Bamboo Farming : आदिवासी शेतकऱ्यांची ‘बांबू कॉसमॉस’

Tribal Entrepreneurship : नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील १७ गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांनी बांबू कॉसमॉस शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे.
Bamboo Business
Bamboo Business Agrowon
Published on
Updated on

Bamboo Business Model : नाशिक जिल्ह्यात सुरगाणा हा आदिवासी प्रवण तालुका आहे. या भागात पाऊस मोठ्या  प्रमाणात पडतो. पावसावर अवलंबून शेती असल्याने उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. भात, नागली, वरई अशी प्रमुख पिके असून काही ठिकाणी भाजीपाला घेतला जातो.

या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच आर्थिक बळकटीकरणासाठी नाबार्ड व नाशिक येथील युवामित्र संस्थेने पुढाकार घेतला. त्यातून २१ एप्रिल २०२२ रोजी बांबू कॉसमॉस शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापन झाली. सुरगाणा परिसरात काही शेतकऱ्यांकडे बांबूचे पारंपरिक क्षेत्र होते.

मात्र या पिकाचा व्यावसायिक पद्धतीने वेध घेणे, बांबूपासून नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करून त्याची बाजारपेठ विकसित करणे, त्याचे अर्थकारण या बाबींवर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले. सुरगाणा येथे कंपनीचे कार्यालय आहे.

कंपनीची रचना

कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच लेखापालाची नियुक्ती करण्यात आली. मनोहर तुकाराम महाले अध्यक्ष, गोपाळ येवाजी धूम उपाध्यक्ष तर तुळशीराम नवसू सहारे सचिव आहेत. संचालक मंडळात पुष्पा दौलतराव सहारे, तुळशीराम दल्या ठाकरे, रमेश भिका थोरात, दौलत धर्मा गावित, आवाजी गंगाराम पालवी, चिमण लक्ष्मण पवार, उज्ज्वल यशवंत भोंडवे आदींचा समावेश आहे.

युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांचे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. सध्या कंपनीचे ३३५ सभासद असून पुढील टप्प्यात २५६ सभासदांची नोंदणी प्रस्तावित आहे. पाच संचालक व पाच प्रवर्तक अशा पद्धतीने कंपनीची रचना करण्यात आली आहे. बाऱ्हे, चिंचपाडा, कुकुडणे, राघटविहिर, हातरुंडी अशा सुमारे पंधरा गावांमध्ये कंपनीचे कार्यक्षेत्र आहे.

Bamboo Business
Bamboo Farming : बांबू, फळबाग लागवडीसाठी विशेष प्रयत्न करणार

व्यावसायिक वाटचाल

कंपनीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडे बांबूची बेटे आहेत. मात्र शेतकरी बांबूची विक्री न करता शेतीसाठी आवश्यक वस्तूनिर्मितीसाठी त्याचा वापर व्हायचा. कंपनीने परिसरातील ३९५ शेतकऱ्यांकडे सर्व्हेक्षण व अभ्यास करून तांत्रिक माहिती अंकलीच केली.

महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या (मुंबई) सहकार्याने बाऱ्हे (ता. सुरगाणा) येथे बांबू डेपोची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत बांबू कॉसमॉस कंपनी स्थानिक शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी करू लागली आहे. सुरुवातीच्या टप्प्यापासूनच समूह शेतीला चालना देण्यात आली आहे.

सभासदांची आर्थिक उत्पन्न वाढ, विकासात्मक दर्जा सुधार व नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करून रोजगार निर्मिती ही प्रमुख उद्दिष्टे ठेऊन वाटचाल सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ३.३५ लाख इतके भागभांडवल तयार करण्यात आले. ‘नाबार्ड’ च्या मदतीने ‘इक्विटी’ अनुदान मिळवले.

बांबू विक्रीसाठी कापणी प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी पाच बांबू मित्र आणि २६ कारागिरांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या मदतीने बांबू प्रजातींची ओळख, ‘कलर कोडिंग’, पक्का बांबू निवड, तांत्रिक पद्धतीने पणी या संबंधी प्रशिक्षण दिले आहे. कारागिरांना आवश्यक साधनांमध्ये करवत, कुऱ्हाड, साखळी, हेल्मेट, हातमोजे आदी साहित्य देण्यात आले आहे.

Bamboo Business
Bamboo Farming : बांबू पीक लागवड किफायतशीर

प्रशिक्षण ठरतेय मोलाचे

कंपनीचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी क्षमता बांधणी, नोंदी (रेकॉर्ड) व्यवस्थापन, व्यवसाय आराखडा, विपणन (मार्केटिंग) आदी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिक येथील प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाखलगाव येथेही अभ्यास दौरा झाला आहे. महाराष्ट्र वन विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (चंद्रपूर) येथे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लागवडीला प्रोत्साहन

सुरुवातीच्या काळात कंपनीने महसूल आणि वन विभागाच्या साह्याने अटल बांबू समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बांबू अभियानाच्या माध्यमातून बांबू रोप लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. अत्यंत कमी दरात म्हणजे २४ ते ३० रुपये किमतीचे रोप केवळ सहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांना प्रति रोप १८ ते २४ रुपयांची बचत करता आली. टुल्डा, माणगा व बाल्को वा सारख्या जातींच्या उतिसंवर्धित रोपांचा यात समावेश होता. या उपक्रमात दोनशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून दीडशे एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

मूल्यवर्धनाला चालना

पूर्वी धान्य साठवणुकीसाठी छोटी डालकी, धान्य साफ करण्यासाठी सुपली अशी उत्पादने बनवली जायची. आता या भागातील शेतकरी प्रशिक्षणातून कुशल कारागीर होत आहेत. त्यातून विविध सजावटीची, गृहोपयोगी मूल्यवर्धित उत्पादने ते तयार करू लागले आहेत. सध्या येथे बारा कुशल कारागीर आहेत. नव्या संधी समजल्याने उत्पादनाची शृंखला विस्तारली आहे. विक्रीसाठी नाशिक कृषी महोत्सव, तरंग मेळा, केएसबी (सिन्नर), नाबार्ड (पुणे) तसेच युवामित्र संस्था यांच्या पुढाकाराने भरणाऱ्या विविध प्रदर्शनांत बांबू कॉसमॉस कंपनी सहभागी होऊन स्टॉल सादर करते.

शेतकऱ्यांसाठी शेताला मांडव म्हणून बांबूच्या काठ्या तयार केल्या जातात. याशिवाय शोभिवंत वस्तू म्हणून बैलगाडी, आकाश कंदील, बास्केट, जहाज आदींचीही निर्मिती केली जाते. या उत्पादनांना मोठी मागणी असते. आदिवासी विकास महामंडळाने मागील वर्षी दिवाळीत मोठी मागणी नोंदवली होती. आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी अर्थ व विकास महामंडळाकडून ४१.७४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पैकी १२ लाखांचा निधी हाती आला आहे. कंपनीने २०२३–२४ मध्ये ७ लाख २० हजार रुपयांची तर २०२४–२५ मध्ये सात लाख ५६ हजार रुपयांची उलाढाल केली. पावसाळा काळात या भागात प्रचंड पाऊस असल्याने सुमारे चार महिन्यांच्या काळात बांबू व्यवसायावर मर्यादा येतात. अशावेळी कंपनीने या काळात भात खरेदी-विक्री व्यवसायाचा पर्याय शोधला आहे. त्यातून रोजगार निर्मिती सुरू ठेवली आहे.

- चित्रा धूम, ९१५८०४१८१०

(लेखापाल, बांबू कॉसमॉस कंपनी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com