Poultry Business : किरकोळ अंडी विक्रीतून वाढले नफ्याचे ‘मार्जिन’

Article by Vinod Ingole : मानेगाव (ता. सावनेर, जि. नागपूर) येथील प्रीतम लोणकर या युवकाने एमबीए केल्यानंतर सुरुवातीचा काही काळ खासगी पोल्ट्री व्यावसायिकाकडे नोकरी केली. त्यानंतर भावाला सोबत घेत पोल्ट्री व्यवसायाची उभारणी केली.
Pritam Lonkar and Poultry Business
Pritam Lonkar and Poultry BusinessAgrowon

विनोद इंगोले

Poultry Eggs Farming : नागपूर-सावनेर मार्गावर वसलेल्या मानेगावची लोकसंख्या अवघी १७००. येथील स्थानिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. मात्र पुरेशा सिंचन सुविधांच्या अभावामुळे कोरडवाहू पीकपद्धतीवर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. मानेगाव-पंधराखेडी या गटग्रामपंचायती मार्फत गावाचा कारभार चालतो.

मानेगाव शिवारात लोणकर कुटुंबीयांची चार एकर शेती आहे. त्यात कपाशी, तूर, सोयाबीन, टोमॅटो यांसारखी पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शिवाराच्या परिसरात प्रीतम लोणकर यांनी लहान भाऊ खुशाल यांच्या मदतीने लेअर पोल्ट्री व्यवसाय उभारला आहे. त्यासाठी ११ हजार पक्षिक्षमतेची दोन शेड उभारली आहेत. वातावरण बदलानुसार आहार, आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनात लक्ष केंद्रित करून व्यवसायात यश संपादन केले आहे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या विश्‍वासातून प्रीतम यांची व्यवसायातील वाटचाल सुरू आहे.

नैराश्‍यातूनही घेतली भरारी

२०१८ मध्ये प्रीतम लोणकर यांनी पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच वर्षी कोरोनामुळे सर्वदूर व्यवहार ठप्प झाले. परिणामी पहिल्याच वर्षी व्यावसायिक अडचणी झाल्या. त्यामुळे हा व्यवसाय पुढे सुरू ठेवावा की नको, अशा दुहेरी विवंचनेत ते होते. त्या काळात बाजारपेठा ठप्प झाल्याने सहा महिने पक्ष्यांची बॅच न घेण्याचा निर्णय घेतला.

पण एकदा ग्राहक तुटल्यास पुन्हा जोडण्यात अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन बाजारातून अंडी खरेदी करून या ग्राहकांना पुरवली. आज मागे वळून पाहताना त्यावेळी जोखमीचा वाटलेला हा निर्णय फायदेशीर ठरल्याचे प्रीतम सांगतात.

प्रशिक्षणातून मिळाला मार्ग

याच गावातील प्रेमचंद पाटील यांचा पोल्ट्री सोबतच डॉग फूड उत्पादन, विक्री व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीत प्रीतम यांनी सुरुवातीला डॉग फूड वितरणाच्या कामाची जबाबदारी काही काळ सांभाळली. हे काम करतानाच प्रीतम यांना पोल्ट्री व्यवसायाशी निगडित बारकावे जाणता आले. त्यानंतर या व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

तरीसुद्धा तांत्रिक बारकाव्यांची माहिती असावी, याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पाच दिवसाचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले. कुक्‍कुटशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कुक्‍कुट पक्ष्यांशी निगडित तंत्रशुद्ध व्यवस्थापनाचे धडे त्यांनी गिरविले. यातून त्यांना व्यवसायात परिपूर्णता गाठता आली आहे. आजही पोल्ट्री व्यवसायासाठी डॉ. मुकुंद कदम, प्रेमचंद पाटील यांचे मार्गदर्शन, सहकार्य मिळत असल्याचे प्रीतम सांगतात.

Pritam Lonkar and Poultry Business
Poultry Business : दुष्काळात ‘पोल्ट्री’तून उभारला आर्थिक स्रोत

व्यवसाय दृष्टिक्षेपात

पोल्ट्रीसाठी ३२ फूट बाय १५६ फूट आणि ३२ फूट बाय १२८ फूट आकारीच दोन शेड उभारली आहेत. एक शेड उभारणीसाठी सुमारे २७ लाख रुपयांचा खर्च झाला. दोन्ही शेडची एकूण पक्षिक्षमता सुमारे ११ हजार पक्षी इतकी आहे.

१५ आठवडे वयाच्या पक्ष्यांची अंडी उत्पादनासाठी खरेदी केली जाते. हे पक्षी १९ आठवड्यांचे झाल्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. अधिक कालावधीचे पक्षी फायदेशीर ठरते.

कमी वयाच्या पक्ष्यांची खरेदी केल्यास सुरुवातीला त्यांचे संगोपन, औषधोपचार यावर खर्च अधिक होतो. एक दिवसाचा पक्षी खरेदी केल्यास ४० ते ४५ रुपयांना मिळतो, तर १५ आठवड्यांच्या पक्ष्यांची किंमत २५० ते २५५ रुपयांवर राहते.

