Silk Farming : रेशीम शेतीतून मिळाला ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

बुलडाणा जिल्ह्यातील राजगड येथील पंजाबराव बाबूसिंग जाधव यांनी रेशीमशेतीतून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनातून त्यांनी ‘लखपती शेतकरी’ होण्याची मान मिळविला आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

दिवसेंदिवस पारंपारिक पीकपद्धतींची (Traditional Crop) उत्पादकता कमी होत चालली आहे. या वर मात करण्यासाठी शेतकरी आता प्रक्रिया आणि पूरक व्यवसायांची चाचपणी करत उत्पन्नाचा शाश्वत स्रोत शोधत आहेत. राजगड (ता.मेहकर, जि.बुलडाणा) येथील पंजाबराव जाधव यांनी सोयाबीन (Soybean), तूर (Tur Cultivation) या पारंपारिक पीकपद्धतीस छेद देत २०२० मध्ये रेशीम शेतीत (Silk Farming) पाऊल टाकले. रेशीम विभागाची तांत्रिक मदत, कृषी विभागामार्फत पोकरातून (POCRA Project) आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. रेशीम उत्पादनातून (Silk Production) जिल्ह्यात एक नवीन ‘लखपती शेतकरी’ तयार झाला आहे. रेशीम उत्पादनातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत जाधव कुटुंबाला मिळाला आहे.

रेशीम शेती ठरली दिशादर्शक ः

जाधव कुटुंबीय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आधी दुग्ध व्यवसाय करत होते. जनावरांसाठी चांगल्या शेडच्या उभारणीकरिता कृषी विभागात एखादी योजना असेल तर पाहू या विचाराने श्री. पंजाबराव हे मेहकर येथील कृषी विभागात गेले. तेथील अधिकाऱ्यांनी जनावरांसाठी शेड उभारणीऐवजी रेशीम शेती करण्याचा सल्ला त्यांना दिला.

Silk Farming
Silk : चॉकी सेंटरमुळे शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात भर पडेल

राजगड गावशिवार हे जंगलाजवळ आहे. येथील वातावरण हे रेशीम शेतीला पोषक असल्याने विचारांती श्री. जाधव यांनीही रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने २०२० मध्ये चिंचाळा शिवारात आई लिलाबाई जाधव यांच्या नावावरील एक एकर शेतामध्ये तुतीची लागवड केली. कोष निर्मितीसाठी शेड उभारणीचे काम दुसरीकडे सुरू केले. तुतीचा पाला उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांतच रेशीम कोष उत्पादनाला सुरुवात केली. आतापर्यंत दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाच्या सहा बॅच त्यांनी घेतल्या आहेत. दर्जेदार रेशीम कोषाला जालना बाजारात विक्री केल्यानंतर सर्वोच्च ७५५ रुपये दर मिळाला. फक्त एक एकरातील तुती लागवडीतून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेण्याचे तंत्र त्यांना गवसले आहे. आजवर त्यांनी सुमारे पावणेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळविले आहे. रेशीम शेतीस सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायदेखील करून पाहिला. मात्र, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळाल्याने हे दोन्ही व्यवसाय बंद केले. आता रेशीम शेतीतच अधिक प्रयत्न करणार असल्याचे पंजाबराव सांगतात.

कुटुंबाचा आधी नकार, आता पाठबळ ः

पंजाबराव यांचा तुती लागवड करण्याचा निर्णय सुरुवातीला जाधव कुटुंबाला तितका आवडला नव्हता. घरच्या लोकांचे पाठबळ त्यांना मिळत नव्हते. मात्र, रेशीम कोष निर्मिती सुरु झाली, विक्रीपश्चात रेशीम कोषाला चांगले दर मिळू लागले तसे कुटुंबीयांचा विश्वास तयार झाला. आज आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ असे सर्वजण पंजाबराव यांच्या पाठीशी भरभक्कम उभे आहेत. तुतीचे क्षेत्र एक एकरावरून आता दोन एकर झाले आहे. त्यामुळे सलग बॅच घेण्यासाठी तुतीचा पाला काही दिवसांतच उपलब्ध होऊ शकेल, असे जाधव यांनी सांगितले.

