Blind Bull : अंध असूनही `सोन्या` करतोय शेती सेवा

पाच वर्षांचा असल्यापासून तो शेतीच्या कामात मदत करू लागला. दरम्यानच्या काळात त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल्याने पशूतज्ज्ञांनी मांस वाढल्याचे कारण देत दोन्ही डोळे काढण्याचा सल्ला दिला आणि तो कायमचा अंध बनला. वाळूज (ता.मोहोळ,जि.सोलापूर) येथील इंद्रसेन गोरख मोटे यांच्याकडील जातिवंत खिलार सोन्या बैलाची ही व्यथा. पण सोन्यावरील प्रेमापोटी इंद्रसेन मोटे यांनी त्याचा मायेने सांभाळ केला आहे.
Khillar Bull
Khillar BullAgrowon
Published on
Updated on

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ- वैराग मार्गावर वाळूज येथे अगदी रस्त्यालगत इंद्रसेन गोरख मोटे (Indrasen Mote) यांची बारा एकर शेती आहे. यामध्ये दहा-दहा गुंठे कडवळ, मका (Maize Cultivation) अशी चारापिके (Fodder Crop) आलटून पालटून ते घेतात. याचबरोबरीने सोयाबीन (Soybean), तूर (Tur), उडीद (Black Gram), ज्वारी आणि ऊस लागवड (Sugarcane Cultivation) आहे. इंद्रसेन यांच्या वडिलांना खिलार बैलांची (Khillar Bull) आवड. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दोन खिलार बैल होते. त्यामुळे इंद्रसेन यांनाही लहानपणापासूनच खिलार बैलाचा नाद लागलेला. पुढे इंद्रसेन यांनी सातवीतून शाळा सोडून शेती सुरु केली आणि त्यात खिलारबैलाचा नाद केला. त्यांनी खिलार गाई आणि बैलांचा चांगला गोठा तयार केला. खिलार जनावरांचा नाद करावा तर इंद्रसेन यांनीच, इतकं प्रेम आणि जीव इंद्रसेन आपल्या बैलाला लावत. त्यामुळे जिवापाड जपलेली, कायम तरावट, रुबाबदार आणि देखणे खिलार बैल त्यांच्या गोठ्यात आजही आहेत. (Sonya The Blind Khillare Bull)

Khillar Bull
रात्रीत वधारला खिलार बैलांचा भाव

...अन सोन्याचे डोळे गेले

घरच्या गाईच्या पोटी २००५ मध्ये सोन्या बैल झाला. पुढे तीन वर्षांनी सोन्या हाताला आला. तो कामाला चालू लागला. २०१० पर्यंत तर तो शेतीकामात चांगलाच तयार झाला. पण अचानकपणे एकेदिवशी शेतामध्ये काम करताना सोन्याच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी गळत असल्याचे दिसले. तेव्हा इंद्रसेन यांनी गावातील पशुतज्ज्ञ डॅा. श्रीहरी शिनगारे यांना दाखवले. सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे डोळे काढून शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यावेळी इंद्रसेन यांना क्षणभर धक्का बसला. पण सोन्याच्या प्रेमापोटी ते सावरले. काहीही करा, पण त्याला हा त्रास व्हायला नको, असे त्यांनी तज्ज्ञांना सांगितले. शेवटी डॅा. शिनगारे, डॅा. सचिन मोटे यांनी सोन्याचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यावेळी अनेकांनी हा सोन्या आता शेती कामाचा नाही, विकून टाक, कशाला सांभाळतो, असा सल्ला दिला. पण या प्रसंगाने सोन्यावरचा त्यांचा जीव उलट अधिक वाढला. त्याला बसून खाऊ घालू, पण त्याला दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही, असं इंद्रसेन यांनी ठरवलं. आज १७ वर्षे झाली, त्याच्यावरील त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

Khillar Bull
खिलार बैलांच्या मागणीत वाढ

....म्हणून सोन्या राबतो

सोन्याचे दोन्ही डोळे गेले, पण डॅाक्टरांनी त्याच्या आरोग्यासाठी सल्ला दिला. त्याच्या अंगातून सतत पाणी निघायला हवे. अर्थात, त्याला घाम यायला हवा, तरच त्याची तब्येत चांगली राहील,त्याला कामाची सवय ठेवा, असे सांगितले. पण अंध असल्याने तो कितपत आणि कसं शेती काम करणार, पण त्याच्या आरोग्यासाठी ते आवश्यकच होते. त्यामुळे जमेल तसं इंद्रसेन यांनी त्याला उठायला, चालायला शिकवलं. हळू-हळू औतावरही कामाला जुंपला. अगदी नांगरणी, कोळपणी अशी सर्व कामे सोन्या करतो, पण तेवढ्यापुरतंच. त्याला त्रास होईल, अवजड होईल, असं कोणतंही काम त्यांनी दिलं नाही. या जेमतेम कामामुळेच आज एवढ्या वर्षानंतरही त्याची तब्येत चांगली आणि ठणठणीत आहे.

इंद्रसेन हेच त्याचे `डोळे`

इंद्रसेन आणि सोन्यात एक नातं तयार झालं आहे. त्यांच्या आवाजावरून, दिशा आणि खाणाखुणांवर तो चालतो, किंबहुना मालक हेच त्याचे `डोळे` आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरच त्याची उठबस आणि चालणं होतं. शेतातल्या कामावेळी किंवा इतरवेळी काही खुणांवर तो अगदी बिनदिक्कत चालतो. त्यासाठी इंद्रसेन यांनी काही खुणा त्यासाठी तयार केल्या आहेत. अर्थात, सोन्याला बोलण्यासाठी त्यांची भाषाच म्हणा, त्यानुसार ये... म्हटलं की अलीकडे, सर म्हटलं की पलीकडे, ऐक म्हटलं की उभे रहा आणि हौ...म्हटलं की पुढे काही तरी खड्डा किंवा अडथळा आहे, हे सोन्याला समजतं.

