जलसुरक्षेसाठी तलावांचे संवर्धन

मागील काही लेखांत आपण सूक्ष्म पाणलोट क्षेत्र तसेच गावाच्या जलनियोजनबाबत चर्चा केली. या जलनियोजनातील महत्त्वाचा घटक म्हणजे गाव तलाव. या गाव तलावाचे व्यवस्थापन कसे करता येईल या बाबत आजच्या लेखात चर्चा करत आहोत.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुमंत पांडे

गावाच्या जलसुनिश्‍चिततेमध्ये तलावाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणूनच मागील काही शतकांमध्ये समाजाने हजारो तलावांची निर्मिती केली. देशात शेकडो हजारो तलावांची निर्मिती अकस्मात झाली नव्हती या मागे एक विचारधारा होती, तलाव निर्माण करणाऱ्यांची, याला आपण इकाइ म्हणूयात. तलाव निर्माण करणारे हे दहाच्या पटीत होते, या दोघांचे मिळून हजारो झाले आणि अक्षरशः हजारो, लाखो तलावांची निर्मिती झाली. तथापि, मागील सुमारे दोनशे वर्षांपासून यात वृद्धी करण्याऐवजी मोठे शून्य तयार झाले आहे.

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात किमान एक तरी तलाव आपल्याला पाहायला मिळेल. जलसंधारण आणि जलसंचयाचे हे एक महत्त्वाचे साधन होते. तलावाच्या प्रभाव क्षेत्रातील विहिरी या उर्वरित कालावधीत पाणी देत असत. अगदी पंधराव्या शतकापर्यंत लाखो तलाव बांधण्यात आले. तलाव बांधणारा एक निश्‍चित वर्ग होता आणि जमात होती, ज्यांच्याकडे हे पारंपरिक ज्ञान होते. राजा, समाज, महाजन आणि तज्ज्ञ मंडळी या तिघांच्या एकमुखी निर्णयाने तलावांची निर्मिती होत असे. हेच तलाव अनेक शतके देशाच्या पाण्याची गरज भागवत असत. स्थानिक गरज असो किंवा प्रवासी मार्गावरून जाणारे पशू, व्यापारी या सगळ्यांची गरज हे तलाव भागवत असत.

समाजाचे दुर्लक्ष, वाढती लोकसंख्या, नागरिकीकरण, यांच्या रेट्यामुळे आज या तलावांची दुरवस्था झाली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पूर्व विदर्भातील मालगुजारी तलाव. गोंडकालीन तलाव ही अनेक दशके पाण्याची आणि सिंचनाची व्यवस्था पूर्ण करत होती. आज यापैकी अनेक तलाव अस्तित्वातच नाहीत किंवा अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. आज भंडारा येथील मनीष राजनकर आणि अनेक समाजसेवक निःस्वार्थपणे यावर काम करत आहेत.

महाराष्ट्रात सुमारे ४०० नद्या आहेत. त्यांची एकूण लांबी जवळपास २०,००० कि.मी. इतकी आहे. राज्याचे वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे ४०० मिमी ते ६००० मिमीच्या दरम्यान आहे. महाराष्ट्राचे सरासरी पर्जन्यमान १०६७ मिमी इतके आहे. राज्यात जास्तीत जास्त पाऊस जून ते सप्टेंबरदरम्यान पडतो. यातील बहुतांशी पाऊस या कालावधीत ४० ते १०० दिवसांच्या दरम्यान पडतो.

महाराष्ट्राला सिंचनाची जुनी परंपरा आहे. आतासुद्धा अस्तित्वात असलेली ‘सिंचनाची फड पद्धती’ ही ३०० ते ३५० वर्षांपूर्वीची जुनी सिंचन पद्धत आहे. ही सिंचनाची सर्वांत किफायतशीर सिंचन व्यवस्थापन पद्धत आहे.

विहीर ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे.पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांनी केवळ २८ वर्षांच्या कार्यकालात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती काम केले. त्यातील त्यांचे जल क्षेत्रातील काम आजही देशाला नव्हे तर जगाला दिशादर्शक आहे. नळाद्वारे पाणी यायला सुरुवात झाल्यावर या जुन्या रचनांकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली आणि कालांतराने त्यावर अतिक्रमण किंवा गावकऱ्यांनी त्याची कचरा कुंडी केली. त्यामुळे या जलसाठ्यांची उपयुक्तता नष्ट झाली. तथापि हे जलसाठे पुन्हा वापरात आणणे शक्य आहे.

१९७२ मधील दुष्काळ आणि तलावांची निर्मिती :

१९७२ मधील दुष्काळाच्या कालावधीमध्ये अनेक गावांमधून गाव तलाव आणि माती नाला बांध तयार करण्यात आले. खरंतर त्या वेळेस अन्नाची मोठ्या प्रमाणावर टंचाई होती, तेव्हा उद्देश होता लोकांच्या हाताला काम देणे. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेची बीजे देखील रुजली; कै. वि. स. पागे यांच्या दूरदृष्टीतून रोजगार हमी योजना अस्तित्वात आली. या श्रमातून समाजासाठी उपयुक्त असे जलसाठे, पायाभूत सुविधा जसे, की गाव, रस्ते इत्यादी निर्माण करणे हा उद्देश होता. याच्या माध्यमातून अक्षरशः हजारो तलाव निर्माण करण्यात आले. या तलावांची निर्मिती तर झाली तथापि त्यांचे व्यवस्थापन नियमित देखभाल त्याची डागडुजी इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष झाले आणि परिणामी यांची उपयुक्तता कमी झाली. आज आपण दररोज तापमानवाढ आणि पाण्याचे दुर्भिक्ष याविषयी बातम्या वाचत असतो. त्या वेळेस नियोजनामध्ये खरे तर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या तलावांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

नियोजन:

१) गावाचा/सूक्ष्म पाणलोटक्षेत्रातील पाण्याचा ताळेबंद केल्यानंतर, जेव्हा आपण शिवारफेरी काढतो त्या वेळी त्या शिवारफेरीच्या दरम्यान आपल्या सोबत असलेल्या नकाशावर; अस्तित्वात असलेले गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, वन तलाव, इत्यादी तलावांच्या नोंदी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आता आपल्या मोबाईलवर असलेल्या लोकेशनचा वापर करून या तलावांच्या नोंदी ठेवण्यात येवू शकतात.

२) या नोंदी सोबतच त्यांची सद्यःस्थिती, त्यातील गाळ कधी काढला आहे? त्याची आजची उपयुक्तता काय आहे? म्हणजे त्या तलावात गाळ किती भरलेला आहे? गेल्या चाळीस-पन्नास वर्षांमधील कालावधीत झालेल्या बदलांचा आणि नुकसानीचा अभ्यास या निमित्ताने करावा.

३) तलावात पाणी पूर्ण क्षमेतेने राहते किंवा ते वाहून जाते हे देखील नोंदी ठेवणे गरजेचे आहे. या नोंदीच्या आधारे पुढचे नियोजन करणे सोपे होते.

४) महाराष्ट्राच्या नऊ कृषी हवामान प्रदेशामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्राचा भाग हा खूप मोठा आहे. या भागांमध्ये अनेक पाझर तलाव, आणि साठवण तलाव तयार करण्यात आले आहेत. त्याच बरोबर अगदी छोट्या क्षेत्रात देखील तलाव तयार करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com