Agriculture Success Story : वेगवेगळ्या प्रकल्पांतून साधली शेतीची प्रगती

Agrowon Diwali Ank : पिकांच्या व्यवस्थापनामध्ये आंतरपिकांसह फुलशेतीसारखे योग्य ते बदल केले. याचबरोबरीने गोड ज्वारीपासून इथेनॉल, हळद प्रक्रिया उद्योगाची जोड देत आर्थिक नफा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
Success Story
Success StoryAgrowon
Published on
Updated on

नरेश शिंदे

शेतीशाळा, विविध प्रकल्पांतून मिळवलेला अनुभव आणि ज्ञान याला मी ‘ॲग्रोवन’च्या वाचनाची जोड दिली. त्यातून पिकांच्या व्यवस्थापनामध्ये आंतरपिकांसह फुलशेतीसारखे योग्य ते बदल केले. याचबरोबरीने गोड ज्वारीपासून इथेनॉल, हळद प्रक्रिया उद्योगाची जोड देत आर्थिक नफा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

मी   नरेश गणेशराव शिंदे सनपुरी येथील शेतकरी. परभणी शहरापासून दहा कि.मी.वरील सनपुरी हे गाव दुधना नदी आणि सुपीक काळ्या जमिनीमुळे समृद्ध आहे. एकत्रित कुटुंबाची वडिलोपार्जित ९० एकर शेती. आई, वडिलांसह सहा भावांचे एकत्र कुटुंब. मी दुसऱ्या क्रमांकाचा, जन्म १९७०.

गावात चौथी झाल्यानंतर पाचवीला मामा शिवाजीराव देशमुख यांच्याकडे हिंगोलीला गेलो. बारावीनंतर पुसद पॉलिटेक्निकला नंबर लागला, पण त्याचे प्रवेश शुल्क २० हजार रुपये भरायला नव्हते. शेती दिसायला मोठी असली तरी कोरडवाहू आणि पडीक. कुटुंबाच्या गरजा भागवताना नाकी नऊ, तिथं फी कशी भरायची? मग हिंगोलीलाच आदर्श महाविद्यालयात बी.एस्सी. केली. १९९२ मध्ये आर्थिक परिस्थितीमुळे परभणी येथेच एम.एस्सी. (वनस्पतिशास्त्र) शिक्षण घेतले.

शिक्षणानंतर एका बाजूला नोकरीचा शोध, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, तर दुसरीकडे मामांच्या गॅस एजन्सीचे व्यवस्थापन बघत होतो. त्यातच घरच्या तगाद्यामुळे २००० मध्ये माझे दोनाचे चार हात झाले. लग्नानंतर गावी परतलो. जून २००२ मध्ये मुलगा झाला. वनस्पती विकृतिशास्त्रातील शिक्षण असल्याने पिकाची उत्पादन कमी येणाऱ्या कीड, रोग कसे कारणीभूत आहेत, हे माहिती होते. आपण शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे उत्तम शेती करू शकतो, असा आत्मविश्‍वास वाटत होता. २००२ मध्ये पूर्ण वेळ शेतीचा निर्णय घेतला.

Success Story
Sugarcane Intercropping : उसात कोणते आंतरपीक जास्त फायदेशीर?

आमच्या कुटुंबात आई, वडिलांसह सहा भावांचे एकत्रित १४ सदस्य होतो. ९० एकरांपैकी २० एकर बागायती, तर बाकीची हंगामी बागायत होती. दोन विहीर, बोअरवेल यांच्या जोडीला दुधना नदीवरून पाइपलाइन. पडीक शेतीमध्ये लेव्हलिंग, बांधबंदिस्तीची जरुरी होती. पाणी पोहोचले नव्हते. मशागत बैलावर अवलंबून, अवजारे नव्हती की भांडवल नव्हते. शेतीकामांसाठी ट्रॅक्टर घ्यायचा ठरवला.