मायाळू `सोन्या`

एवढ्या वर्षानंतर सोन्या आणि मोटे कुटुंबीयांचे एक नातं तयार झालं आहे. घरातील लहान मुले किंवा कोणीही त्याच्याजवळ गेलं तरी तो साधं मुसमुसतही नाही की शिंग उगारून अंगावर येत नाही. इतकी माया तो करतो. आज इंद्रसेनच नव्हे, तर त्यांच्या पत्नी सौ. मनिषा, मुलगी साक्षी, सानिका आणि मुलगा शिवम यांनाही सोन्याचा चांगला लळा लागला आहे. आपल्याच घरातील एक सदस्य समजून ते सगळे सोन्याची काळजी घेतात.

जातिवंत कोसा खिलार...

सोन्याशिवाय इंद्रसेन यांच्याकडे आणखी दोन कोसा खिलार बैल आहेत. त्याशिवाय तीन खिलार गाई आहेत. केवळ जातिवंत खिलार सांभाळण्याचा आणि तो वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खिलार जातीविषयी त्यांना अधिक जिव्हाळा आहे. खिलार बैल दिसायला सुंदर, देखणा तर असतोच, पण कामाला चलाख, चपळ आणि बुद्धीने हुशार असतो. त्यातही कोसा खिलार बैलाला सर्वाधिक पसंती असते. त्यांच्याकडे अशी दोन बैल आहेत.

बैलांचा रोजचा खुराक

सोन्यासह अन्य दोन खिलार बैल मोटे यांच्याकडे आहेत. या तीनही बैलांचा खुराक ठरलेला आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत त्याचं वेळापत्रक ठरवलं आहे. पहाटे शेण-झाडलोट झाली की, सकाळी सात वाजता पाण्याच्या बरोबरीने सरकी पेंड, मका भरडा, पशुखाद्याचे एक किलो मिश्रण आणि चारा दिला जातो. त्यानंतर नऊ वाजता कडवळ, मका प्रत्येकी एक पेंढी, ओला आणि सुका चारा दिला जातो. त्यानंतर आराम होतो, पुन्हा दुपारी चार वाजता पाणी पाजले जाते. त्यानंतर पाच वाजता प्रत्येकी एक पेंढी ओला आणि सुका चारा दिला जातो. सायंकाळी सात वाजता सरकी पेंड, मका भरडा, पशूखाद्य यांचे एक किलो मिश्रण आणि चारा बैलांना दिला जातो. रात्री नऊ वाजता प्रत्येकी एक पेंढी ओला आणि सुका चारा दिला जातो.

उत्पन्नासाठी बैलभाड्याचा स्रोत

मोटे यांच्याकडे दोन जातिवंत कोसा खिलार बैल आहेत. आपल्या घरच्या शेतीतील कामासह गावातील अन्य शेतकऱ्यांकडे सकाळी नऊ ते पाच या वेळेत शेतीकामासाठी ते जातात. बैलांच्या साहाय्याने पेरणी, कुळवणी, नांगरणी, कोळपणी ही कामे करतात. कोणतंही काम असो, त्यासाठी एका दिवसाला २००० रुपये भाडे घेतात. महिन्यातून किमान १० ते १२ दिवस त्यांना हे काम मिळतं. शेती आणि भाड्यातून मिळणारे उत्पन्न यावरच मोटे यांचे कुटुंब चालतं.

रेतनासाठी खिलार वळू

पहिल्यापासून इंद्रसेन यांना जातिवंत खिलारची आवड आहे, ही जात वाढली पाहिजे, असं त्यांना वाटतं. मूळात त्यांच्याकडेही जातिवंत खिलार बैल आहेत. त्यातही अगदी दुर्मिळ अशी कोसा खिलार वळू त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गाईंच्या रेतनासाठी त्यांच्याकडे येतात. एका गाईला रेतनासाठी ११०० रुपये घेतात, महिन्यातून किमान १५ गाईंना रेतन केले जाते. या पैशातून बैलांचा खुराक आणि अन्य खर्च मोटे भागवतात.

लोकांना कुतूहल

सोन्याला दोन्ही डोळे नसतानाही तो बैलगाडी, पेरणी, कोळपणीला चालत आहे, असे प्रत्यक्ष दिसल्यावर परिसरातील शेतकरी आवर्जून मोटे यांच्याकडे येऊन भेट देतात, सोन्या आणि त्याला सांभाळणाऱ्या इंद्रसेन यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देतात. एकीकडे आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारी आजच्या पिढीतील मुलं आणि दुसरीकडे मुक्या जनावरावर जिवापाड प्रेम करणारे इंद्रसेनसारखे प्रेमळ शेतकरी, हा विरोधाभास खरोखरंच जगण्याचं तत्वज्ञान सांगून जातो.

‘‘मला तर पहिल्यापासूनच खिलार जनावरांची आवड आहे. मुकी जनावरं, ही पण माणसंच आहेत. त्यांना बोलता येत नाही, म्हणून काय झालं. आपण जीव लावला की, तीही जीव लावतात.
इंद्रसेन मोटे, ९८२३५२१४०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com