Agriculture Management : काळ्या आईने संपन्नतेसह दिले समाधानही

Success Story of Farmer : भाक्षी (ता. सटाणा. जि. नाशिक) येथील रवींद्र खैरनार यांनी शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून मातीला बलशाली बनविले आहे.
Ravindra Khairnar Family
Ravindra Khairnar FamilyAgrowon
Published on
Updated on

Soil Conservation : भाक्षी (ता. सटाणा. जि. नाशिक) येथील रवींद्र खैरनार यांनी शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून मातीला बलशाली बनविले आहे. सेंद्रिय घटक, हिरवळीची खते, कडधान्ये, गांडूळखत, फेरपालट आदींच्या माध्यमातून माती सुदृढ केली आहे. त्यातून डाळिंबासारख्या पिकाची उत्पादकता व गुणवत्ता उच्च दर्जाची बनविली आहे. काळ्या आईने आर्थिक संपन्नतेसह समाधानही दिल्याचे रवींद्र अभिमानाने सांगतात.

भाक्षी (ता. सटाणा. जि. नाशिक) येथील रवींद्र खैरनार अल्पभूधारक शेतकरी आहेत. सन १९७३ मध्ये वडील देवाजी यांची ‘ब्रेन ट्यूमर’ची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आईवरच कुटुंबाची जबाबदारी आली. एकुलता मुलगा असलेले रवींद्र शाळेत हुशार होते. वरच्या क्रमांकाने ते उत्तीर्ण व्हायचे. मात्र परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने बारावीतच शिक्षण सोडावे लागले. सन १९९० च्या सुमाराचा हा काळ. कधी कपड्याच्या दुकानात तर कधी चालक म्हणून त्यांनी काम केले. धाकट्या बहिणींनाही मोलमजुरी करावी लागली. वडिलोपार्जित तीन एकर जमीन, पण ती जिरायती होती.

Ravindra Khairnar Family
Soil Conservation : सुपीक जमिनीच्या वाळवंटीकरणाचे संकट वाढले

सिंचन सुविधेशिवाय शेतीचे भविष्य नाही हे रवींद्र यांचे लक्षात आले. मग १९९१ मध्ये बँकेचे साह्य घेऊन पाइपलाइन व विहीर मोटरचे काम केले. सन १९९२ मध्ये फळबाग लागवड योजनेअंतर्गत गणेश डाळिंबाच्या दोनशे झाडांची लागवड केली. शेतीत स्थिरता येऊ लागला. घरची आर्थिक स्थिती सुधारू लागली. बहिणीचे लग्न करणे रवींद्र यांना शक्य झाले.

माती सुपीकतेचे समजले महत्त्व

डाळिंब हेच रवींद्र यांचे मुख्य पीक राहिले आहे. सन २००४ मध्ये गणेश डाळिंबाची बाग काढली. सन २००६ मध्ये सघन पद्धतीने आरक्ता डाळिंबाची साडेतीन एकरांत लागवड केली. त्या वेळी रासायनिक निविष्ठांचा वापर जास्त होता. जमिनीचे आरोग्य सुधारत नव्हते. किडी- रोगांच्या समस्या सुटत नव्हत्या. खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी अशी स्थिती होती.

अशावेळी जमिनीचे आरोग्य सांभाळण्याला रवींद्र यांनी प्राधान्य दिले. तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, कृषी अधिकारी, प्रशिक्षण केंद्रे, विद्यापीठे आदींच्या भेटीतून शास्त्रीय ज्ञान घेतले. माती परीक्षण केले. सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडी, अन्नद्रव्यांचे प्रमाण यांचा आढावा घेतला. मातीला सुदृढ, सुपीक बनवायचे यावरच ‘फोकस’ करून व्यवस्थापन सुरू केले.

सध्याचे शेती व्यवस्थापन

वडिलोपार्जित शेती ३ एकर, नवीन खरेदी शेती दीड एकर.

