गोपाल हागे
बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील मेरा खुर्द परिसरात दुग्धव्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची जोखीम वाढल्याने या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना पर्यायी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे. प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर गावातील विजय पडघान यांनी स्वतःकडील व शेतकऱ्यांकडील मिळून दिवसाला ९०० लिटरपर्यंत दूध संकलनापर्यंत मजल मारून या व्यवसायातून आर्थिक सक्षमता मिळवली आहे.
निसर्गाच्या अनियमिततेचा फटका पीक उत्पादनाला सातत्याने फटका बसतो आहे. पर्याय म्हणून व जोखीम व्यवस्थापन म्हणून शेतकरी पूरक व्यवसायांकडे वळला आहे. बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील मेरा खुर्द हे १२ हजार लोकसंख्येचे गाव. पावसावर अवलंबून शेती असल्याने खरीप हाच मुख्य हंगाम आहे. थोडीबहुत सिंचनाची सोय असलेले शेतकरी खरीप व रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने साधतात. उर्वरित शेतकऱ्यांना एकाच पिकावर वर्षभराचा खर्च भागवावा लागतो. वेळप्रसंगी मिळेल ते कामही करावे लागते. याच शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाचा हुकमी पर्याय आता मिळाला आहे. कधीकाळी दुधाची टंचाई राहणाऱ्या या गावपरिसरात दिवसाला पाच ते सहा हजार लिटर दूधसंकलन होत आहे. दुधाळ जनावरांची संख्या वाढते आहे. दुधाची उपलब्धता निर्माण झाल्याने खासगी डेअऱ्यांकडून संकलन केंद्रे सुरु झाली आहेत. मेरा खुर्द पंचक्रोशीतील गावे या व्यवसायाच्या मार्गावर निघाली आहेत.
पडघान यांचा दुग्ध व्यवसाय
मेरा खुर्द गावातील विजय पडघान यांची आदर्श दुग्ध उत्पादक अशी परिसरात ओळख तयार झाली आहे. कोरोनाच्या काळात म्हणजे २०२० च्या दरम्यान त्यांनी गावातील सहकाऱ्यांकडून गाय खरेदी करीत या व्यवसायात पाऊल ठेवले. तीन वर्षांत गायींची संख्या टप्प्याटप्याने वाढवत नेली. आज एक जर्सी, आठ एचएफ व एक साहिवाल अशा १० गायी व चार म्हशी एवढे पशुधन त्यांच्याकडे आहे. हरियाना व लोणी (जि. नगर) येथून गायी आणल्या आहेत. हा व्यवसाय विस्तारण्यासाठी चिखली येथील अनुराधा अर्बन को-ऑप.. बँकेचे साह्य मिळाले. त्याद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत १० लाखांची आर्थिक मदत मिळाली.
व्यवसायाची वाटचाल
पडघान यांच्या व्यवसायाची वाटचाल सांगायची तर १२ एकर शेती आहे. पूर्वी त्यांची शेतीतील पूर्ण भिस्त खरीप हंगामावरच होता. सोयाबीन व तूर अशी त्यांची पीक पद्धती होती. आजही तीच कायम आहे. ते पूर्वी कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालवायचे. आज त्याची जबाबदारी मुलाकडे देत त्यांनी
पूर्णवेळ दुग्धव्यवसायात लक्ष घातले आहे. प्रति दिन १०० ते १२० लिटरपर्यंत दूध संकलन होते.
याशिवाय अन्य शेतकऱ्यांकडील चारशे लिटर दुधाचे संकलन ते करतात. एकूण ९०० लिटरपर्यंतचे दूध संकलन होऊन ते पारध येथील खासगी डेअरीला पुरविले जाते. त्यास ‘फॅट’ व ए‘सएनएफ’वर प्रति लिटर ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो.
गोठा व्यवस्थापन (ठळक बाबी)
-विजय सातत्याने कृषी प्रदर्शने, जनावरांच्या बाजारांना भेटी देतात. नवे तंत्र, सुधारित व्यवस्थापनाची माहिती घेऊन त्याचा अवलंब ते करतात.
-जातिवंत कालवडींची पैदास होण्यासाठी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनातून लिंग वर्गीकृत वीर्य (सेक्स सॉर्टेड सीमेन) चा वापर करतात. त्याच्या प्रति कांडीची किंमत १६०० ते २२०० रुपये.
-शेडमधील गोठ्यासह मुक्त संचार पद्धतही आहे. गव्हाण, पिण्यासाठी २४ तास पाणी, रबरी चटई, पंखे, उन्हाळ्यात तापमान राखण्यासाठी फॉगर्स आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे.
-दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर.
-स्वच्छतेवर जोर. दररोज गायींना स्वच्छ पाण्याने धुतले जाते. यासाठी एचटीपी कॉम्प्रेसर यंत्राचा वापर.
तीन वर्षांच्या अनुभवातून काही आजारांची लक्षणे तातडीने समजू लागली आहेत. त्याआधारे प्राथमिक उपचार स्वतः करतात.
-विविध उद्देशाने देशी कोंबडीपालनही केले आहे. त्यांच्यापासून दररोज अंडी मिळतात. प्रति नग १० रुपये दराने त्यांची विक्री होते. कोंबड्या गोचिड निर्मूलनासाठी उपयोगी ठरतात. शेण बारीक करण्याचे कामही करतात.
मुरघास निर्मिती
दुग्ध व्यवसायात चारा व पशुखाद्याचा खर्च सर्वाधिक राहतो. यासाठी विजय यांनी सुपर नेपिअर, द्विदलवर्गीय तसेच मेथीघास आदी चारा पिकांची तसेच दोन एकरांत मका लागवड केली आहे. त्यामुळे गायींना सकस चारा मिळतो. हा भाग कोरडवाहू असल्याने चाऱ्याची शाश्वत सोय व्हावी यासाठी मुरघासही बनविण्यात येतो. मागील वर्षी ८० टन एवढे त्याचे उत्पादन केले. त्यातील ४० टन शिल्लक आहे.
पंचक्रोशीत तयार होतेय गोकूळ
मेरा खुर्द गावाच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये दुधाळ गायींची संख्या वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. सद्यःस्थितीत ४०० हून अधिक गायी या भागात असल्याचे तत्कालीन पशुधन विकास अधिकारी डॉ. दत्तात्रेय मोरे सांगतात. या भागातील शेतकऱ्यांना गायींचे व्यवस्थापन, तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येत आहे. त्यासाठी ‘व्हॉटस ॲप ग्रुप’ही तयार केले आहेत असे डॉ. मोरे सांगतात.
उत्पन्नवाढीसह पिकांना फायदा
विजय सांगतात की दुग्धव्यवसायातून शेतीचे एकूण उत्पन्न सुमारे २५ टक्क्याने वाढले आहे.
शेणखत वर्षाला ५० ते ७० ट्रॉलीपर्यंत उपलब्ध होत आहे. त्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढून सोयाबीन, तूर आदी पिकांची गुणवत्ताही वाढली आहे.
संपर्क - विजय पडघान- ९८५०८०८७०३
डॉ. दत्तात्रेय मोरे- ७५८८६८९८५०
(पशुधन विकास अधिकारी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.