriculture Technology : अतिसघन आणि जैवविविधतेने भरपूर अशा एकत्रित सहपरिस्थितिकी (सायनेकोकल्चर) शेतीमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात. अशा कामांसाठी कुशल मजूर मिळणे, त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असणे तसे शक्य नाही.
Agriculture Robot
Agriculture RobotAgrowon

Success Story : सहपरिस्थितिकी (Synecoculture) ही शेतीची नवी पद्धती असून, त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती प्रजातींची एकाच वेळी वाढ केली जाते. या सर्व वनस्पती अधिक घनतेने (प्रति एकरी अधिक बियाणे संख्या ठेवून) एकत्रित वाढवल्या जातात. त्यामुळे ही पद्धती नेहमीच्या आंतरपीक किंवा मिश्रशेतीपेक्षा वेगळी ठरते.

यात लागवड केल्या जाणाऱ्या वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या वाढीचे वेगळे प्रकार, वेगवेगळ्या हंगामातील वेगवेगळ्या वेगाने वाढणाऱ्या वनस्पती एकाच जमिनीवर एकत्र लावणे यामुळे अर्थातच ही अत्यंत गुंतागुतींची पद्धती आहे.

कारण त्यातील प्रत्येक कामे वेगवेगळ्या वेळी येतात. प्रत्येक वनस्पतीनुसार करावयाचे वेगळे काम आणि त्या बाबत त्वरित निर्णय घेणे यासाठी अत्यंत कुशल व हुशार मनुष्यबळ लागते. या तंत्रामध्ये काम करण्यासाठी आपल्याकडे फारशी यंत्रेही उपलब्ध नाहीत.

दुसरी बाब म्हणजे अधिक घनतेने लागवड केली जात असल्यामुळे आतून यंत्रे चालविण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक राहते. त्यामुळे शेतकरी याकडे वळण्याची शक्यताच कमी होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी वासेदा विद्यापीठातील संशोधकांनी एक यंत्रमानव (रोबोट) तयार करण्यात यश मिळवले आहे.

हा रोबो बिया पेरणे, त्यांची योग्य वेळी छाटणी करणे आणि अधिक घनदाट पानांच्या गर्दीमध्येही उत्पादनाची काढणी करणे अशी अवघड वाटणारी कामे करू शकणार आहे. त्याचे लहान, लवचिक शरीर या कामामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकल पीक पद्धतीपेक्षा सायनेकोकल्चर या प्रकारची शेती अधिक शाश्‍वत आणि कार्बन उदासीन ठरणार आहे.

Agriculture Robot
Robot In Agriculture : भारतीय शेतीला एआय आणि रोबोट सावरतील...

सहपरिस्थितिकी (सायनेकोकल्चर) या शेती पद्धतीचा पुरस्कार करण्यामध्ये डॉ. मासातोशी फुनाबाशी हे सोनी कॉम्प्युटर सायन्स लॅबोरेटरीजमध्ये कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ सर्वांत आघाडीवर आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची एकत्रित आणि अधिक घनतेने वाढ केली जाते.

यातून उच्च दर्जाची जैवविविधता निर्माण होऊन त्याचा एकमेकांना फायदा होतो. यालाच सहपरिस्थितिकी असे म्हणतात. यामध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या वनस्पतींची वाढ केली जाते. साधे यंत्रमानव येथे फारसे उपयोगी ठरत नाही.

उलट त्यांच्या हालचाली व हाताळणीमुळे वनस्पती व उत्पादनाला धोका पोहोचण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीमध्ये शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या लक्षात घेऊन, त्या दूर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे यंत्रमानव विकसित करण्यात येत आहेत.

त्यासाठी वासेदा विद्यापीठातील सहायक प्राध्यापक ताकुया ओतानी यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचा गट सस्टेनेर्जी कंपनी आणि सोनी सीएसएल यांच्या सहकार्याने काम करत होता. त्यांनी एकत्रितरीत्या नवा रोबोट आरेखित केला असून, त्याचे नाव ‘सायनरोबो’ (SynRobo) असे ठेवले आहे. यातील Syn याचा अर्थ एकमेकांसोबत विशेषतः मानवासोबत असा आहे. हे यंत्रमानव शेतकऱ्यांना शेतीमधील वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी मदत करतील.