दर दोन वर्षांनी माती परीक्षण.

जिवाणूंची, कडधान्यांची, सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी, जिवामृत, सेंद्रिय, धैंचा, ताग ही हिरवळीची खते, पालापाचोळा, वेगवेगळ्या पेंडी यांचा वापर. मटकी, हरभरा वा कडधान्यांची लागवड करून विशिष्ट कालाने ती मातीत गाडली जातात. परिसरातील शेतकऱ्यांकडून उसाचे पाचट विकत आणून वापर.

आठ वर्षांपूर्वी सातशे- आठशे ट्रॅक्टर सुपीक, निचऱ्याची माती आणून तिचे पुनर्भरण.

Ravindra Khairnar Family
Soil Management : जमिनीची निचरा शक्ती सुधारणे गरजेचे...

वीस बाय ४ फूट आकाराचे गांडूळ खताचे दोन बेडस. त्यातून खतासह व्हर्मिवॉशचाही वापर.

दोन गीर गायी. दरवर्षी तीन लाखांचे शेणखत बाहेरून आणण्यात येते.

शेतातील पालापाचोळा, फळछाटणी पश्‍चात अवशेषांचा पुनर्वापर.

जमिनीतील ह्युमस, सेंद्रिय कर्ब, उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या योग्य प्रमाणात राखण्याचे उपाय. ईएम व ‘डीएफ सोल्यूशनचा वापर.

सुमारे ८० चे ९० टक्के सेंद्रिय व गरजेएवढाच रासायनिक पद्धतीचा वापर. नीम तेल, करंज तेल यांच्या फवारण्या. पावसाळ्यात मित्रबुरशींयुक्त कीटकनाशकांचा वापर.

फक्त उन्हाळ्यात मशागत. मातीचा वरील स्तर कडक होणार नाही यासाठी ट्रॅक्टरचा वापर कमी केला.

झालेले फायदे

सेंद्रिय कर्ब एक टक्क्यावर- रवींद्र म्हणाले, की अलीकडील वर्षांत केलेल्या माती परीक्षणात सेंद्रिय कर्ब एक ते सव्वा टक्क्यावर पोहोचला. (अलीकडे नव्या बागेत व्यवस्थापन करताना तो ०.७ टक्क्याच्या आसपास आहे. यापुढे त्यात वाढ होईल.)

रासायनिक निविष्ठांवरील तसेच एकूण खर्चात बचत.

डाळिंबाचे निर्यातक्षम व एकरी १० ते १२ टन व कमाल १५ टनांपर्यंत उत्पादन साध्य. तेलकट डाग तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव कमी. अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत किलोला १० ते २० रुपये अधिक दराचा परतावा.

आर्थिक परिस्थिती सक्षम झाली. पाइपलाइन, सिंचन सुविधा सक्षम केली. १२ गुंठ्यांत शेततळे उभारले. शेतात घर बांधले. वडील देवाजी, आई सुमनबाई, पत्नी सुरेखा यांची शेतीत भक्कम साथ आहे. तेजस व तेजस्विनी ही मुले अभ्यासात हुशार आहेत. काळ्या आईने आर्थिक संपन्नता नव्हे तर मानसिक समाधानही परिवाराला दिले, असे रवींद्र अभिमानाने सांगतात.

नव्या डाळिंब बागेतील नियोजन

सन २०१८ च्या दरम्यान भगव्या डाळिंबाची जुनी बाग काढली.

त्यानंतर पोकलेनच्या साहाय्याने साडेतीन फूट खोल चाळणी केली.

माती खाली-वर करून उपचार. जमिनीतील हानिकारक बुरशी नष्ट करण्याचा प्रयत्न.

पुढील तीन वर्षे उन्हाळ्यात नांगरणी. एप्रिल- मेदरम्यान जमीन तापून घेतली.

मका, सोयाबीन, कांदा अशी पिके घेतली.

जमिनीला विश्रांती देऊन पीक फेरपालट.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com