Khoya Production : दुग्ध व्यवसायाला दिली खवा निर्मितीची जोड

Dairy Business : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेरी (ता. कुडाळ) येथील विजय सावळाराम खोचरे यांनी छोट्याशा दुग्ध व्यवसायाला खवा निर्मितीची जोड दिली. आता खवा निर्मिती उद्योग हा त्यांचा मुख्य उद्योग झाला.
Khoya Production
Khoya ProductionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील आंबेरी हे डोंगरदऱ्यात वसलेले आणि निसर्ग संपन्न गाव. कोकणातील अन्य गावांप्रमाणेच खरिपात भात, नाचणी, तर रब्बीमध्ये भाजीपाला, भुईमूग, कुळीथ, वाल अशी पिके घेतली जातात. यासह आंबा, काजू फळबागा असलेल्या या गावातील शेतकरी गेल्या काही वर्षांत बांबू लागवडीकडे वळले आहेत.

या गावातील विजय सावळाराम खोचरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सातारा येथील खासगी कंपनीत अनेक वर्षे नोकरी केली. कौटुंबिक अडचणीमुळे नोकरी सोडून त्यांना गावी यावे लागले. सुरुवातीला वडिलोपार्जित दोन एकरांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली. मात्र नुसत्या शेतीतून छोटेखानी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी ट्रक व्यवसाय सुरू केला.

पण वाहतुकीच्या या व्यवसायातही त्यांना शेती सतत खुणावत होती. आता शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्याचा निर्णय घेतला. २००६ दोन म्हशी खरेदी करून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय अधिक फायदेशीर कसा करता येईल, यासाठी त्यांची धडपड सुरूच होती. एक मित्र आधुनिक पद्धतीने खवा निर्मितीचा उद्योग करीत होता. त्यानेच खोचरे यांना खवा उद्योगासाठी प्रोत्साहित केले. त्याच्याकडील खवा निर्मितीची भांडीही मिळाली. काही दिवस या मित्राकडून खवा उद्योगातील बारकावे जाणून घेतले.

Khoya Production
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

खवा उद्योगाचा श्रीगणेशा

३ नोव्हेंबर २००७ मध्ये घरातील म्हशीचे दूध आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून किरकोळ स्वरूपात दूध विकत घेतले. या २० लिटर दुधावर प्रक्रिया करत खोचरे यांनी आपल्या खवा उद्योगाचा श्रीगणेशा केला. पारंपरिक पद्धतीच्या या उद्योगामध्ये भट्टीतील जाळ व अन्य गोष्टी जमवताना त्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात कामातील तफावतीचा अंदाज आला. पहिले पाच सहा महिने उत्तम दर्जेदार खवा जमण्यामध्येच गेले. अनेकदा ५० ते ६० किलो दुधाचा खवा योग्य दर्जाचा न झाल्याने टाकावा लागला तरीही त्यांनी हिंमत हरली नाही.

चिकाटीने मिळाले बाजारपेठेत स्थान ः

एका बाजूला खवा उत्पादनावर काम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांची धडपड त्याच्या विक्रीसाठी सुरू होतीच. पण दर्जेदार खवा तयार झाल्यानंतर त्याला अधिक वेग आला. कुडाळ शहरातील विविध व्यावसायिकांची भेट आपल्या खव्याविषयी सांगत राहिले. ‘‘पण तुम्ही नियमित पुरवू शकाल, याची काय खात्री?’’ असा त्यांचा सवाल असे.

पहिल्या सहा महिन्यामध्ये प्रयत्न करूनही एकही ऑर्डर मिळाली नाही. तरीही अपमान न मानता, हार न मानता दहा- दहा वेळा ते व्यापाऱ्यांकडे जात राहिले. त्यातून व्यापाऱ्यांची मानसिकता बदलत गेली. थोडी फार ऑर्डर मिळू लागली. खव्याचा दर्जा आणि टिकवलेले सातत्य यामुळे पुढील काही महिन्यांतच त्यांनी बाजारपेठेत भक्कम स्थान मिळविले.

केव्हा, काय आणि किती?

खवा व्यवसायात जम बसल्यानंतर खोचरे यांना त्यातील बारकावे लक्षात येऊ लागले. उदा. काही ठरावीक महिन्यात खव्याला मोठी मागणी असते. अन्य काळात स्वतःच्या दुधासह जोडलेले शेतकरी दुखावले जाऊ नयेत म्हणजे संकलित दुधाचे काय करायचे, याचा विचार केला. जानेवारी ते मार्च महिन्यात ताक, दही, तूप आदी उत्पादनाची निर्मिती करत त्यावर मार्ग काढला.