Silk Farming
Silk Farming : अल्पभूधारक कुटुंबाने विणले रेशीम शेतीतून प्रगतीचे धागे

पोकराचे मिळाले पाठबळ ः

कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत कृषिपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. बुलडाणा जिल्ह्यातील ४४१ गावात ही योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये रेशीम शेतीचा समावेश असून कृषी विभाग आणि जिल्हा रेशीम कार्यालयाच्या संयुक्त सहकार्याने ही योजना राबविली जाते. या योजनेत तुती रोपवाटिका, तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य या घटकांसाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. श्री. जाधव यांना पोकरा अंतर्गत तुती लागवडीसाठी ३७,५०० रुपये आणि कीटक संगोपनगृह उभारणीसाठी १ लाख २६ हजार ४७९ रुपयांचे अनुदान मिळाले.

लखपती शेतकऱ्याचा मान ः

चिंचाला शिवारात जाधव एप्रिल, २०२१ मध्ये ५० बाय २१ फुटांचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले. रेशीम कार्यालयाकडून प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी २०० अंडीपुंजाची पहिली बॅच घेत रेशीम कीटक संगोपनास सुरुवात केली.

- पहिल्या बॅचपासून २०२ किलो ४९ ग्रॅम कोष उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो ४१५ दर मिळाला. पहिलीच कमाई ८४ हजार ३३ रुपयांची झाली. एका बॅचमध्ये २८ दिवसांत चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.

- दुसऱ्या बॅचमध्ये २०० अंडीपुंजांपासून ११२ किलो ४७ ग्रॅम कोष उत्पादन उत्पादन मिळाले. प्रतिकिलो ५७५ रुपये दराने कोष विक्री केली. त्यातून साधारण ६४ हजार ६७० रुपये मिळाले.

- तिसऱ्या बॅचमध्ये २०० अंडीपुंजांपासून १६७ किलो ४३ ग्रॅम कोष निर्मिती झाली. प्रतिकिलो ७५५ रुपये अशा सर्वोच्च दराने कोष विक्री झाली. त्यावेळी १ लाख २६ हजार ४१० रुपये उत्पन्न मिळाले. असे एक एकरातून वर्षभरात त्यांना २ लाख ७५ हजार ११३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

उत्पादित संपूर्ण रेशीम कोषाची जालना येथील बाजारात विक्री केली. रेशीम कोषापासून लाखांवर उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्याला रेशीम विभाग ‘लखपती शेतकरी’ म्हणून संबोधतो.

पंजाबराव बाबूसिंग जाधव, ९७६५२७५३८१

पंजाबराव जाधव यांना रेशीम शेतीत मिळालेले यश पाहून त्यांच्या भागातील आणखी ५ ते ६ शेतकरी पुढे आले आहेत. जाधव यांची एक एकराची मिळकत मोठी आहे. त्यांना रेशीम विभागाकडून प्रशिक्षण, तांत्रिक शिक्षण देण्यात आले. सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्या २४७ शेतकऱ्यांची २५९ एकरात तुती लागवड आहे. यंदा ९० नवीन शेतकरी या रेशीमशेतीसाठी पुढे आले आहेत. वर्षभरात २५ हजार अंडीपुंज वाटप झाले असून साडेसात मेट्रीक टन कोष उत्पादन झाले आहे. दिवसेंदिवस रेशीमशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.
सु. प्र. फडके, (रेशीम प्रकल्प अधिकारी, जि.बुलडाणा)
राजगड येथील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. सोयाबीन, तूर या पारंपरिक पीकपद्धतीला आता रेशीमशेतीसारखा शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे. अधिक उत्पादनासाठी रेशीमशेती सारखा दुसरा चांगला पर्याय नाही, हे पंजाबराव जाधव यांनी दाखवून दिले आहे. -
विठ्ठल धांडे, (कृषी पर्यवेक्षक, मेहकर जि. बुलडाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com