कोल्हापूर ः शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या निर्णयानंतर चपळ असणाऱ्या खिलार बैलांच्या किमती एका रात्रीत अनेक पटीने वाढल्या आहेत. ज्या बैलाला २० ते ३० हजार रुपयेसुद्धा किंमत येत नव्हती, त्याची किंमत आता लाखाच्या पटीत गेली आहे. ज्यांच्याकडे जातिवंत खिलार आहेत त्यांच्याकडे दूरध्वनीचा ओघ सुरू झाला असून, लाखो रुपये किमती देऊन खिलार बैल खरेदी करण्याची तयारी शौकिनाबरोबर शेतकऱ्यांनीही दाखवली आहे.
खिलारला मागणी नसल्याने कसेतरी व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका रात्रीत व्यस्त करून सोडले आहे. जातिवंत खिलार सध्या नामशेष होत आहे. अगदी कमी शेतकऱ्याकडेच जातिवंत खिलारची पैदास होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउनचे सावट असल्याने जनावरांचे व्यवस्थापन करण्यास येणाऱ्या अडचणी व मागणी नसल्याने अनेक पशुपालकांनी मिळेल त्या किमतीत खिलार जनावरांची विक्री केली.
शर्यती बंद असल्याने खिलार जनावरांचे व्यवस्थापन करणे कठीण होऊन गेले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने खिलारचे संगोपन करणाऱ्यांमध्ये आनंदाचे भरते आले आहे. ज्यांच्याकडे खिलार जनावरे आहेत त्यांच्याकडे शेकडो शेतकरी, शर्यत शौकीन, आदींनी चौकशीस सुरुवात केली असून, लाखो खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.
जनावरांचे बाजार तेजीने गजबजणार येणाऱ्या आठवड्यात बहुतांशी जनावर बाजारांमध्ये खिलार जातीचे बैल विक्रमी भावात विकले जातील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. कुस्ती शौकीन व शेतकऱ्यांनी येणाऱ्या जनावरे बाजारात खिलारचा शोध घेण्यासाठी नियोजन केले आहे. तत्पूर्वीच ओळखीतल्या पशुपालकांकडून जातिवंत जनावरे घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
आज शुक्रवार (ता. १७) सकाळपासून फक्त खिलारच्या चौकशीसाठी राज्यभरातून फोन येत आहेत. येत्या काही दिवसांत मागणी वाढण्याची शक्यता आहे. - डॉ. नितेश ओझा, खिलार गोवंश पालक
न्यायालयाने शर्यतींना अटी-शर्तीं परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तातडीने शौकीन खिलार खरेदीसाठी गडबड करू लागले आहेत. जातिवंत खिलारसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे ‘‘जनावर दाखवा, पसंत पडल्यास तुम्ही सांगाल त्या किमतीने खरेदी करतो’’ अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. येणाऱ्या काळात गेल्या काही वर्षांत मिळाली नव्हती, इतकी किंमत खिलारला मिळण्याची शक्यता आहे. - अतुल बाबर, गोपालक, विटा, जि. सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.