Local Varieties Conservation : लोकसहभागातून पिकांच्या स्थानिक वाण संवर्धनाला गती...

Local Varieties : पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे पीक वाण संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी दिला जाणारा “ राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार २०-२१” हरणखुरी(ता.धडगाव, जि.नंदूरबार) येथील याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीस राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल (ता.१२) प्रदान करण्यात आला.
Local Varieties Conservation
Local Varieties ConservationAgrowon

संजय पाटील
Crop Variety Conservation : पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे पीक वाण संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी दिला जाणारा “ राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार २०-२१” हरणखुरी(ता.धडगाव, जि.नंदूरबार) येथील याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीस राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल (ता.१२) प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने या समितीच्या कार्याचा परिचय...

नंदुरबार जिल्ह्यात २०१० पासून बाएफ संस्थेमार्फत लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन,उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या अंतर्गत मका,ज्वारी,भरड धान्य, कडधान्य इत्यादी पिकांच्या शंभराहून अधिक वाणाचे संवर्धन,अभ्यास आणि लागवड करण्यात येत आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये मका, ज्वारी, भादी, बर्टी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या सुमारे १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते.

हरणखुरी, चोंदवडे गावात दोन सामुहिक बियाणे बँकांमार्फत मका,ज्वारी, भादी,बर्टी इत्यादी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन व विक्री करण्यात आली. महुवा (मधुका इंडिका), चारोळी (बुकनानिया लांझान) पिकाची विशेष गुणधर्माची झाडे शोधण्यात आली. त्यापासून ६१,२०० रोपे तयार करण्यात आली. या पिकांची २६.५ हेक्टरवर लागवड केली आहे.

सध्या मका (२५० हेक्टर), ज्वारी (३१० हेक्टर), भादी (२७० हेक्टर), बर्टी (२९८ हेक्टर), उडीद (४० हेक्टर), लसूण (६३ हेक्टर) आणि हरभरा (३४ हेक्टर) या पिकांची लागवड करण्यात आली आहे. या संवर्धन कार्यक्रमाशी ८५७ शेतकरी जोडले आहेत. पोषण सुरक्षेसाठी १२०० हून अधिक कुटुंबांकडे परसबाग आहेत. दैनंदिन आहारात भाजीपाला, फळे आणि कंद पिकांचा समावेश झाला आहे.


केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणामध्ये “याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीच्या नावे ज्वारीच्या पाच वाणांची नोंद झाली आहे. स्थानिक पीक वाणांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी तसेच विविध संस्था आणि शेतकऱ्यांना संशोधन आणि प्रसारासाठी दिले आहे. बाएफ मार्फत सुरु असलेल्या कृषी जैव विविधता संवर्धन व व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत हा सन्मान कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्था (अकोले,जि.नगर) आणि बियाणे संवर्धन शेतकरी समिती (जव्हार,जि.पालघर) यांना मिळाला आहे.

Local Varieties Conservation
Water Conservation : लोकसहभागातून जलसंधारणामुळे घाटसिरस झाले पाणीदार

पीक वाण संवर्धन कार्यक्रमाची सुरवात ः
बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन मार्फत २००८ पासून महाराष्ट्रातील स्थानिक पीक संवर्धन आणि रानभाज्यांचे संवर्धन आणि व्यवस्थापन सुरू आहे. पीक विविधता आणि संबंधित ज्ञानाचे संकलन, पीक वाणांचा प्रक्षेत्रीय अभ्यास ,पोषण तत्त्वे आणि जनुकीय पातळीवर अभ्यास,बियाणे उत्पादन, बियाणे बँकांची साखळी तयार करणे आणि त्याचा प्रचार प्रसार केला जातो.

राज्यातील गडचिरोली (एटापल्ली),पालघर (जव्हार), नगर (अकोले),सिंधुदुर्ग (कुडाळ), नाशिक (इगतपुरी),पुणे (राजगुरुनगर) या भागात सुरु आहे. कृषी जैव विविधता संवर्धनातून वातावरण बदलाच्या परिस्थितीत पोषण सुरक्षा आणि जीवनमान उंचविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.

Local Varieties Conservation
Environmental Conservation Seed Ball : बीज चेंडू मुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार

धडगाव तालुक्यातील पीक वाण संवर्धन ः
१) नंदुरबार हा महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडील जिल्हा. जमीन मध्यम ते हलक्या प्रकारची,काळी तपकिरी आणि पिवळसर रंगाची, शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून. पावसाचे प्रमाण ५२५ मिमी ते ११५० मिमी. पावरा आणि भिल्ल हे दोन मुख्य आदिवासी जमाती आहेत.
२) पूर्वी या भागात मका, ज्वारी, बाजरी, इतर भरड धान्य आणि वनस्पतींची विविधता होती. परंतु एक पीक पद्धती आणि सुधारित पीक जातीचे प्रसाराने ही वैविध्यपूर्ण पिके आणि पीक पद्धती धोक्यात.
३) २०१० पासून बाएफ संस्थेमार्फत धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात कृषी जैवविविधता कार्यक्रम. या माध्यमातून याहा मोगी
माता स्थानिक बियाणे संवर्धन समितीची सुरवात.

