Integrated Farming : प्रतिकूल परिस्थितीत एकात्मिक शेतीचे यशस्वी मॉडेल

Agriculture Management : पिकांची विविधता, पूरक व्यवसाय, यंत्रे व तंत्रे यांचा वापर, सेंद्रिय व्यवस्थापनावर भर, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व थेट विक्री अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली पावरा यांची शेती नक्कीच शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरण्याजोगीच आहे.
Agriculture Success Story
Agriculture Success Story Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नंदूरबार जिल्ह्यात भुजगाव (ता. धडगाव) हे गाव सातपुड्यातील दुर्गम क्षेत्रात वसले आहे. गावातील शेती मध्यम, हलकी आहे. येथील रमेश जिऱ्या पावरा आपली साडेतीन एकर शेती पत्नी सखीबाई, मुले हरसिंग, सुनील व अर्जुन यांच्या साथीने कसतात. पाणी तसे बारमाही उपलब्ध असते.

कूपनलिका आहे. एक बैलजोडी आहे. त्यांच्या शेतीत आव्हानेही भरपूर आहेत. दुर्गम भाग असल्याने निविष्ठा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चोख व्यवस्थापन करणे अडचणीचे व कष्टाचे असते. जमीन उताराची व मध्यम आहे. त्यास पाण्याची अधिक गरज असते. यामुळे पाणी व्यवस्थापनावर कटाक्ष ठेवावा लागतो.

शेतीत वैविध्यता

खरिपात सोयाबीन, त्यात तुरीचे आंतरपीक, मका, ज्वारी, मिरची आदी पिके असतात. चारा पिकांचे प्रमाण अधिक असते. कारण पशुधनाला बारमाही चारा उपलब्ध व्हावा हा विचार असतो. बांधावरही शेळ्यांसाठी चारा लागवड होते. चारा पिकांत नेपियर व दशरथ वाण आहेत. चारा बियाण्याचे उत्पादनही घेतले जाते. त्याची विक्रीही परिसरात होते. काही क्षेत्रात कोथिंबीर व अन्य भाजीपाला पिके असतात.

मिरची पीक होळी सणापर्यंत घेतली जाते. सोयाबीन, ज्वारीखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर कलिंगडसारखे पीक घेतले जाते. स्थानिक वाणाच्या अवीट गोडी असलेल्या पेरूची ६० झाडे आहेत. वांगे बारमाही असते. हिरवेगार, चमकदार, लांबलचक वांगे असलेला वाण धडगाव परिसरात प्रसिद्ध असून त्यास मागणीही मोठी आहे. कांदा बीजोत्पादन, बटाट्याची लागवडही असते.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : भाजीपाला, दुग्धोत्पादनात ओळख सावरगावतळची!

यंत्रे- तंत्राचा वापर

दुर्गम भागातही यंत्रे- तंत्राचा वापर करण्यावर रमेश यांनी भर दिला आहे. त्यातून मजुरी, वेळ व पैसा या गोष्टींमध्ये बचत करण्याचा प्रयत्न केला आहे. उंच गादीवाफा तंत्रज्ञानाने ते मिरची लागवड करतात. मिरचीसह कलिंगडासाठी प्लॅस्टिक मल्चिंग करतात पीक अवशेषांपासून गांडूळ खत निर्मिती केली जाते. धडगाव परिसरात विजेची अडचण असते. त्यामुळे कूपनलिकेसाठी सौर कृषिपंपाचा वापर केला जातो.

एक जुनी विहीर असून, त्यालाही विद्युतचलित पंपाची सोय केली आहे. पेरणी उताराला आडवी केली जाते. मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानाचा वापर होतोच. शिवाय ठिबक सिंचन, रेन पाइप पद्धतीने सिंचन केले जाते. कोळदा- नंदूरबार कृषी विज्ञान केंद्रांतर्गत निक्रा प्रकल्पातही रमेश यांचा सहभागी आहे. त्यातून हवामान अनुकूल वाणांची लागवड त्यांनी केली आहे.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : शेतीसारखे समाधान कुठेच अनुभवले नाही...

प्रतिकूलतेत उत्पादन व थेट विक्री

उत्पादनाबाबत व तेही एकरी प्रमाणात सांगायचे झाल्यास सोयाबीन आठ क्विंटलपर्यंत, तुरीचे सहा क्विंटल, मिरचीचे १० टन, कलिंगडाचे १५ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते. अनेकदा या भागात पाऊस दसरा-दिवाळीपर्यंत असतो. अशावेळी पीक उत्पादकता, गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम पावरा कुटुंबीय जिद्दीने करते. आपल्या शेतीमालाची विक्री थेट करण्यावर पावरा कुटुंबाचा भर असतो.

त्यासाठी धडगावच्या बाजारात ५०० रुपये प्रति महिना दराने जागा घेतली आहे. विक्रीत सखीबाईंचा सहभाग महत्त्वाचा असतो. दररोज ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळत असल्याने मागणीही चांगली असते. थेट विक्रीतून नफ्याचे प्रमाणही वाढते. पिके, पूरक व्यवसाय शिवाय चारा पिके अशा विविध स्रोतांमधून वर्षभरात नियमित, ताजे व उल्लेखनीय उत्पादन घेऊन कुटुंबाची आर्थिक बाजू स्थिर व सक्षम झाली आहे. कोणत्या स्रोतांमधून किती उत्पन्न हाती येते याची नेमकी माहिती असावी यासाठी स्वतंत्र डब्यांची सुविधा तयार केली आहे.

पूरक व्यवसायांना चालना

रमेश यांच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून कुक्कुटपालन केले जाते. याशिवाय शेतीला अर्थच नाही असे ते म्हणतात. कारण त्यातून वर्षभर आर्थिक उत्पन्न उपलब्ध होत राहते. शिवाय पक्ष्यांना मागणीही सतत असते. जोडीला त्यांनी २५ स्थानिक शेळ्यांचेही संगोपन केले आहे.

अलीकडे कबुतरे पालनही सुरू केले असून, ३५ पर्यंत त्यांची संख्या आहे. सिमेंट पत्र्याचे मजबूत शेड उभारले आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी सुरक्षात्मक उपाय केले आहेत. सर्व पूरक व्यवसायांच्या व्यवस्थापनात कुटुंब कायम व्यस्त असते. जेवढा वेळ शेतीला तेवढाच वेळ जोड व्यवसायांना दिला जातो. अंड्यांची तसेच शेळ्यांचाही नजीकच्या बाजारात थेट विक्री केली जाते.

पावरा यांच्या शेतीची अन्य वैशिष्ट्ये

एकात्मिक शेती पद्धतीच्या सर्व घटकांचा समावेश.

‘बायोगॅस’च्या वापरातून सिलिंडर इंधनात बचत.

विविध संस्थांतर्फे कृषी माऊली, प्रयोगशील शेतकरी आदी पुरस्कारांनी सन्मान.

रासायनिक खतांचा अल्प तर शेणखत, जिवामृत यांचा अधिक वापर. त्यातून खर्चात मोठी बचत.

नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) प्रमुख राजेंद्र दहातोंडे, विषय विशेषज्ज्ञ जयंत उत्तरवार, पद्माकर कुंदे, उमेश पाटील, आरती देशमुख, निक्रा प्रकल्पाचे संशोधन सहायक अरुण कदम यांचे सातत्याने मार्गदर्शन.

कृषी यंत्रणा व अन्य संस्थांच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभाग.

रमेश पावरा ९४२०३८१०८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com