निवडुंगाच्या जैविक कुंपणाने वन्यजीवांपासून पीक संरक्षण

वन्यप्राण्यांमुळे सततची होणारी शेताची नासधूस व होणारे आर्थिक नुकसान पाहता खापरवाडी बुद्रुक (जि. अकोला) येथील जगन बगाडे यांनी जैविक कुंपणाचा कमी खर्चाचा पर्याय शोधला. १० ते १२ फूट उंच झालेले निवडुंगाचे कुंपण सुमारे ५० एकरांवर चहूबाजूंनी उभारून कायमस्वरूपी विविध पिकांचे संरक्षण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
Cactus Fencing
Cactus FencingAgrowon
Published on
Updated on

अनेक भागांत वन्यजीवांचा उपद्रव (Wildlife Rampage) शेतीला मोठ्या प्रमाणात होतो. शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका (Financial Loss To Agriculture) बसतो. रातोरात उत्पादन फस्त करण्याची क्षमता या वन्यजीवांमध्ये असते. शेतकरी त्यांच्या बंदोबस्तासाठी शासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करतात. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही. खापरवाडी बुद्रुक (ता. अकोट, जि. अकोला) हा खारपाणपट्टा आहे. हरिण, रानडुकरे, माकडे आदींचा उपद्रव या भागात कमालीचा आहे. या जिवांना मारणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे प्राणी पिके खातात, शिवाय नासधूसही (Crop Damage) कमालीची करतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीसुद्धा शेतात राखणीला जावे लागते. एवढे करूनही पिकाचे पूर्ण संरक्षण (Crop Protection) होत नाही. शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याच्याही घटना आहेत. आर्थिक अडचणीमुळे मोठ्या क्षेत्रावर तार कुंपण करण्याचा खर्चही झेपावणे शक्य नसते.

Cactus Fencing
Crop Protection : आंबिया बहरातील फळांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

जैविक कुंपणाचे शोधले उत्तर

खापरवाडी बुद्रुकचे जगन प्रल्हाद बगाडे यांची स्वतःची २० एकर व कसायला घेतलेली ५० एकर शेती आहे. आई- वडील व मोठा भाऊ गोपाल असे कुटुंब आहे. भाऊ अकोट येथे चारचाकी संबंधित व्यवसाय सांभाळतात. शेतीचे व्यवस्थापन जगनच पाहतात. त्यांनाही वन्यजीवांचा खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी तार कुंपणासाठीचा खर्च एकरी ४० हजारांपेक्षा अधिक होता. शिवाय क्षेत्र मोठे असल्याने तो लाखाच्या घरात जाणार होता. अधिक विचार व अभ्यास करता निवडुंगाचे (कॅक्टस) कुंपण उपयोगी येऊ शकते हे ध्यानात आले. रानावनात वर्षानुवर्षे दिसणारे हे काटेरी झाड असून, कुठलेही जनावर त्यास खात नाही. तीक्ष्ण काटे असल्याने वन्यजीव त्याच्या आसपासही जात नाहीत.

निवडुंगाची झाली जणू तटबंदी

जगन यांनी मजुरांच्या साह्याने पहिल्या टप्प्यात छोट्या फांद्या लावल्या. कुठल्याही व्यवस्थापनाशिवाय झाडांची भरघोस वाढ झाली. शेताला चहूबाजूंनी जणू तटबंदी तयार झाली. आज सुमारे ५० एकराला हे कुंपण तयार झाले असून, झाडे १० ते १२ फूट उंच झाली आहेत. प्रत्येक दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे. झाडांचा बुंधा मजबूत झाला असून, कुठलाही प्राणी आत शेतात शिरण्याची हिंमत करीत नाही. परिणामी, पीक राखणदारीचे काम बंद झाले आहे. सहा- सात वर्षांपूर्वी ३० एकराला १५ हजार एवढाच खर्च त्यासाठी आला. कुंपणावर दोडका, कारले, वाल आदी वेलवर्गीय पिकांची लागवडही केली आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर जैविक कुंपण असलेले हे एकमेव उदाहरण असावे.