सामुदायिक बियाणे बँकांद्वारे स्थानिक पीक वाणातील विविधतेचे संवर्धन ः
१) याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून विविध स्थानिक पिकांच्या एकूण १०८ पीक जातींचे संवर्धन, जतन आणि व्यवस्थापन.
२) मका (२१), ज्वारी (१९), बर्टी (३),भादी(३) तसेच हरभरा, चवळी,वाल, भाजीपाला इत्यादी पिकांमधील विविधतेचे संवर्धन.
१) तृणधान्ये : मका, ज्वारी,मोर,भादी,बरटी,नाचणी.
२) कडधान्ये ः वाल ,हरभरा,उडीद,चवळी,वाटाणा,तूर.
३) तेलबिया : तीळ, एरंडी, भुईमूग.
४) भाजीपाला ः दुधी भोपळा ,अंबाडी,कारले,भेंडी,मोठा भोपळा,तांबडा भोपळा,वांगी, गिलकी, दोडका,गवार,मिरची,वाल पापडी,रताळे,धणे,मेथी इत्यादी.
५) गौण वनोपज ः महू,चारोळी,हिरडा आणि बेहडा.

दुर्मिळ पीक वाणांचे संवर्धन :
१) मका (केहारी मुकाई, कुक्कुड मक्कई, तपकिरी मुकाई), ज्वारी (दूधमोगरा, माणी जुवार आणि चिकनी जुवार, ओव्हल मुंडी, गेदी जुवार), लाल भोपळा (राय कुलो), भादी (रातल भादी ), वाल (बारमाही प्रकार), गावरान उडीद, तीळ इत्यादी पिकांचे संवर्धन.
२) जंगलातील दुर्मिळ अन्न वनस्पतींमध्ये कंद, पालेभाज्या, फुले आणि फळांच्या तीसहून अधिक वनस्पतींबद्दलचे स्थानिक ज्ञान संकलन करून संवर्धन.
३) बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बियाणे संवर्धकांनी निवडलेल्या स्थानिक पीक जातींचे बीजोत्पादन.
४) शेतकऱ्यांच्या सहभागाने परिसरातून गोळा केलेल्या पिकातील स्थानिक जातींच्या वाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरणाचे काम.

याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समितीच्या नावावर नोंदणीकृत ज्वारी जाती ः
१) लहान मानी जुवार ः परिपक्वता कालावधी १०५ ते ११० दिवस. राखाडी रंगाचे मध्यम गोल दाणे, काजळी रोगास प्रतिकारक्षम. चाऱ्यासाठी उत्तम. वाऱ्याने लोळत नाही. भाकरीसाठी पसंती.
२) मोठी मानी जुवार ः परिपक्वता कालावधी १०५ ते ११० दिवस, राखाडी पांढऱ्या रंगाचे दाणे, अर्ध घट्ट कणीस. काजळी रोग आणि रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षम. धान्य आणि चारा उत्पादनासाठी चांगले. भाकरीसाठी पसंती.
३) चिकणी लाल जुवार ः परिपक्वता कालावधी ११५ ते १२० दिवस, राखाडी केशरी रंगाचे दाणे. अर्ध घट्ट कणीस, कमी पाण्यात तग धरते, वाऱ्याने लोळत नाही. इतर वाणापेक्षा चांगला दर,चिकटपणा, गोडसरपणामुळे पापड बनवण्यासाठी वापर.
४) मोठी सफेद जुवार ः परिपक्वता कालावधी ११५ ते १२० दिवस, घट्ट कणीस, गोल आकाराचे दाणे, चाऱ्यासाठी मागणी. रस शोषक किडीस प्रतिकारक्षम. गोडसरपणामुळे भाकरीसाठी उत्तम.
५) चिकणी लाल जुवार ः परिपक्वता कालावधी ११० ते १२० दिवस, राखाडी केशरी रंगाचे दाणे, अर्ध घट्ट कणीस. काजळी रोग आणि रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षम. अधिक चिकटपणा,गोडसर चवीमुळे पापड तयार करण्यासाठी उपयुक्त. चांगला दर.

पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन :
मका ः

मोठी पिवळी मका ः ११५ ते १२० दिवसात तयार, उंच वाढते, वाऱ्याने लोळत नाही. पिवळ्या रंगाचे दाणे, दाण्यांमध्ये गोडसरपणामुळे लाडू, भाकरीसाठी वापर.
सावा ः
१) लहान भादी : ११५ ते १२० दिवसात तयार. मध्यम आकाराचे दाणे, घट्ट कणीस, सोनेरी पिवळ्या रंगाचे दाणे, कमी पाण्यात तग धरते. दाणे गळत नाहीत. चांगला दर. गरोदर, स्तनदा मातेसाठी उत्तम आहार.
२) हांगरी भादी ः उतार असलेली जमीन, पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी लागवड. लापशी तयार करण्यासाठी वापर. स्तनदा आणि गरोदर मातांसाठी चांगला आहार.


संपर्क ः - संजय पाटील, ९६२३९३१८५५
- लीलेश चव्हाण, ९४२२९९५१२१
(लेखक बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन संस्थेमध्ये मुख्य कार्यक्रम अधिकारी (कृषी जैवविविधता) आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com