Paddy Farming
Paddy Farming Agrowon

Paddy Farming : दर्जेदार तांदूळ उत्पादनात नाव कमावलेले आमळी

Paddy Variety Conservation : नंदूरबार जिल्हा व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले आमळी हे धुळे जिल्ह्यातील गाव भातशेती व तांदळासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांनी भातासह नागलीच्या विविध वाणांची विविधता जोपासली आहे.
Published on

Tribal Village Development : धुळे जिल्ह्यात आमळी (ता. साक्री) हे नागपूर- सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटानजीक वसलेले आदिवासी बहुल गाव आहे. सहा पाडे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. गुजरात राज्य व नंदुरबार जिल्ह्यानजीक असलेल्या या परिसराला खानदेशचे कोकण म्हणता येते. पावसाळ्यात हे पर्यटनाचे केंद्र बनते. हिरव्या डोंगररांगा, घाटातील झरे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

पाऊसमान अधिक असून भात व नाचणी प्रमुख पिके आहेत. दीडशे हेक्टर एवढेच क्षेत्र असलेल्या गावाची शेती मध्यम, खडकाळ, मुरमाड, मध्यम असून बागायती क्षेत्र १० टक्के आहे. तीव्र उताराचे डोंगर असल्याने पाणी जिरत नाही. त्यामुळे जानेवारीनंतर पाणी राहात नाही.

भात वाणांमधील विविधता

आमळीत नाचणीची १५० ते २०० हेक्टरपर्यंत तर भाताची २०० ते २५० हेक्टरवर लागवड आहे. नागलीच्या पारंपरिक वाडी, पेकरी, गोडी या वाणांचाच वापर होतो. तर भाताचे इंद्रायणी, खुशबू, मधुमती, रूपाली, सोना मसुरी, मोहरा हे वाण असतातच, शिवाय देशी प्रकारच्या कोलम, सुकवेल, भवाड्या, कमत आदी वाणांची विविधता पाहण्यास मिळते. पारंपरिक वाणांचे संवर्धन गावकऱ्यांनी केलेच, पण चारसूत्री किंवा शेतीतील नवे तंत्रज्ञानही त्यांनी आत्मसात केले आहे.

खरिपात सोयाबीनही असते. भात व नागलीसाठी शक्यतो सेंद्रिय, नैसर्गिक शेतीवर शेतकऱ्यांचा भर असतो. जीवामृत, ताग, धैंचा, पालापाचोळा, शेणखत, कंपोस्ट खत यांचा कार्यक्षम उपयोग ते करतात. नैसर्गिक शेतीमुळे खर्च अल्प व सेंद्रिय अन्न मिळते. गावात प्रति सुमारे १५ शेतकऱ्यांचे मिळून १९ गट स्थापन झाले असून पैकी कमाल गट सक्रिय आहेत. इर्जिक पद्धतीने काम केल्याने एकमेकांना मदत होण्यासह मजुरी खर्चात बचत व वेळेत काम करणे शक्य झाले आहे.

Paddy Farming
Summer Paddy Farming : वाडा तालुक्यात उन्हाळी भातशेतीकडे कल

तांदळाला बाजारपेठ

आमळीतील शेतकऱ्यांनी भाताचे एकरी २०, ३० पासून ३५ क्विंटलपर्यंत तर नागलीचे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. आमळीचा तांदूळ व नागली खानदेशात म्हणजे धुळे, जळगाव व नंदूरबार भागात प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी गावातच विक्री करतात.

पावसाळ्यात आमळी परिसरात आलालदरीचा भाग पाहण्यासह निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्याकडून तांदूळ, नागलीची खरेदी केली जाते. इथल्या भाताला नैसर्गिक सुवास व वेगळी चव आहे. त्यामुळे मागणी मोठी असते. आमळीतील अनेक शेतकरी तांदूळ आपल्या परिचितांनादेखील पाठवितात.

गावातील काही पुरुष व महिला बचत गट मुंबई, नाशिक, पुणे व नजीकच्या गुजरात राज्यात तांदूळ, नागली पाठवितात. गावरान तांदळास उन्हाळ्यात ८५ ते ९० रुपये प्रति किलो तर अन्य तांदळास ७५ ते ८५ रुपये दर मिळतो. गावरान तांदळाचे मागील तीन वर्षात सरासरी दर ८० रुपयांच्या आसपास राहिले.

