Tamarind Seed : चिंचेसह चिंचोक्यासाठी बार्शी बाजाराला पसंती

Article by Sudarshan Sutar : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ही डाळीसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे. पण त्याचबरोबर चिंच आणि चिंचोक्यांची राज्यातील अव्वल बाजारपेठ म्हणूनही तिची राज्यासह परराज्यांत ठळक ओळख आहे.
Tamarind
Tamarind Agrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार

Tamarind and Tamarind Seed Barshi Market : राज्यात चिंचेच्या बाजारपेठेसाठी किंवा व्यवहारासाठी नगर बाजारपेठेचा पहिला क्रमांक लागतो.त्यानंतर दुसरा क्रमांक बार्शी आणि तिसरा क्रमांक लातूरचा लागतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ही त्यातील आज आघाडीची बाजारपेठ झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही प्रदेशांचे बार्शी हे प्रवेशद्वार आहे. येथील बाजार समितीत एका बाजूने सोलापूरसह पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर तर दुसऱ्या बाजूने धाराशिव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांतून शेतमालाची आवक होते.

त्यामुळे बार्शी हे त्यासाठी मध्यवर्ती आणि महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने देखील ही बाजार समिती सोयीची ठरते आहे. त्याशिवाय काही अडते व्यापारी स्वतः चिंचेची स्वच्छता आणि प्रतवारी करून चिंचेचे मूल्यवर्धन करतात. आकर्षक पॅकिंग करून ती परराज्यांत पाठवतात किंवा जागेवरच अन्य व्यापाऱ्यांना विक्री देखील करतात.

हंगाम आणि प्रतवारी

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बांधावर चिंचेची झाडे अनेक वर्षांपासून टिकवल्याचे पाहण्यास मिळते. बांधावरचे उत्पन्न त्यांना हंगामात आर्थिक आधार देणारे ठरते. चिंचेचा हंगाम साधारण फेब्रुवारीपासून सुरू होतो. तो मे महिन्यापर्यंत म्हणजे साधारण चार महिन्यांपर्यंत सुरू राहतो.

सोलापूरसह लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांतील काही छोटे खरेदीदार वा व्यापारी शेतकऱ्यांकडून चिंचेचे झाड वा झाडे काढणीस घेतात. झाडावरील उत्पादनाचा अंदाज घेऊन त्याचा दर निश्‍चित केला जातो. त्यानंतर या खरेदीदारांकडून काढणी, फोडणी आणि प्रतवारी होते. या प्रक्रियेनंतर चिंच बाजारात आणली जाते.

सोलापूरसह लातूर, बीड, धाराशिव या भागातून चिंच घेऊन खास शेतकरी आणि खरेदीदार व्यापारीही बार्शीत येतात. प्रतवारी तीन प्रकारात होते. यात आकाराने मोठी पत्ती, केशरी उठावदार रंग असणारा ‘स्पेशल’ म्हणजे पहिला प्रकार. त्यानंतर बारीक पत्ती आणि कमी रंग असलेली चिंच हा दुसरा प्रकार किंवा प्रतवारी. तर कमी स्वच्छ वा साधारण चिंच ही तिसरी प्रतवारी म्हणून गणली जाते. प्रतवारीनुसार लिलावात पुढे योग्य दर मिळतो. सोलापूर भागात दीड महिन्यांपासून हंगाम सुरू झाला आहे.

Tamarind
Tamarind Rate : गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात दोन हजार रुपयांनी सुधारणा

बार्शी चिंच बाजाराची वैशिष्ट्ये

फेब्रुवारी ते मे या कालावधीत होते आवक.

आठवड्यातून केवळ रविवारी बाजाराला सुट्टी.

दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतात लिलाव.

त्यानंतर खरेदीदार-विक्रेते यांच्यासमोरच होते वजन. व्यवहार झाल्यानंतर त्वरित खरेदीची रोखपट्टी देण्यात येते.

