Agriculture Success Story : नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मुळा धरण आहे. काही भागाला या धरणासह भंडारदरा धरणाचेही पाणी मिळते. असे असले तरी तालुक्याचा पश्चिम भाग डोंगराळ, माळरानाचा, दुष्काळी किंवा कोरडवाहू आहे. साहजिकच येथील शेतकऱ्यांना शेतीतून फार समाधानकारक उत्पन्न मिळत नाही.
ही गोष्ट लक्षात घेऊन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सहा वर्षांपासून ‘शेतकरी प्रथम प्रकल्प’ या भागातील गावांमध्ये राबवण्यात येत आहे. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी व भूमिहीन व्यक्तीना पूरक व्यवसाय करता यावा, त्यातून कुटुंबाचे अर्थकारण फिरते राहावे हा त्यामागील उद्देश आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) त्यासाठी मदत झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी.के. ससाने यांचे मार्गदर्शन प्रकल्पाला राबले. प्रकल्प प्रमुख डॉ. पंडितराव खर्डे, सह-प्रकल्प प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, डॉ. रवींद्र निमसे, वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहायक किरण मगर यांचे प्रकल्पात योगदान आहे.
असा आहे प्रकल्प
सुरवातीला कणगर व चिंचविहिरे व त्यानंतर कानडगाव, तांभेरे गावात प्रकल्प राबवला जात आहे.येथील शेतकरी शेळीपालन, दुग्धव्यवसाय करतात. मात्र प्रकल्पात परसबागेतील कुक्कुटपालनाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक दिवस वयाची प्रत्येकी पन्नास पिल्ले देण्यात येतात.
त्यानुसार चार गावांत मिळून दर वर्षाला साधारण १३० कुटुंबांना व सहा वर्षांत सुमारे साडेपाचशेपेक्षा अधिक कुटुंबांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. खाद्य व्यवस्थापन, लसीकरण व अन्य बाबीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेक कुटुंबांनी उत्कृष्ट संगोपनातून कोंबड्यांच्या संख्येत वृद्धी केली आहे. परसबागेतील कुक्कुटपालन मोकळ्या जागेत किंवा मुक्तसंचार पद्धतीने होत असल्याने खाद्य किंवा अन्य बाबींवर फार खर्च करण्याची गरज भासत नाही.
असे आहे अर्थकारण
कावेरी या देशी वाणांच्या कोंबड्यांना बाजारात मागणी अधिक आहे. त्यामुळे याच वाणाच्या संगोपनावर अधिक भर देण्यात आला आहे. प्रति कुटुंबाचा अर्थकारणीय दृष्ट्या विचार करायचा तर कावेरी ब्रीडच्या ५० पिल्लांमध्ये सुमारे ३० कोंबड्या व २० कोंबडे मिळतात. बहुतांश शेतकरी अंडी उत्पादन घेतात.
पाच ते साडेपाच महिन्यांनी कोंबडी अंडी देण्यास सुरवात करते. प्रति कोंबडी वर्षभरात सुमारे १८० ते २०० अंडी देते. राहुरी येथे दर गुरुवारी कोंबड्यांचा बाजार भरतो. बाजारात देशी अंड्याला १० ते १२ रुपये प्रति नग दर मिळतो. कोंबड्यांची विक्री नर- मादी व वजनानुसार साडेतीनशे, चारशे ते पाचशे रुपयांना होते.
पोल्ट्री उत्पादकांच्या घरूनही ग्राहक कोंबड्या व अंडी घेऊन जातात. प्रति कुटुंबाला वर्षभरात खर्च वजा जाता ४५ ते ५० हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. प्रकल्पातील सहा वर्षाचा विचार केला तर परसबागेतील कुक्कुटपालनाने दोन कोटी रुपयांच्या आसपास अर्थकारणाला गती दिली आहे. प्रातिनिधीक उदाहरण द्यायचे तर आमच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार दिल्याचे कानडगाव येथील कासम शेख सांगतात.
शेळीपालनाला गती
शेतकरी प्रथम प्रकल्पातून शेळीपालनासही मोठी चालना देण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेळी सुधार प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत संगमनेरी आणि उस्मानाबादी शेळीची पैदास आणि त्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून विविध संशोधन केले जाते. साधारणपणे या भागात बहुतांश शेतकरी संगमनेरी शेळीचे पालन करतात.
या शेतकऱ्यांकडील शेडमध्ये शेळीच्या सुधारित जातीची पैदास व्हावी यासाठी प्रकल्पातून दहा शेतकऱ्यांत उच्च गुणवत्तेचा किंवा जातिवंत बोकड मोफत दिला. आत्तापर्यंत २० बोकडांचे वाटप केले आहे. त्यातून सहा वर्षात शेळ्यांची संख्या सुमारे सातशेपेक्षा अधिक वाढली आहे. शेळीपालनात बहुतांश महिला शेतकरी आहेत. याशिवाय गायी, म्हशीच्या जातिवंत जाती, कृत्रिम रेतन तंत्राचा वापर यातून पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसाय वाढीसही मदत झाली आहे.
किरण मगर ९९२१३५ ०२६७ (प्रक्षेत्र सहायक)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.