Paddy Variety : भाताच्या देशी वाणांना बाजारपेठ मिळविणारे आरळा

Paddy Desi Variety : सांगली जिल्ह्यातील आरळा गाव (ता. शिराळा) भाताचे आगर आहे. येथे सध्या आरोग्यदायी, सुवासिक व बाजारपेठेत मागणी येऊ शकणाऱ्या सुमारे वीस देशी वाणांची लागवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Paddy Variety
Paddy VarietyAgrowon

अभिजित डाके
Rice Variety :
सांगली जिल्ह्यातील आरळा गाव (ता. शिराळा) भाताचे आगर आहे. येथे सध्या आरोग्यदायी, सुवासिक व बाजारपेठेत मागणी येऊ शकणाऱ्या सुमारे वीस देशी वाणांची लागवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय या भाताला थेट ग्राहक व खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सक्षम बाजारपेठ तयार करण्यासही शेतकरी गट व कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून सुरुवात झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍याचे सरासरी पर्जन्यमान १५०० ते २००० मिमी. आहे.
जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्याच्या वारणा खोऱ्यातील पश्‍चिम भाग भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. देशी वाणांसह काळानुसार संकरित भाताचे वाण घेण्यासही इथला शेतकरी प्राधान्य देत आहे. शेती तुकड्यात असल्याने गावातील बहुतांश लोक उदरनिर्वाहाची सोय म्हणून
मुंबईला स्थलांतरित झाले. पण भात लागवड आणि काढणीवेळी ते हमखास गावी येतातच.
अशा रीतीने गावची नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही.

निसर्गाचे लेणे लाभलेले आरळा

शिराळा शहराच्या आजूबाजूला डोंगररांगा, भाताची हिरवी शिवारे, रस्त्याने जाताना पिकाचा
दरवळणारा सुगंध सर्वांना मोहित करणारा असतो. तालुक्याच्या पश्‍चिम भागात वसलेले यातील एक साडेचारशे लोकसंख्येचे व निसर्गाचे लेणे लाभलेले गाव म्हणजे आरळा. अवघ्या १० ते १५ किलोमीटरवर वारणा धरण. येथील डोंगरावरील पाथरपुंज येथे वारणा नदीचा उगम आहे. दक्षिणेला उदगिरीचे, तर उत्तरेला आसूबाईचे पठार शिवाय सह्याद्रीचा घाटमाथा आणि चांदोली अभयारण्य. यामुळे पर्यटकांची या भागात नेहमी रेलचेल असते.

Paddy Variety
New Variety : नवीन सात वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

भाताची टिकवलेली परंपरा

शिराळा तालुक्याचे सरासरी भातक्षेत्र ११ हजार १७० हेक्टर असून, सरासरी भात उत्पादकता कोरडवाहू भागात हेक्टरी २६ क्विंटलपर्यंत, तर बागायती भागात ३५ क्विंटलपर्यंत आहे. आरळा गावात भाताचे सुमारे ३७० हेक्टर क्षेत्र आहे. शिराळा जाडा, वरंगाळ, दोडगा, तुलशीभात, मासाड, जोंधळा, कोल्ह्याची शेपूट, बकासूल आदी भातवाणांची गावात पिढ्यान् पिढ्या शेती व्हायची. पण बाजारात अपेक्षित मागणी, दर असल्याने विक्रीवर मर्यादा होत्या.

तरीही भातशेतीची परंपरा गावाने कायम जपली आहे. आरळा गावासह १३ वाड्यावस्त्या, उत्तरेला शाहूवाडी तालुका, तर पश्‍चिमेला पाटण तालुक्याचा काही भाग आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे लगतचेच जिल्हे. साहजिकच भाताचे आगार म्हणून आरळा ही या सर्व भागांची ब्रिटिश काळापासून मुख्य बाजारपेठ आहे.