चिंचोकाही वेधतोय लक्ष

बार्शीच्या बाजारपेठेत चिंचेबरोबरच चिंचोक्याचेही महत्त्व वेगळे असून, त्याचीही मोठी बाजारपेठ आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून आणलेल्या चिंचोक्यांची गुणवत्ता पाहून त्यानुसार त्याचा दर ठरतो. यंदा हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारी ते मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत म्हणजे दीड महिन्याच्या कालावधीत ३१ हजार १०० क्विंटल एवढी चिंचोक्याची आवक झाली आहे. त्यास प्रति क्विंटल किमान १८०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि तर सर्वाधिक २४०० रुपये दर मिळाला आहे.

केवळ खुल्या आणि चोख व्यवहारामुळेच चिंचेसाठी शेतकरी आणि व्यापारी बार्शी बाजार समितीला पसंती देतात. येथे योग्य वजन आणि रोखपट्टी मिळते. आमचे संपूर्ण बाजारावर सातत्याने लक्ष असते.
तुकाराम जगदाळे ८८८८५२६९३३, सचिव, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती
Tamarind
Tamarind Processing : चिंचेपासून सॉस, लोणचे, पोळी
बार्शी बाजार समिती चिंचेसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे, केवळ चोख व्यवहार आणि मालाच्या गुणवत्तेमुळे बाजारात बाहेरून शेतकरी, खरेदीदार येतात. यंदाच्या हंगामातील आवक दीड महिन्यापासून सुरू झाली आहे. मी स्वतः ‘एसडीएम’ या ब्रॅण्डने चिंचेची विक्री करतो. महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेशपर्यंत आमचे ग्राहक आहेत. बार्शीची चिंच हीच आमची ओळख सर्वत्र झाली आहे.
सचिन मडके, अडत व्यापारी, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी
मी शेतकऱ्यांकडून चिंचेची खरेदी करतो. दररोज किमान ५ ते १० क्विंटल प्रमाणात ती विक्रीसाठी बार्शीच्या बाजारात घेऊन येतो. यंदा काही प्रमाणात मालाची आवक कमी दिसते आहे. त्यामुळे दर चांगले राहतील अशी शक्यता आहे.
दत्तू वामन देडे, चिंच खरेदीदार, घाटंगरी, जि. धाराशिव
पाऊसमानाचा परिणाम झाला असण्याच्या शक्यतेने यंदा चिंचेचे प्रमाण अलीकडील अन्य वर्षांच्या तुलनेने कमी आहे. बार्शीची बाजारपेठ आमच्या गावापासून दूर आहे. तरीही चांगल्या व्यवहारामुळे मी खरेदी- विक्रीसाठी याच बाजारपेठेला प्राधान्य देतो. दररोज किंवा एक-दोन दिवसाआड ७ ते १० क्विंटलपेक्षाही अधिक चिंच बाजारात नेतो.
समीर पठाण, चिंच खरेदीदार, रेणापूर, जि. लातूर

सर्वाधिक दर : यंदाच्या हंगामाची ताजी स्थिती सांगायची तर बार्शी बाजार समितीत मागील महिन्यात (फेब्रुवारी) ११ हजार १२७ क्विंटल चिंचेची आवक झाली. त्यास प्रति क्विंटल किमान ८००० रुपये, सरासरी १२ हजार रुपये, तर सर्वाधिक २० हजार रुपये दर मिळाला. तर २० मार्चपर्यंतच्या कालावधीपर्यंत ४२ हजार २३५ क्विंटलपर्यंत सर्वाधिक आवक झाली. त्या काळात किमान ७००० रुपये, सरासरी १२ हजार रुपये आणि सर्वाधिक २० हजार रुपये दर मिळाला.

वार्षिक उलाढाल शंभर कोटींवर : बार्शी बाजार समितीत खास चिंच आणि चिंचोक्याचे व्यापार करणारे सुमारे १० ते १२ अडते तर २० ते २५ खरेदीदार आहेत. चार महिन्यांच्या हंगामात दिवसाला किमान चार ते पाच हजार क्विंटल चिंचेची बाजारात आवक होते. त्यातून सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल एका दिवसांत होते. वार्षिक स्वरूपात सांगायचे तर एक ते दोन लाख क्विंटलपर्यंत आवक तर सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com