Goat Farming : पूरक उद्योगातून बदलले अर्थकारण

जालना जिल्ह्यातील कचरेवाडी हे अत्यल्प प्रमाणात हंगामी बागायती वगळता बहुतांशी कोरडवाहू गाव. येथील महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, डाळनिर्मिती, धान्य विक्री, भाजीपाला विक्रीतून कुटुंबाच्या अर्थकारणाला गती दिली आहे. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘न्युट्री स्मार्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून गावातील उपक्रमशील महिलांना तांत्रिक प्रशिक्षण तसेच सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

कचरेवाडी (ता.जि. जालना) हे साधारणत: ११० उंबऱ्यांचे गाव. गावशिवारात बहुतांश कोरडवाहू पीक (Dry Land Crop) पद्धती. सोयाबीन (Soybean), तूर आणि कापूस (Cotton) ही महत्त्वाची पिके. येथील शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्यासाठी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने कार्यक्रम समन्वयक एस.व्ही.सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाला २०१८ मध्ये ‘न्यूट्री स्मार्ट' उपक्रमासाठी दत्तक घेतले. पहिल्यांदा महिलांचे प्रबोधन केल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार शेळीपालन (Goat Farming), कुक्कुटपालन (Poultry), रेशीम उद्योग (Sericulture), निकृष्ट रेशीम कोषापासून शोभेच्या वस्तू बनविणे, होळीसाठी नैसर्गिक रंग निर्मिती, घरगुती पद्धतीने डाळ निर्मिती, पोषणबाग लागवड आणि पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया अशा विविध विषयांबाबत प्रशिक्षण दिले.

Goat Farming
Goat Farming : सोशल मीडियावरून करतोय शेळी, बोकडांची विक्री

गेल्या चार वर्षात गावातील महिलांनी विविध पूरक उद्योगाला सुरुवात करून अर्थकारण भक्कम केले आहे. या गावात कमी अधिक प्रमाणात घरोघरी शेळ्या, परसातील कुक्‍कुटपालन, किमान ५० ते ६० टक्‍के कुटुंबाकडे रेशीम उद्योगाची सुरुवात झाली आहे. पोषणबागेच्या उपक्रमामुळे घरापूरता भाजीपाला उपलब्ध झाला तसेच काही महिला अतिरिक्त भाजीपाल्याची विक्री करतात.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालनात शास्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा

शेळीपालन, कुक्‍कटपालनाला चालना

गावात अपवाद वगळता प्रत्येक घरी शेळीपालन व परसातील कुक्‍कुटपालन केले जाते. गावामध्ये मुक्‍त, अर्धबंदिस्त, बंदिस्त प्रकारचे शेळीपालन पाहायला मिळते. बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन करणाऱ्या महिलांनी पोषणबागेत काही प्रमाणात चाऱ्याची लागवड केली आहे. आजघडीला प्रत्येक कुटुंबाकडे किमान १ ते १५ पर्यंत शेळ्या आहेत. गावात किमान १२०० च्या आसपास शेळ्या आहेत. शेळीपालनातून महिला चांगला नफा मिळवत आहेत.

Goat Farming
Goat Farming : हिवाळ्यातील शेळी, मेंढीचे व्यवस्थापन

कृषी विज्ञान केंद्राने गरजू महिलांना कावेरी, आरआयआर जातीच्या कोंबड्यांची पिल्ले दिली आहेत. या कोंबड्यांचे चांगले संगोपन करून अंडी तसेच कोंबड्यांची विक्री परिसरातील बाजारपेठेत केली जाते. अंड्याला प्रति नग १० रुपये आणि मांसल कोंबड्याला ६०० ते ७०० रुपये प्रति नग दर मिळतो. जोड व्यवसायातून मिळालेल्या पैसा महिला त्यामध्येच गुंतवून व्यवसायात वाढ करत आहेत.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजन- शेळीपालन

शेळीपालनाने दिली आर्थिक साथ

अरुणा जाधव यांनी कोरडवाहू शेतीला जोड देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे १४ शेळ्या आहेत. अर्धबंदिस्त पद्धतीने त्या शेळीपालन करतात. शेळ्यांसाठी त्यांनी लसूण घास लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी कुक्‍कुटपालनाचे प्रशिक्षण घेऊन कावेरी व आरआयआर जातीची १० पिल्ले घेतली. सध्या त्यांच्याकडे १८ कोंबड्या आहेत. साधारणत: दरवर्षी पाच ते सहा बोकड विकले जातात. याशिवाय अंडी आणि कोंबडी विक्रीतून वर्षाला किमान ४० हजारांची उलाढाल होते. कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कातून त्यांनी पोषणबाग केली. या बागेतील भाजीपाला गाव परिसरात विक्री करतात. यामधून दिवसाला किमान १५० ते २०० रुपये मिळतात.

