Dairy Business : अल्पभूधारक शेतीला मिळाला दुग्धोत्पादने निर्मितीचा आधार

Milk Business : हिंगोली जिल्ह्यातील बोरी सावंत येथील राजू सावंत यांची दोन एकर शेती आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचा स्रोत म्हणून त्यांनी दुग्धप्रक्रियेचा व्यवसाय निवडला.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

Milk Business Update : हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार हे औंढानागनाथ आणि वसमत तालुक्यांच्या सीमेवरील प्रसिद्ध बाजारपेठेचे ठिकाण आहे. परिसरातील अनेक गावांतील शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करतात.

त्यामुळे जवळा बाजार येथे दूध संकलन तसेच प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. या भागातील प्रथितयश दुग्ध प्रक्रिया उद्योजक भगवान सावंत यांच्या मार्गदर्शनातून भागातील अनेक शेतकरी दुग्धप्रक्रिया उद्योगाकडे वळले. त्यापैकीच गावातील राजू काशिनाथ सावंत हे एक आहेत.

परभणी येथील महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी संपादन केली आहे. त्यांची तेथून काही किलोमीटरवर असलेल्या बोरी सावंत येथे दोन एकर शेती आहे. सहा सदस्यांचे कुटुंब आहे. अल्पभूधारक असल्याने केवळ शेतीतील उत्पन्नावर भागणार नव्हते.

त्यामुळे राजू यांनी गंगाखेड (जि. परभणी) येथे एका दुग्ध प्रक्रिया उद्योगात नोकरीचा अनुभव घेतला. त्यानंतर २०१३ च्या दरम्यान एक लाख रुपये कर्जरूपी भांडवल गुंतवून गावातच (जवळा बाजार) दूध संकलन केंद्र व प्रक्रिया उद्योग सुरू केला.

Dairy Business
Milk Fat : दुधातील स्निग्धांशावर परिणाम करणारे घटक

दूध संकलन व उत्पादने

जवळा बाजारसह परिसरातील बोरी सावंत, करंजाळा, नालेगाव, मटकऱ्हाळा, पुरजळ, रांजाळा, कळंबा, तपोवन आदी सात ते आठ गावांतील सुमारे ११७ दूध उत्पादकांकडून २०१६ ते २०२० या कालावधीत दररोज २००० लिटर दूध संकलित व्हायचे.

पैकी एक हजार लिटर दूध परभणी येथील शासकीय दुग्धशाळेला पुरविले जायचे. उर्वरित दुधापासून प्रक्रिया पदार्थ तयार केले जायचे. गेल्या वर्षी दुग्धशाळेतील संकलन बंद केले असून, वर्षभराची सरासरी पाहात आजमितीला दोन वेळेचे मिळून प्रति दिन ३०० पासून ५०० लिटरपर्यंत दूध संकलित होते.

राजू यांची दोन दूध संकलन केंद्रे आहेत. जवळा बाजार येथे १२०० चौरस फूट जागेत उत्पादने तयार केली जातात. संकलन केंद्र व उत्पादनाचे ठिकाण येथे मिळून मिल्क टेस्टिंग मशिन, क्रीम सेपरेटर, बल्क कुलर, वजन काटे, दूध साठवणुकीसाठी कॅन, आधुनिक खवा निर्मिती यंत्र, पनीर मोल्ड आदी सामग्री आहे.

फॅटच्या प्रमाणात म्हशीच्या दुधाची ४९ रुपये, तर गायीच्या दुधाची प्रति लिटर ३७ रुपये दराने खरेदी केली जाते. संबंधित शेतकऱ्यांना दहा दिवसांनी दुधाचे पेमेंट केले जाते.

उत्पादने, विक्री व्यवस्था

दररोज बाजारपेठेतील मागणीचा विचार करून पनीर, दही, ताक, लोणी, खवा, तूप, बासुंदी, श्रीखंड, पेढे आदी उत्पादने तयार केली जातात. ग्राहकांकडून या उत्पादनांना चांगली मागणी असते.

जवळा बाजार तसेच परभणी येथील भाग्य नगर अशा दोन ठिकाणी भाडेतत्त्वावर दोन विक्री केंद्रे घेतली आहेत. तसेच हिंगोली येथे दोन वितरकही नेमले आहेत. नांदेड येथेही काही काळ वितरकामार्फत विक्री व्हायची.

मात्र तात्पुरती ती थांबविली आहे. दररोज १०० ते १५० लिटर दुधापासून २० ते २५ किलो खवा तयार होतो. त्याची किरकोळ विक्री ३०० रुपये दराने होते. खव्यापासून दररोज ४ ते ५ किलो पेढे तयार होतात.

विशिष्ट प्रमाणात साखर, वेलची यांचा वापर तयार केलेल्या या पेढ्यांना ग्राहकांकडून मागणी असते. प्रति किलो ३५० रुपये त्याचा दर आहे. महिनाभरात ५० ते ६० किलो तूप निर्मिती होते. गायीच्या तुपाची ६०० रुपये, तर म्हशीच्या तुपाची ७०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

पाचशे ग्रॅम, २०० ग्रॅम, १०० ग्रॅम वजनामध्ये बरणी पॅकिंग होते. याशिवाय लोणी देखील कायम उपलब्ध असते. दररोज सरासरी ३० किलो, तर वर्षभरात पाच क्विटंल वा त्याहून अधिक पनीर तयार होते. याशिवाय दही, मठ्ठा, ताक आदी उत्पादनांची निर्मितीही सुरू असते.

देवळा बाजारापासून परभणी सुमारे ४० किलोमीटरवर आहे. तेथपर्यंत दररोज उत्पादने पोहोचविण्यासाठी राजू यांनी स्वतःची पीकअप व्हॅनदेखील घेतली आहे.

Dairy Business
Milk Production : दूध स्पर्धा आहेत महत्त्वाच्या...

उलाढालीचा आलेख उंचावला

केवळ लाख रुपये भांडवलापासून सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज २० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दहा वर्षांतील अनुभवातून व्यवसायातील बारकावे समजले आहेत. प्रक्रिया उत्पादने निर्मितीचे कौशल्य अवगत झाले आहे. व्यवसायातून चार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. वडील घरची शेती सांभाळतात.

अन्य शेतकऱ्यांकडील आठ एकर शेती देखील भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतली आहे. घरी दोन गायी आहेत. दुग्ध प्रक्रिया उद्योगातून सावंत कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. शिवाय प्रक्रियेव्यतिरिक्त दूध संकलनही सुरूच ठेवले आहे.

येत्या काळात अजून आधुनिकीकरणावर भर देणार आहे. या उद्योगाचा दूध उत्पादकांचाही मोठा फायदा झाला आहे. वर्षभर त्यांच्याकडील दुधाला मार्केट तयार झाले असल्याचे राजू यांनी सांगितले.

संपर्क - राजू सावंत, ९९७५२१७३०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com