तर नागलीला प्रति किलो कमाल १०० ते ११० रुपये दर मिळाला. एक, दोन, पाच किलोपासून १० व २५ किलो अशा आकर्षक पॅकिंगमधून विक्री केली जाते. तांदूळ व नागलीतून शेतकऱ्यांचा शेतीतील नफा सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढला आहे.

पावसाळी पर्यटन सुरू झाल्याने उत्पन्नात भर पडली आहे. ग्रामस्थांना शेती तसेच पूरक उद्योगात सुधारणा करणे, गुंतवणूक करणे, मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देणे शक्य झाले आहे. गावातील युवक प्रक्रियेचे प्रशिक्षण घेऊन पुढारले आहेत. गावातील शेतकरी भीमराव बोरसे यांनीही तांदूळ प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतीत मूल्यवर्धन साधले आहे.

लोणच्याच्या कैऱ्या प्रसिद्ध

आमळीचा परिसर वनसंपदेने नटलेला आहे. हलक्या, मुरमाड क्षेत्रात गावकऱ्यांनी काही वर्षांपासून जोपासलेले आंब्याचे शेकडो वृक्ष पाहण्यास मिळतात. अनेकांच्या शेतात आम्रवृक्ष आहेत. या देशी वाणाच्या आंब्यांना बाजारात चांगली मागणी आहे. यातील काही वाण कैऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

या कैऱ्या आकाराने लहान, आंबट, पातळ सालीच्या असून गर विशिष्ट चवीचा व खाण्यास कुरकुरीत असतो. आमळीच्या या कैऱ्या धुळे व नंदुरबारपर्यंत पोचतात. लोणच्याच्या माध्यमातून महिला, शेतकरी गटांनी त्यास बाजारपेठ मिळवून उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.

Paddy Farming
Paddy Farming : सुधारित तंत्राने वाढवले भाताचे उत्पादन

गोवंशीय पशुधन अधिक

आमळीत भूगर्भात पाणी कमी आहे. जलस्रोत मर्यादित असल्याने रब्बी हंगाम साध्य करताना अडचणी येतात. काही शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत. अन्य पिकांमध्ये हरभरा, वाटाणा, गहू, कांदा, भाजीपाला आदी पिके शेतकरी घेतात. अलीकडे कांदा शेती वाढली आहे. आमळीत पशुपालन कमाल शेतकरी करतात.

त्यात देशी गायींची संख्या अधिक आहे. दूध उत्पादन कमी आहे. मात्र सेंद्रिय शेती किंवा शेणखतासाठी या पशुधनाचे महत्त्व अधिक आहे. डोंगराळ भागातील अधिवास असल्याने जनावरे आजारांना बळी पडण्याची समस्या कमी आहे. ताकदवान व काटक म्हणूनही आमळीचे पशुधन प्रसिद्ध आहे.

आमळी- वैशिष्ट्ये, ठळक कामे

- कन्हैयालाल महाराज यांचे प्रसिद्ध मंदिर. दिवाळी काळात येथे यात्रेचे आयोजन. देवस्थानात विविध सुविधा तयार केल्या जात असून धर्मशाळा उभारली जात आहे.

- गावापासून दीड किलोमीटरवर अलालदरीचा धबधबा. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पर्यटकांची होते गर्दी.

- बांधबंदिस्ती, सीसीटी चर, वृक्षलागवड आदी कामे ग्रामस्थांनी हाती घेतली आहेत. सिमेंटचे तीन, मातीचे चार बंधारे तयार करण्यात आले.

- गावात कन्हैयालाल शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत. भात, नागलीवर आधारित प्रक्रिया उद्योगात व्यस्त. भाताची स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंगद्वारे विक्री. नागलीचे पापड, लाडू, बर्फी, कुकीज तयार केले जातात.

भीमराव बोरसे- ९९२२७२१७०७ (कन्हैयालाल शेतकरी उत्पादक कंपनी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com