या उत्पादनाच्या थेट विक्रीसाठी अनेकदा रस्त्यावर उभे राहूनही विक्री केली. केव्हा, काय आणि किती या त्रिसूत्रीच्या आधारे व्यवसायाची रचना केली. कोणत्या हंगामात, कोणते उत्पादन आणि किती प्रमाणात लागते याची टिप्पणी तयार केली. त्यानुसार त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला. याशिवाय बारसे, वाढदिवस, लग्न, मुंज अशा कार्याकरिता पेढ्यांच्या ऑर्डर ते घेऊ लागले. आताही २० किलोच्या पुढील पेढ्यांच्या ऑर्डर ते स्वीकारतात.

Khoya Production
Agriculture Success Story : अल्पभूधारक देसले बंधू झाले ४५ एकरांचे मालक

खवा उद्योगातील १८ वर्षांचा अनुभव

सुरुवातीला २० लिटर दुधावरील प्रकिया आता २५० लिटरपर्यंत पोहोचली आहे. हंगामात त्यापेक्षा अधिक दुधावर प्रकिया केली जाते. त्यासाठी आजूबाजूच्या निवजे, घावनळे, बामनादेवी, रांगणा तुळसुली, माणगाव धरणवाडी इ. गावातून दूध संकलित केले जाते. साडेसहा फॅट आणि ९.६ एसएनएफ असलेल्या दुधाला प्रतिलिटर ५५ रुपये दर देतात. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यत ५०० ते ५५० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

त्यानंतर मेपासून ऑगस्टपर्यंत दूध संकलनात कपात होत असली तरी सरासरी २०० लिटर खरेदी केले जाते. सुमारे चार लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो. खवा प्रतिकिलो ३१० रुपये प्रमाणे विकला जातो. पेढे विक्री प्रतिकिलो ४८० रुपये प्रमाणे केली जाते. महिन्याला सरासरी १५०० किलो, तर वर्षभरात १८ टन खवा विक्री करतात. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात पाच टन खवा उत्पादन केले. खवा कुडाळ, माणगाव, शिरोडा, सावंतवाडी या भागांतील व्यापाऱ्यांना विकला जातो.

व्यवसायामुळेच झाली भरभराट...

खवा निर्मिती व्यवसायातून ५५ ते ५६ लाख रुपयांचा वार्षिक उलाढाल होते. उलाढालीच्या २० टक्के नफा गृहीत धरला तरी वार्षिक १२ लाख रुपये मिळतात. त्यातून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा वार्षिक हप्ता २ लाख ५२ हजार रुपये वजा करता १० ते ११ लाख रुपये निव्वळ उत्पन्न हाती येते. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रथम २००७ मध्ये दूध संकलनासाठी दुचाकी खरेदी केली. व्यवसाय वाढत गेल्यामुळे २०१० मध्ये पहिली कार घेतली. शेतीकरिता २०१४ मध्ये पहिला १२ एचपीचा पॉवर टिलर घेतला, तर २०१९ मध्ये दुसरा पॉवर टिलर घेतला.

दूध संकलनासाठी २०१९ मध्ये टेम्पो खरेदी केला. २०१९ मध्ये एक एकर शेतजमीन खरेदी केली. त्यानंतर २०२२ पर्यंत एकूण तीन एकर शेतीमध्ये १५० बांबू बेटे, आवळा (१० झाडे), नारळ (२५ झाडे), सुपारी (१०० झाडे) अशा फळझाडांची लागवड केली आहे. स्वतःच्या गुंतवणुकीला थोड्या आर्थिक जुळवाजुळवीची जोड देत २० लाख रुपये खर्चून नुकतेच प्रशस्त घर बांधले आहे.

पत्नी शुभांगीसोबतच मुलगा चिराग, मुली नेहा आणि गायत्री शिकत असतानाच व्यवसायात मदत करतात. या तिघांच्या मदतीमुळेच विजय यांना विक्रीसाठी अन्यत्र जास्त लक्ष देता येते. हंगामात गरजेनुसार एखादा कामगार घेतला जातो. आता मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि विमा अशा बाबींवर प्राधान्याने गुंतवणूक करत आहे.

व्यवसायात आणली आधुनिकता

२००६ मध्ये पारंपरिक पद्धतीने मित्राकडून घेतलेल्या भांड्यावर सुमारे १६ वर्षे व्यवसाय केला. २०२२ मध्ये प्रधानमंत्री लघू, सूक्ष्म उद्योग योजनेतून ७ लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव मंजूर झाला. त्यातून राजस्थानातून व्यवसायाच्या आधुनिक मशिन्स खरेदी केल्या. या योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदानही मिळाले आहे.

विजय खोचरे, ९४०४९१७४१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com