Cactus Fencing
Crop Protection साठी 'फेरोमोन सापळा कसा वापरायचा ? | ॲग्रोवन

शेतकऱ्यांनाही प्रेरणा

जगन यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेत तीन-चार वर्षांत ७५ ते ८० शेतकऱ्यांनी कमी खर्चात निवडुंगाचे कुंपण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना जगन यांनीच मोफत फांद्या देत लागवडीबाबत मार्गदर्शनही केले आहे.

कुंपणाचे झालेले फायदे

-वन्यजीवांचा त्रास संपला

-मृदासंवर्धन झाले.

-थंडीच्या लाटेत पिकाचे नुकसान कमी झाले.

-कीटकांचा त्रास कमी झाला.

-पूर्वी करवंदाचे कुंपण केले होते. मात्र ते लांब पसरत होते. त्या

तुलनेत निवडुंग उभे वाढत असल्याने अधिक फायदेशीर ठरले.

शेतीत वापरले तंत्र

विविध प्रयोग करण्यात जगन आघाडीवर असतात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळा व प्रशिक्षणांत ते मार्गदर्शक आहेत. शेतकऱ्यांना जैविक कीडनाशके निर्मिती, आधुनिक अवजारे, पूरक व्यवसायांबाबत प्रात्यक्षिकांसह ते मार्गदर्शन करतात. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचे ते तालुकाध्यक्ष आहेत. खारपाण पट्ट्यातील जमिनीतील पाणी क्षारयुक्त आहे. पण जगन व गावकरी यांच्या पुढाकारातून गावशिवारात जलसंधारणाची कामे झाली. पडीक जमिनीवर शासनाच्या मदतीने असंख्य शेततळी निर्माण झाली. कंटूर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग, उताराला आडवी पेरणी आदी तंत्रे शेतकऱ्यांनी अवगत केली. गावात आज २५ बोअरवेल्स आहेत. जगन यांच्याकडे आज गोडे पाणी आहे. महाजन यांच्या शेतातील बोअरलाही गोडे पाणी आहे. सन २०१८ मध्ये पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने गावाने सहभाग घेत १९ शेततळी घेतली. नाला खोलीकरण केले. त्यामुळेही शिवारात गोड्या पाण्याची उपलब्धता वाढली.

हरभरा पिकात प्रथम

संरक्षित सिंचनाची सोय झाल्याने या भागात हरभऱ्याची उत्पादकता एकरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी जगन यांनी या पिकाचे हेक्टरी ३३ क्विंटल उत्पादन घेत २०२०-२१ मध्ये पीकस्पर्धेत अकोट तालुक्यात प्रथम पुरस्कार मिळवला. सोयाबीनचे एकरी सात ते आठ क्विंटल तर कपाशीचे एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. लिंबाची पाचशे झाडे पाच वर्षांपूर्वी लावली आहेत.

पूरक व्यवसायातून उत्पन्नवाढ

बगाडे कुटुंब प्रक्रिया व्यवसायातूनही प्रगतिपथावर आहे. खारपाणपट्ट्यात त्यांनी २०१२ मध्ये मिनी डाळ मिल सुरू केली. या भागातील जवळपास २० ते २२ गावांमध्ये कुठेही डाळ मिल नसल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आता २०१६ मध्ये डाळ मिलचे मोठे युनिट उभारले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चार महिन्यांचा हंगाम त्यातून मिळतो. सहाशे रुपये प्रति क्विंटल दराने चारशे ते पाचशे क्विंटल डाळ तयार करून देण्यात येते. जैविक घटकांचा वापर करून पिकविलेल्या डाळींचे मार्केटिंगही जगन करतात. त्यांचा शेतकरी गट असून, अन्य गट एकत्रित करीत त्यांनी शेतकरी कंपनीची उभारणी केली आहे. गटाच्या माध्यमातून अकोट येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र चालवतात. दुग्ध, शेळीपालन, पीठ गिरणी, ट्रॅक्टर व अवजारे भाडेतत्वावर देणे हे व्यवसायही जोडीला करतात. त्यातून गावातील तरुणांनाही रोजगार निर्माण झाला असून, वर्षभर कुठले ना कुठले काम मिळत राहते असे जगन सांगतात.

संपर्क ः जगन बगाडे, ९९२२६२८०४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com