Contract Farming : स्वतःच्या शेतीला करारशेतीची जोड!

Article by Vinod Ingole : नागपूर जिल्ह्यातील करंभाड (ता. पारशिवणी) येथील भक्‍ते कुटुंबीयांनी स्वतःच्या १० एकर शेतीसोबतच अन्य शेतकऱ्यांच्या ६० एकर करारावर घेत आपले आर्थिक नियोजन बसवले आहे. मिरची हे त्यांचे नगदी पीक ठरले असून, त्याला कपाशी, सोयाबीन अशी जोड देत जोखीम कमी केली आहे.
Bhakte Family and Farming
Bhakte Family and FarmingAgrowon

Success Story of Farmer : पारशिवणी तालुक्‍यातील करंभाड, दहेगाव ही गावे हिरव्या मिरची उत्पादनासाठी ओळखली जातात. पूर्वी गावामध्ये ३०० ते ३७५ एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरची पीक घेतले जाई. त्याची बहुतांश विक्री मध्य प्रदेशातील जबलपूर, शिवणी भागात होत असे. मात्र दरम्यानच्या काळात वाढलेल्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मिरची पिकाखालील क्षेत्र कमी होत १५० एकरांवर आले आहे.

आता बहुतांश मिरची विक्रीसाठी नागपूर बाजारपेठेत पाठवली जाते. करंभाडमध्ये भक्‍ते कुटुंबीयांची १० एकर वडिलोपार्जित शेती आहे. कुटुंबात आई गोकुळा, वडील झामाजी यांच्यासह गुणेश आणि खुशाल अशा दोन्ही भावंडाचे कुटुंब एकत्र नांदत आहे.

शेती बनवली अधिक उत्पादनक्षम :

वडिलोपार्जित शेती प्रामुख्याने कोरडवाहू असल्याने सोयाबीन, कपाशी, मिरची अशी पिके घेतली जात. केवळ पावसावर अवलंबून असलेल्या या पिकांतून उत्पादनही जेमतेम मिळत असे. सिंचनासाठी म्हणून २००० मध्ये शिवारात विहीर खोदली. त्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळाले. विहिरीला पाणी लागल्याने उत्साह वाढलेल्या भक्‍ते यांनी आपल्या गावच्या पूर्वापार मिरची पिकावरच लक्ष केंद्रित केले.

तसे पाहता भक्ते कुटुंबीय नगदी पीक म्हणून १९९४-९५ पासून मिरची पीक घेत होते. पेंच कालव्याच्या मिळणाऱ्या थोड्याफार पाण्यावर केवळ एक एकर क्षेत्राचे सिंचन शक्य होई. म्हणून केवळ एक एकर असलेले मिरची खालील क्षेत्र पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे चार एकरपर्यंत वाढविण्यात आले. मिरची खालील क्षेत्र वाढवण्यासोबत पिकात सातत्य राखल्यामुळेच आर्थिक भरभराट झाली, असे गुणेश सांगतात.

Bhakte Family and Farming
Success Story : कृषक पुत्र शेतकरी कंपनीची आश्‍वासक वाटचाल

...असे आहे मिरची पिकाचे अर्थकारण

मिरचीचे हेक्‍टरी सरासरी ३० टन उत्पादन मिळते. बाजारातील चढ उतार गृहीत धरला तरी साधारणपणे सरासरी ३० हजार रुपये टन असा दर मिळतो. या पिकाच्या व्यवस्थापनात सर्वाधिक खर्च तोडणीवर होत असल्याचे गुणेश भक्‍ते सांगतात. त्यांच्या मते, हेक्‍टरी सुमारे १ लाख ५० हजार रुपये खर्च यावर होतो.

त्या पाठोपाठ कीड-रोग नियंत्रण हेही आव्हानात्मक राहते. सातत्याने पिकाचे निरीक्षण करत योग्य वेळी फवारणीचा निर्णय घ्यावा लागतो. हा खर्च सरासरी ८५ हजार रुपये इतका राहतो. त्यानंतर मशागत आणि खत व्यवस्थापनावर सरासरी १,१०,००० रुपये खर्च होतो. अशा प्रकारे हेक्टरी उत्पादन खर्च रु. ३.४५ लाख रु. खर्च होतो. नागपूर किंवा चाचेर बाजारपेठेत हिरव्या मिरचीची विक्री केली जाते.

Bhakte Family and Farming
Flour Manufacturing Industry : पीठ निर्मिती उद्योगातून बसविली आर्थिक घडी

सोयाबीन पीकही देते उत्तम उत्पन्न

खरिपामध्ये सोयाबीन पिकाची बीबीएफ पद्धतीने लागवड केली जाते. गेल्या हंगामातील सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी १७.५ क्‍विंटल मिळाले. त्याला सरासरी ४८०० रुपयांचा दर मिळाला. त्यातून ८४ हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. त्यातून पीक व्यवस्थापनाचा खर्च ३२,५०० रु. वजा करता ५१,५०० रुपये निव्वळ नफा मिळाल्याचे गुणेश सांगतात.

ट्रॅक्‍टरमुळे साधते बचत

दरवर्षी स्वतःच्या शेतीसह करारावरील शेतीच्या मशागत व अन्य कामांसाठी ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागत असे. त्यात उत्पादन खर्च वाढत होतो. म्हणून एक ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानामध्ये काही प्रमाणात अनुदान मिळाले आहे. विविध योजनांसह शेतीच्या व्यवस्थापनामध्ये कृषी सहायक अविनाश ढोले यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरत असल्याचे गुणेश यांनी सांगितले.

करारावर करतात शेती

घरच्या १० एकर शेतीच्या जोडीला अन्य शेतकऱ्यांची तब्बल ६० एकर शेती कराराने केली जाते. त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार सरासरी १२ ते १५ हजार रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना दिले जातात. या संपूर्ण क्षेत्रावर प्रामुख्याने कपाशी व त्यात तुरीचे आंतरपीक घेतले जाते. कपाशी साधारणपणे सहा फूट उंचीची झाल्यानंतर शेंडे खुडणीवर भर दिला जातो.

यामुळे फांद्यांची संख्या वाढून बोंडधारणा अधिक होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिणामी, उत्पादनही हेक्‍टरी ३९ क्‍विंटलपर्यंत मिळते. पीक व्यवस्थापनासाठी हेक्‍टरी दीड लाखापर्यंत खर्च होतो. गेल्या वर्षीच्या हंगामात सरासरी ७५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

पूरक व्यवसाय :

भक्ते यांच्याकडे दोन जर्सी गाई असून, त्यांच्यापासून दहा लिटर दूध मिळते. घरगुती वापरासह घराशेजारील ग्राहकांनाच ५० रुपये लिटरप्रमाणे विक्री केली जाते.

त्यांनी परसातच गावरान कुक्‍कुटपालनावर भर दिला आहे. सध्या त्यांच्या २५ कोंबड्या असून, मांसासाठी ५०० रुपये किलो प्रमाणे पक्ष्यांची विक्री केला जाते. वर्षभरात १८ ते २० कोंबड्यांच्या विक्रीतून ९ ते १२ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. त्यासोबतच प्रति अंडी १० रुपये या प्रमाणे गावरान अंड्यांचीही विक्री केली जाते. त्यातून वर्षाला पाच हजार रुपये मिळतात. आवश्यकतेनुसार तातडीने पैसे देणारा हा व्यवसाय असल्याने गरजेवेळी पैसा खेळता राहत असल्याचे त्यांचा अनुभव आहे.

गुणेश भक्‍ते, ८२०८९३३६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com