त्याच्या पहिल्या २५ टक्के भांडवलासाठी पत्नी सविताने दागिने दिले तेव्हा गावातील पहिला ट्रॅक्टर खरेदी केला. त्याने जमिनीची सुधारणा केली. १० एकर ऊस लावला. पण कारखान्याने अतिरिक्त ऊस ठरवून अर्धाच ऊस गाळपास गेला. बाकी ऊस शेतात वाळला. मग केळीकडे वळलो. त्यात व्यापाऱ्याकडून जूनमध्ये आगाऊ रक्कम मिळते. खरीप पेरणीची काळजी मिटली. केळी विक्रीतून हळूहळू सुबत्ता दिसू लागली.

शेतीशाळांमुळे निर्माण झाली आवड

गावात कापूस पिकासाठी आठवड्यातून दोन दिवस शेतीशाळा सुरू झाल्याने कृषी विभागाशी संपर्क आला. तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती मिळू लागली. आम्हाला शेतीशाळेची गोडी लागली. सलग तीन वर्षे वेगवेगळ्या पिकांवर शेतीशाळांसोबतच कृषी विभागाच्या अनेक योजनांनाही गती मिळाली.

‘ॲग्रोवन’ची लागली गोडी

एप्रिल २००५ मध्ये दैनिक ‘अॅग्रोवन’ सुरू झाले. पण गावात पेपर पोहोचत नव्हता. मग परभणी येथील एका विक्रेत्यास महिन्याचे आगाऊ बिल देऊन अंक बाजूला ठेवण्यास सांगितले. कामानिमित्त परभणीला गेल्यानंतर तो गठ्ठा घेऊन येई. त्याचे आम्ही अनेक शेतकरी बसून वाचन करत असू. उपग्रहाच्या छायाचित्रासह प्रसिद्ध होणारा हवामान अंदाज वाचायची सवय लागली. त्यानुसार धूळ पेरणी करू लागलो. अंदाजानुसार पाऊस आल्यास धूळ पेरणी यशस्वी होई.

'आजही स्मार्ट फोनवर हवामान अंदाज घेऊनच पीक नियोजन करतो. अॅग्रोवनच्या नियमित वाचनातून पिकांवरील किडी, रोगनियंत्रण, सुधारित अवजारे, शेतीपूरक व्यवसाय भाजीपाला लागवड, फुलशेती, प्रक्रिया उद्योग या माहिती मिळत होती. एका मोसंबी उत्पादकाची यशोकथा वाचल्यानंतर प्रेरणा घेऊन मीही पाच एकरांवर मोसंबी लावली. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी संपर्क वाढला. विद्यापीठातील खरीप आणि रब्बी मेळावे, वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनाला गावातील शेतकऱ्यासोबत जाऊ लागलो. आधुनिक तंत्रज्ञान समजू लागले. अॅग्रोवन दिवाळी अंकाचाही मी चाहता आहे. अनेक मित्रांना मी हा अंक भेट दिला आहे.

Success Story
Mix Cropping : शेती झाली पीक प्रात्यक्षिक केंद्र

आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग

जागतिक अन्न संघटना (एफएओ), कॉमन फंड फॉर कम्युनिटी (सीएफसी), हैदराबाद (पट्टणचेरी) येथील आंतरराष्ट्रीय अर्ध शुष्क कटिबंध पीक संशोधन संस्था (इक्रिसॅट) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत २००५ ते २००९ मध्ये खरीप ज्वारी सुधार आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत कोक (ता. जिंतूर) व सनपुरी (ता. परभणी) या दोन क्लस्टरची निवड केली.

त्या वेळी इक्रिसॅटचे प्रकल्प प्रमुख डॉ. अशोक आलूर, डॉ. बी. व्ही. एस. रेड्डी, डॉ. रवींद्र रेड्डी यांच्या सोबत मराठवाडा कृषी विद्यापीठाचे निवृत्त संशोधन संचालक डॉ. सुभाष बोरीकर, ज्वार पैदासकार डॉ. सुरेश आंबेकर, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सय्यद इस्माईल या शास्त्रज्ञांनी आम्हा शेतकऱ्यांना सुधारित व संकरित ज्वारी वाणाचे बियाणे तसेच लागवड तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षणे दिली. हा प्रकल्प महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांसोबत चीनमध्ये राबवला जात होता.

