Pomegranate
PomegranateAgrowon

Pomegranate : प्रयत्नवाद, अभ्यासातून उभारलेले कृषिवैभव

धुळे जिल्ह्यातील काळगाव येथील संजय निंबाजी भामरे यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत व प्रयोगशीलतेतून कृषिवैभव उभे केले आहे. सहा एकर क्षेत्राचा विस्तार १०३ एकरांपर्यंत केला आहे. चोख व्यवस्थापन, जैविक व रासायनिक पद्धतीचा मेळ गुणवत्तापूर्ण मालाचा ध्यास, बाजारपेठांचा अभ्यास, कुटुंबाचा एकोपा ही त्यांच्या प्रगतीची मुख्य वैशिष्ट्ये ठरली आहेत

नाशिक- धुळे जिल्हा सीमाभागात वनक्षेत्र अधिक आहे. याच परिसरातील काळगाव (जि. धुळे, ता. साक्री) येथील संजय निंबाजी भामरे यांनी प्रगतिशील शेतकरी अशी राज्यात ओळख मिळवली आहे. त्यांचे पणजोबा कै. महीफत भामरे हे पिंगळवाडे (ता.सटाणा) येथून काळगावला गायी चरण्यासाठी स्थलांतरित होऊन येथेच स्थिरावले. वडील कै. निंबाजी ग्रामविस्तार अधिकारी होते.

शेती सहा एकर होती. सन १९८८ मध्ये संजय यांना दहावीनंतर शिक्षणशास्त्र पदविकेसाठी प्रवेश मिळाला. मात्र परिस्थिती अभावी शिकता आले नाही. मधले भाऊ विजय शिक्षक झाले. सर्वात धाकटे बंधू राजेंद्रही पूर्णवेळ शेतीत उतरले. १९८६ मध्ये मेहुणे राजेंद्र आहिरे (बापू) यांनी फलोत्पादनाकडे वळण्याचा सल्ला दिला.

मग भूविकास बँकेचे अर्थसाहाय्य घेऊन एक एकरात गणेश वाणाच्या डाळिंबाची लागवड केली. सन १९९१ नंतर द्राक्षाचे आठ वर्षे यशस्वी उत्पादने घेतले. मात्र डाळिंब हेच पीक अधिक फायदेशीर वाटले. गुणवत्तापूर्ण उत्पादन व त्यातून नफा हे समीकरण रुजवले. सन १९९९ मध्ये भगवा वाण निवडले. आज हाच वाण पूर्ण शिवारात रुजला आहे. सन २००४ मध्ये आठ एकर क्षेत्र भाडेपट्ट्यावर घेतले. शेतीतील उत्पन्नातून काळगाव येथे २६, तर बेहेड येथे ७७ एकर क्षेत्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला.

आजची शेती

-क्षेत्र- १०३ एकर (टप्प्याटप्प्याने क्षेत्र विस्तारले.)

-डाळिंब- ५७ एकर व सीताफळ १० एकर.

-मका-३० एकर (जुनी डाळिंब बाग काढून तेथे लागवड)

शेती व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये

-मृग, हस्त व आंबिया असे तीनही बहर घेतात.

-डाळिंब १४ बाय १० तर सीताफळ १२ बाय १० फूट अंतरावर लागवड

-सीताफळ एनएमके १ गोल्डन वाण.

-डाळिंब नियोजन-

-छाटणी ते काढणीपर्यंत विश्रांती काळात बोर्डोच्या तीन फवारण्या.

-खोडकीड नियंत्रणासाठी तीनवेळा रासायनिक कीटकनाशकांची आळवणी.

-छाटणीपश्‍चात बागेची स्वच्छता. सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा मेळ.

-छाटणी केल्यानंतर सुरुवातीला भरखतांमध्ये कुजलेले शेणखत, स्वतः दळून घेतलेली निंबोळी पेंड, बोनमील, १०:२६:२६, सिंगल सुपर फॉस्फेट व सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या मात्रा.

-झाडावर १२५ ते १५० मर्यादित एकसारखी फळे.