सोलर पॅनेलखाली येणाऱ्या अर्धवट सावलीमुळे वाया जाणाऱ्या जागेचा लाभ घेण्यासाठी अशा जागेवर सायनेकोकल्चर पद्धतीने पिकांची वाढ केली जात आहे. त्यामध्ये या रोबोटच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या संशोधनाविषयीची माहिती कृषिशास्त्र (खंड १३, अंक एक) मध्ये प्रो. अत्सुयो ताकानिशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका लेखाद्वारे दिली आहे.

...असा आहे हा रोबोट

ताकुया ओतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, असमान आणि खड्ड्याखड्ड्यांच्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे हालचाली करण्यासाठी चार चाकी रचना केली आहे. त्याचे हात आवश्यकतेनुसार लहान मोठे होऊ शकतात. तो उतारावरही चालू शकतो.

आजूबाजूविषयी माहिती मिळण्यासाठी त्यामध्ये ३६० अंशांमध्ये पाहणारा कॅमेरा असून, भोवतीच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीची तो नोंद घेऊ शकतो. त्याच्या हातासोबत वेगवेगळे उपकरणे व शेती उपयोगी अवजारे जोडलेली आहेत. उदा. अॅन्कर्स (छिद्रे पाडण्याचे यंत्र), छाटणीची कात्री, काढणीचा पूर्ण सेटअप इ. हा रोबो समोरच्या झाडाचा प्रकार आणि त्याला कोणत्या कामाची गरज आहे, हे ओळखून त्यानुसार त्यावरील कामे पूर्ण करतो.

- वरील कामांसोबत नवीन बियांचे पेरणी करण्याचे कामही तो अत्यंत कार्यक्षमपणे करतो. त्यासाठी एकसमान आकाराचे बीजगोळे तयार करण्यात येतात. म्हणजेच बियांचा आकार वेगवेगळा असला तरी सर्व बीजगोळ्यांचा आकार समान ठेवला जातो. त्यामुळे बियांच्या पेरणीचे काम सहजपणे करता येते.

- माणसांना साह्य करण्यासाठी त्याची रचना झालेली असल्यामुळे तो वेगवेगळी अवजारे चांगल्या प्रकारे वापरू शकतो. एका कामापासून दुसऱ्या कामाकडे तो आपोआप वळू शकतो.

- साध्या कंट्रोलरवर चालणाऱ्या रोबोटच्या तुलनेमध्ये हा रोबोट येणारे अडथळे ५० टक्के अधिक चांगल्या प्रकारे पार करतो, तर कामासाठीच्या वेळेमध्ये ४९ टक्क्यांनी बचत करतो. हा रोबोट सामान्य शेतीमध्येही काम करू शकतो आणि सायनेकोकल्चरमध्येही काम करू शकतो.

Agriculture Robot
Robot In Farm : रोबोटमुळे शेतीचे चित्र बदलून जाईल...

- सस्टेनेर्जी कंपनी सध्या हे तंत्रज्ञान व्यावसायिक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जपानमध्ये अतिघन शेतीमध्ये त्यांचा वापर केला जाईल. पुढील टप्प्यामध्ये वाळवंटीकरणाकडे झुकत चाललेल्या केनिया आणि अन्य देशांमध्ये त्यांचा वापर वाढविण्यात येणार आहे.

-शाश्‍वत शेतीतील यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्या निर्मितीसाठी अधिक सातत्याने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी शाश्‍वत शेती तंत्राकडे नक्कीच वळतील, यात शंका नाही. भविष्यात अतिघन आणि जैवविविधतेने परिपूर्ण अशा सहपरिस्थितिकी (सायनेकोकल्चर) शेतीला चांगले दिवस येतील. त्यात अशा तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा असेल, असा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.

या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी वासेदा विद्यापीठाने प्रसारित केलेला हा व्हिडिओ उपयोगी ठरू शकेल. https://youtu.be/Li०FFw०shQU

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com