Paddy Variety
Paddy Cultivation : भाताच्या लागवडीवर महागाईचे सावट कायम

वाणांच्या विविधतेतून बदल

कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर सांगतात की गावातील शेतकऱ्यांकडून भाताच्या पर्यायी किंवा नव्या वाणांची मागणी व्हायची. त्यातून कृषी विभागाने देशी वाण प्रकल्प हाती घेतला. सन २०२० मध्ये इंदिरा गांधी विश्वविद्यालय, रायपूर (छत्तीसगड) यांच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथून दोन वाणांचा संदर्भ मिळाला. दापोली येथील कृषी विद्यापीठ, काडसिद्धेश्‍वर कण्हेरी मठ, मावळ येथील कृषी विज्ञान केंद्र येथूनही वाणांची माहिती घेतली. त्यातून गोविंदभोग (पश्‍चिम बंगालातील),
काळा नमक, मधुराज ५५, रक्तशाळी, शष्टीशाळी, रत्ना ७, आंबेमोहर आदी सुमारे
२० देशी वाण आणून लागवड केली. शेतकऱ्यांनी ‘एसआरटी’, चारसूत्री, ‘एसआरआय’ तसेच जगातील काही भात उत्पादक देशांतील लागवड पद्धतींचा प्रयोग सुरू केला.

Paddy Variety
Paddy Farming : भाताच्या विविध वाणांची लागवड करणारे गाव

शेतकरी गटाची स्थापना

आपल्या तांदळाला विस्तृत बाजारपेठ मिळावी ही आरळा गावातील शेतकऱ्यांची इच्छा होती. मग कृषी विभागाने सह्याद्री स्वयंसाह्यता शेतकरी गट स्थापन केला. कृषी प्रदर्शन, महोत्सवांमधून
या शेतकऱ्यांच्या तांदळाला थेट बाजारपेठ मिळण्यास मदत मिळाली. सांगली, सातारा, कोल्हापूरसह मुंबईलाही तांदूळ पोहोचू लागला. आरोग्यदायी, पोषणद्रव्यांनी भरपूर अशा बाजारपेठेत विक्रीयोग्य पाच वाणांची निवड केली आहे.

काही खासगी कंपन्या हा तांदूळ घेण्यासाठी गावात येऊ लागल्या आहेत. जिथे पूर्वी स्थानिक व्यापारी क्विंटलला एकहजार ते दोन हजार रुपये दर द्यायचे तिथे आता हा दर कंपन्यांच्या माध्यमातून चार हजार व त्यापुढे मिळू लागला आहे. साहजिकच शेतकऱ्यांचे उत्पन्न व अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.

वाणनिहाय मिळणारे दर रु. प्रति क्विंटल.

वाण भात ... तांदूळ
गोंविंदभोग ..४५०० ..८०००
रक्तशाळी...३७००... ७०००
काळानमक....९०००...२००००
रत्ना ७ ....३७००.... ७०००

पीक संग्रहालय

गावातील सखाराम पाटील यांच्या ३० गुंठ्यात कृषी विभागाच्या मदतीने पीक संग्रहालय उभारण्यात
आले आहे. फुटवे, लोंब्या, रंग, पोषणद्रव्ये आदी विविध गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भाने विविध वाणांचा
अभ्यास त्या माध्यमातून केला जात आहे. लागवडीच्या माध्यमातून या वाणांचे बियाणे पुढील वर्षी उपलब्ध होऊन त्यांची विक्री करणे पाटील यांना शक्य होणार आहे.
सखाराम पाटील, ७३०३२४८१९१

पूर्वी कोमल, सोनम, मधुमती आदी वाण घ्यायचो. दोन वर्षांपूर्वी पश्‍चिम बंगालमधून गोविंदभोग हे वाण कृषी विभागाने शंभर रुपये प्रति किलो दराप्रमाणे बियाणे उपलब्ध करून दिले. तीस गुंठ्यांत सुमारे २२ क्विंटल उत्पादन मिळाले. मागील वर्षी जिल्ह्यात भातपीक उत्पादनात तिसरा क्रमांक मिळाला. या वाणामुळे उत्पादनात वाढ झाली. भाताचा सुवासिकपणा, चवही वेगळी आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी आहे. चालू वर्षी २०० किलो बियाण्याची प्रति किलो १०० रुपये दराने विक्री केली.
सुजय देशपांडे
७७५७९७८३६५
आरळा गावात आम्ही प्रातिनिधिक शेतकऱ्याकडे भात पीक संग्रहालय उभारले आहे.
त्या माध्यमातून विविध भातवाणांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व अधोरेखित होईल.
विविध गावांत असे संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यातून वाणांना मागणी, अपेक्षित दर मिळून शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारेल व क्षेत्रातही वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

गणेश क्षीरसागर (कृषी पर्यवेक्षक), ९४०३९६३८९८
एकनाथ भोसले (कृषी सहायक), ९६५७८०२५४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com