-पांढरी मुळी कार्यक्षम राहण्यासाठी, माल फुगवणूक होण्यासाठी एरंडी पेंड, सरकी पेंड व सूत्रकृमी नियंत्रणासाठी निंबोळी पेंड.

-पाऊस आर्द्रता, उष्णता आदी हवामानाच्या घटकांचा विचार व झाडाजवळचे तापमान लक्षात घेऊन

फळकाढणीपूर्व नुकसान टाळण्याचे नियोजन.

-मधमाशांचा अधिवास टिकून राहण्यासाठी हानिकारक रसायनांच्या फवारण्या टाळून जैविक कीडनाशकांवर भर.

-मजूरटंचाईवर मात करण्यासाठी फवारणी, मशागत व कापणी यंत्रे.

Pomegranate
Pomegranate Rate : स्पेनच्या ‘पोमवंडर’शी भारताच्या ‘भगव्या’ची स्पर्धा

-हस्त बहरातील फळांचे नुकसान टाळण्यासाठी बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचा १५ एकरांत वापर.

-वर्षभर ३० ते ३५ निवासी मजूर. अन्न, आरोग्य गरजांची पूर्ती

-तीन शेततळ्यांच्या माध्यमातून आठ कोटी संरक्षित पाणीसाठा

उत्पादकता (एकरी)

डाळिंब- ८ ते १२ टनांपर्यंत., उत्पादन खर्च- दीड ते दोन लाख रु.

सीताफळ- ६ ते ८ टनांपर्यंत. उत्पादन खर्च- ४० हजार रु.पर्यंत.

बाजारपेठा

-मालाची गुणवत्ता जपल्याने दक्षिण व उत्तर भारतासह बांगलादेशला निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बांधावर खरेदी.

-दिल्ली, कोलकता, बंगळूर यासह उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांतील बाजारपेठेत माल जातो.

-‘अमोल प्रसाद’ हा शेतीमालाचा ब्रॅण्ड.

-बांगलादेश, दुबई येथेही निर्यात होते. सन २०१३-१४ मध्ये डाळिंबाची युरोपात निर्यात.

-तीन वर्षांत डाळिंबाला ५५ रुपयांपासून ते १०२, १२५ रुपयांपर्यंत दर.

बाजारपेठ नियोजन

-देशभरातील सण उत्सव यांच्या तारखा विचारात घेऊन बहर, उत्पादन नियोजन.

-मार्च ते जुलै बाजारात स्थिर काळ असल्याने त्यानुसार पुरवठ्याचे गणित साधतात.

-विना डागी, २०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या फळांना प्राधान्य. ७० टक्के माल ४०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या सरासरीत असल्यास उठाव चांगला ही बाब लक्षात घेऊन कामकाज.

Pomegranate
Pomegranate Cultivation : एकेरी खोड, घनपद्धतीने डाळिंब लागवड

फळमाशी नियंत्रण

-फळमाशीची निरीक्षणे नोंदवून मर्यादित फवारण्या. सापळ्यांचा वापर करून नियंत्रण यशस्वी.

-अळीच्या प्रादुर्भाव काळात दिल्ली बाजारात व्यापाऱ्यांना मालाची हमी देत नुकसान असल्यास पैसे देऊ नका अशी बोली केली. त्यावेळी चार बॉक्स १०१ प्रति किलोने दराने पाठवून दिल्ली बाजारपेठ मिळाली. मागील वर्षी १३५ रुपये दराने विक्री साध्य झाली.

माती हाच श्‍वास

-मृदा आरोग्य जपण्याला प्राधान्य. जमिनीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने तीस एकरांवरील

जुनी डाळिंब बाग काढली.

-पीक फेरपालटावर भर. बुरशी नियंत्रित करण्यासाठी दोन वर्षे मका व तिसऱ्या वर्षी बाजरी व झेंडू लागवड. फुलोरा अवस्थेत रोटाव्हेटर फिरवून पीक अवशेष गाडण्याचे नियोजन. तेथे डाळिंब पुनर्लागवड.

-जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढविण्यासाठी अधिकाधिक जिवाणू खतांचा वापर. तणनाशकाची फवारणी न करता ग्रासकटरद्वारे कापून बोदावर हिरवळीचे खत म्हणून वापर.

-महिन्यातून दोन वेळा जैविक स्लरीचा पुरवठा.

-मोबाईल स्टेट्सवर “मातीचा मी दास आहे, माती माझा श्‍वास आहे” हा संदेश.

तेलकट डाग रोगाशी संघर्ष

सन २०१३ मध्ये गारपिटीत २०० टन माल फळधारणा अवस्थेत असताना बाग उद्‍ध्वस्त झाली. पुन्हा २०१४ मध्ये बहर घेतला त्या वेळी तेलकट डाग रोगाने थैमान घातले. त्या वेळी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे जाऊन मार्गदर्शन घेतले. अर्थव्यवस्था कोलमडली होती. अशावेळी शेतीतील उत्पन्नातून धुळे येथे खरेदी केलेला प्लॉट विकून भांडवल उभे केले. त्यातून बाग सशक्त करण्यासाठी खर्च केला. रासायनिक खते कमी करून शेणखत, विविध पेंडी, बोनमिल, मासळी खत यांचा वापर केला. समस्या येतात तेव्हा बागा काढून टाकणे हा मार्ग नाही. स्व अनुभव व संशोधन यामाध्यमातून लढून पुढे गेले पाहिजे असे संजय सांगतात.

पाण्याचे मोल जाणले (इन्फो २)

माळरानावर बागा फुलविताना अक्कलपाडा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात विहीर खोदून १३ किलोमीटर अंतरावर थांबा करून पाणी शिवारात आणले. त्यासाठी ९६ लाख रुपये खर्च केला. सन २०१२-१३ मध्ये दुष्काळात तत्कालीन फलोत्पादनमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यातून २०१३-१४ मध्ये विशेष पॅकेज मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण क्षेत्रावर केंद्रीकृत ठिबक सिंचन प्रणाली आहे. आंबिया बहरात डबल तर मृग बहरात सिंगल लॅटरल ठिबक व्यवस्था असते.

आर्थिक व्यवस्थापन

सन २००८ मध्ये फलोत्पादन विकासासाठी २८ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र डाळिंबाचे उत्पन्न एकत्र करून दोन वर्षांत ते फेडण्याचा प्रयत्न केला. वेळेवर भरणा केल्याने बँकेत पत वाढली. दरवर्षी शेतीत नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी गुंतवणूक होते. संपूर्ण कुटुंबीयांचा जीवन विमा घेतला असून मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कुटुंब आग्रही आहे.

पुरस्कार

-उद्यान पंडित पुरस्कार

- दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा ‘कृषी सन्मान’

- ‘सकाळ जीवन गौरव पुरस्कार’

-अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचा डाळिंबरत्न.

-कृषी विभागाचा राज्यस्तरीय सेंद्रिय शेती कृषिभूषण.

-महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कृषिमित्र.

कुटुंबाची एकी

आई जिजाबाई यांची प्रेरणा, भाऊ विजय व राजेंद्र यांची समर्थ साथ, घरातील महिलावर्ग नूतन, स्नेहलता, मनीषा यांचा हातभार व मुले गिरीश व योगेश यांची मदत होते. शेतीतील आदर्श ताळेबंद मांडला जातो. कुठलाही निर्णय भावंडे आईच्या सल्ल्यानेच घेतात. शेताच्या प्रवेशद्वारावर वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ “ कै. हभप नानांचा माळा’ असे फलक लावले आहेत. कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभते. राज्यभरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, मंत्री व शासकीय अधिकारी आवर्जून शेताला भेटी देतात. संजय लोकनियुक्त सरपंचही झाले आहेत.

संपर्क : संजय भामरे, ९७६४८०७७६५

राजेंद्र भामरे, ९८३४१४५६२५, ९९२३०४२७६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com