एका पक्ष्यापासून ७२ आठवड्यांच्या कालावधीत सुमारे २७० ते ३०० अंडी उत्पादन मिळते. त्यानंतर पक्षी चिकन व्यवसायाला पुरविले जातात. यातून थोडेफार उत्पन्न मिळते.

उन्हाळ्यात घेतो विशेष काळजी

शेडच्या वरील बाजूस सिमेंट पत्रे बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने त्यावर स्प्रिंकलर लावले जातात. त्या माध्यमातून तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला जातो. शेडच्या आतील बाजूस फॉगर आणि पंखे बसविण्यात आले आहेत. शेडमध्ये उष्ण वारे येण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही बाजूंस ज्यूटची पोती बांधली जातात. त्यावर देखील पाण्याचा शिडकावा केला जातो.

पक्ष्यांच्या पाण्यासाठी निप्पल बसविण्यात आले आहे. यामध्ये पाइपने पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत पाइपमधील पाणी गरम होते. त्यामुळे गरम पाणी पक्षी सहसा पिण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता राहते. त्यावर उपाय म्हणून निप्पलच्या जोडीला ओपन वॉटर चॅनेलची सोयदेखील करण्यात आली आहे. यामधील पाणी प्रवाहित राहत असल्याने त्याचे तापमान जास्त वाढत नाही. पक्ष्यांना गरज असेल त्या वेळी ते यातील पाणी पितात. शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी देखील पक्षी या वॉटर चॅनेलमधील पाणी वापरतात. त्याकरिता ते वारंवार त्यात चोच बुडवितात.

फीडमिलची उभारणी

ग्रॅंडर आणि मिक्‍सर अशा दोन फीडमिल २०२० मध्ये तयार करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च झाला. त्याकरिता स्वतंत्र बांधकाम करण्यात आले. या प्रकल्पाची क्षमता प्रति तास दोन टन इतकी आहे. मका चुरी, डीआरबी, सोया डीओसी व इतर घटकांचा यात वापर होतो. यात तयार पशुखाद्याचा वापर होत असल्याने खर्चातही बऱ्यापैकी बचत होते.

Pritam Lonkar and Poultry Business
Poultry Business : ‘पॅशन’ ठेवल्यानेच पोल्ट्री व्यवसायात यश

व्यवसायातील अर्थकारण

गावापासून सात किलोमीटर अंतरावर सावनेर हे तालुक्‍याचे ठिकाण. याच बाजारपेठेत किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा होतो. सध्या ४२० ते ४३० रुपये प्रति शेकडा (१०० नग) असा अंड्यांचा दर आहे. प्रति नग ३ रुपये ४० पैसे असा उत्पादन खर्च येतो. नागपूर मार्केटमधील होलसेल दरांत तुम्हाला अंड्याचा पुरवठा करतो, असे सांगत किरकोळ विक्रेत्यांच्या सुरुवातीला भेटीगाठी घेतल्या. त्याआधारे त्यांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर पुरवठ्याला सुरुवात झाली. आजच्या घडीला सावनेर बाजारात रोज १० ते १२ हजार अंड्याचा पुरवठा होतो.

यापेक्षा अधिक मागणी असल्यास बाजारातून अंडी खरेदी करूनही त्यांचा पुरवठा करण्यावर भर दिला जातो. अशाप्रकारचे मार्केटिंग तंत्र प्रीतम यांनी विकसित केले आहे. याशिवाय बेकरी, किराणा व्यवसायिकांना अंड्यांचा पुरवठा होतो. अंडी वितरणासाठी त्यांनी छोटे मालवाहू वाहन खरेदी केले आहे. पोल्ट्री व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी दोन मजूर कुटुंब आहेत. त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. एका कुटुंबावर सुमारे १४ हजार रुपये प्रति महिना मजुरी खर्च होतो. या व्यवसायात लहान भाऊ खुशाल यांचे सहकार्य मिळते. बाजारपेठेची जबाबदारी खुशालकडे तर पोल्ट्रीचे संपूर्ण व्यवस्थापन प्रीतम पाहतात. दोन्ही भाऊ मिळून व्यवसायातील विविध कामे करत असल्याने खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस मदत मिळाली आहे.

एका बॅचमधील पक्षी.....११ हजार

अंडी उत्पादन (प्रतिदिन)...सरासरी ९ हजार अंडी

एकूण मासिक खर्च.... साडेनऊ लाख रुपये

अंडी विक्री (प्रति नग)...सरासरी ४ रुपये.

मिळणारे मासिक उत्पन्न....सरासरी ११ लाख.

शिल्लक मासिक नफा....सरासरी १ लाख रुपये.

प्रीतम लोणकर, ९५६१६१२३५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com