सुभद्राताईंनी घेतली शेळी

पाच एकर शेती असलेल्या सुभद्रा जाधव यांनी शेतीमध्ये पोषणबाग तयार केली आहे. पोषण बागेत त्यांनी विविध भाजीपाला पिकांची लागवड करून दहा हजारांचा नफा मिळविला. या नफ्यात चार हजारांची भर टाकून दहा महिन्यांपूर्वी एक शेळी घेतली. आता त्यांच्याकडे दोन शेळ्या झाल्या असून, जवळपास पाच पिल्ले देखील आहेत. एक बोकड त्यांनी ७ हजार ५०० रुपयांना विकला. आता त्यांनी बंदिस्त शेळीपालनाचे नियोजन केले आहे.

रेशीम कोषापासून शोभेच्या वस्तूंची निर्मिती

कुटुंबाकडे शेती नसलेल्या प्रीती कचरे यांनी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रत्येक प्रशिक्षणात सहभाग घेतला. यातून त्यांनी रेशीम कोषापासून विविध शोभेच्या वस्तू निर्मितीला प्राधान्य दिले. याचबरोबरीने त्यांनी कापूस वेचणी कोट, सुलभ खत बॅग शिवणकाम, पेपरबॅग निर्मिती, पोषण बाग लागवड बियाणे निर्मिती, पोषणधान्य प्रक्रिया, कुक्‍कुटपालन प्रशिक्षणदेखील घेतले आहे.

रेशीम कोषापासून विविध शोभेच्या वस्तू निर्मितीमधून त्यांनी वर्षभरात ५० हजार रुपये, कापूस वेचणी कोट व सुलभ खत बॅग शिवणकामातून १० हजार रुपये, पेपर बॅग निर्मितीतून ४ हजार रुपये, पोषण बाग लागवड बियाण्यांमधून दीड हजार, पोषणधान्य प्रक्रियेतून ४ हजार रुपयांची उलाढाल केली आहे. अंगणात परसबाग तयार करून त्यातून घरच्या भाजीपाल्याची गरज भागवून अर्थार्जन करणाऱ्या सौ. प्रीती कचरे यांनी कुक्‍कुटपालन, शेळीपालन प्रशिक्षण घेतले. कोंबडीपालनातून वर्षभरात २० हजार रुपयांची उलाढाल केली. सध्या त्यांच्याकडे चार शेळ्या आहेत. हा व्यवसाय पुढे वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कोंबडीपालन, शेळीपालन व्यवसायातून आज आमच्यासारख्या कोरडवाहू शेतकऱ्यांना आमचा घरगुती खर्च भागवणे शक्‍य होते आहे. अंडी विक्री सोबतच सफल अंड्यातून कोंबडीकडून पिल्लं निर्मिती केली तर हा व्यवसाय चार ते पाच पट जास्त नफा देतो, हे आम्हाला कळलं आहे.- राहीबाई कचरे

कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेळोवेळी आयोजित प्रशिक्षणाचा फायदा कचरेवाडी गावातील महिला शेतकरी घेत आहेत. शेळीपालन, कुक्‍कुटपालनासारख्या शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या पूरक व्यवसायाला प्रत्येक कुटुंबाने चालना दिली आहे.

- डॉ. हनुमंत आगे, (पशुविज्ञान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना)

कचरेवाडी झाले ‘न्यूट्री स्मार्ट’ गाव

कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागामार्फत कचरेवाडी हे ‘न्यूट्री स्मार्ट’ गाव म्हणून दत्तक घेण्यात आले आहे. पाच वर्षांपासून गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पोषण बाग तसेच पूरक व्यवसायाची जोड देऊन आर्थिक विकास हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण बाग, जात्यावरील डाळी, पौष्टिक तृणधान्य विक्री, कोंबडीपालन, शेळीपालन, रेशीम शेती, पोषण तृणधान्य प्रक्रिया, रेशीम कोषापासून शोभेच्या वस्तू, पेपर बॅग निर्मिती उद्योगात गावातील प्रत्येक कुटुंबातील महिला सहभागी झाल्या आहेत. या व्यवसायातून प्रत्येक महिला किमान १५ हजार ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून कुटुंबाच्या अर्थकारणात हातभार लावत आहेत.

- संगीता कऱ्हाळे, ९४२००३७३००

(गृहविज्ञान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना)

कोंबडीपालनाची मिळाली साथ

राधा कचरे यांच्या कुटुंबाकडे ५ एकर शेती असून, त्यामध्ये अर्धा एकर गुलाब, एक एकर शेवगा आणि एक एकर मोसंबी, एक एकर तुती लागवड आहे. प्रशिक्षणानंतर त्यांनी घराजवळ छोट्या शेडची उभारणीकरून परसातील कुक्‍कुटपालन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी दहा कोंबड्या घेतल्या होत्या. आता त्यांच्याकडे ४० कोंबड्या आहेत. गावशिवारात एका कोंबड्याला किमान ६०० रुपये आणि प्रति नग अंड्याला १० ते १२ रुपये दर मिळतो. कोंबड्यांसाठी गहू, मका, सोयाबीन, शेवगा पाला, कमी दरात मिळणारा टाकून दिलेला भाजीपाला आणि स्वत:च्या शेतात असलेल्या पोषणबागेतील भाजीपाल्याचा त्या वापर करतात. या व्यवसायातून वर्षाकाठी कुटुंबाच्या अर्थकारणात किमान ६० ते ७० हजारांचा हातभार लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com