इक्रिसॅटतर्फे इलेक्ट्रिक ड्रायर यंत्र कोक (ता. जिंतूर) येथे उपलब्ध केले. धान्य साठविण्यासाठी गोदाम बांधले. ज्वारीच्या दाण्याची प्रत आणि बाजारभावही चांगले मिळू लागले. या प्रकल्पांतर्गत हैदराबाद येथील इक्रिसॅट व आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ (अंगारू) येथे अभ्यासासाठी नेले. एका अभ्यास दौऱ्यात उत्पादक -खरेदीदार संमेलनात थेट पोल्ट्री खाद्यनिर्मिती उद्योजकांशी खरीप ज्वारीच्या वापरावर चर्चा झाली.

त्यातून काही उद्योजकांनी ज्वारी खरेदी केली. तत्कालीन आंध्र प्रदेशातील व सध्याच्या तेलंगणातील मुल्कनूर (जि. करिमनगर) येथील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेला भेट दिली. त्यांच्याकडून राबवल्या जात असलेल्या बीजोत्पादन, पशुखाद्य निर्मिती उद्योग, कृषी सेवा केंद्र, पेट्रोलपंप, डेअरी इ. उद्योगाची माहिती मिळाली. त्याचा लाभ पुढे मला शेतकरी गट स्थापन करताना झाला.

रुजली प्रक्रियेची बीजे

इक्रिसॅट व परभणी कृषी विद्यापीठ यांचा गोड ज्वारी (स्वीट सॉरगम)पासून इथेनॉल निर्मिती प्रकत्पांतर्गत (२००९ ते २०११ कालावधी) परभणी तालुक्यातील नांदखेडा व सनपुरी या गावांची निवड झाली. त्यात दोन गावांतील अनेक शेतकरी गट सहभागी झाले. ज्वारीवर प्रक्रिया करण्यासंदर्भात आम्हाला हैदराबाद (पट्टणचेरु) इक्रिसॅटमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

पुढे या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नांदखेडा येथे गोड ज्वारीपासून रसनिर्मिती व गुऱ्हाळ घर उभारण्यात आले. इक्रिसॅट, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी देशांतील शास्त्रज्ञ प्रकल्पास भेट देत. खोल काळ्या मातीत (ब्लॅक डीप सॉइल) उंच वाढलेले भरघोस गोड ज्वारीचे पीक पाहून आश्‍चर्य करत. हुरड्यात आल्यानंतर ताटांमधील (धांडे) रस काढून ब्रिक्स मीटरवर साखरेचे प्रमाण मोजले. योग्य परिपक्वतेवर कणसे काढली. त्याची मळणी करून धान्य वेगळे केले.

ताटांपासून रस काढून पाक तयार केला. योग्य गोडीचा पाक साठवला. शिल्लक चोथ्याचा वैरण म्हणून वापर केला. चोथ्यामध्ये काही प्रमाणात धान्ये मिसळून अत्यंत पौष्टिक कांडी फीड तयार करण्याचे प्रशिक्षण इक्रिसॅटतर्फे आम्हाला देण्यात आले. म्हणजेच फक्त इथेनॉल निर्मितीवर न थांबता बेकरी पदार्थ, कफ सिरप, कोल्ड ड्रिंक्स, वाइननिर्मितीसाठी प्रयोग झाले. त्या वेळी इक्रिसॅटचे तत्कालीन महासंचालक विल्यम डार यांनी माझा गौरव केला होता. खरेतर कोरडवाहू शेतकऱ्यांना बहूउद्देशीय गोड ज्वारी पीक फायदेशीर ठरत होते. पाच वर्षांचा प्रकल्प तीन वर्षांनंतर अचानक बंद केला गेला. त्याचे नेमके कारण कळू शकले नसले, तरी त्यातून माझ्या मनामध्ये कृषिमाल प्रक्रियेची बीजे रुजली.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com