Glasshouse Technology : वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील अत्याधुनिक काचगृह

Agriculture Technology : वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील अत्याधुनिक काचगृहात तंत्रज्ञान वापरून आर्द्रता, तापमान, प्रकाश आणि कार्बन डायऑक्साइडचे अचूक नियंत्रण करण्यात आले आहे. यामुळे पिकांच्या वाढीसाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण होते.
Glasshouse
GlasshouseAgrowon
Published on
Updated on

रितेश बाबर, डॉ. विनायक पाटील

Western Sydney University : हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर आणि वाढत्या शहरीकरणामुळे ताजा भाजीपाला आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी हरितगृह हा एक उत्तम पर्याय आहे. भविष्यात ऊर्जा आणि पाण्याचा मर्यादित पुरवठा होणार असल्याने अन्नसुरक्षेच्या दृष्टीने भरीव उपायांची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे.

आपल्याकडे हरितगृहांचा वापर वाढला असला तरी अजूनही पूर्ण वातावरण नियंत्रित करून गरजेची पिके हव्या त्या वेळेस आणि हव्या त्या प्रमाणात घेण्याची क्षमता विकसित झालेली नाही. मात्र अशा प्रकारचे काही हरितगृह संशोधन प्रकल्प विकसित देशांत दिसून येतात, त्यापैकीच एक म्हणजे वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील अत्याधुनिक काचगृह संशोधन प्रकल्प.

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराचा पश्‍चिमेकडे झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन उपनगरे उभी राहत आहेत. वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या हॉक्सबरी कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाची हरितगृह सुविधा विद्यापीठ आणि हॉर्टिकल्चर इनोव्हेशन ऑस्ट्रेलिया यांच्या सहभागातून उभी करण्यात आली आहे. नेदरलँडमधील वॅगेनिंगेन विद्यापीठाच्या सहकार्याने या आधुनिक काचगृहाची रचना करण्यात आली होती. अठरा गुंठे क्षेत्रावर पसरलेल्या या काचगृहाच्या उभारणीसाठी आठ वर्षांपूर्वी सुमारे चार कोटी रुपये खर्च आला होता.

उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करून मोठ्या प्रमाणावर ताजा भाजीपाला लवकरात लवकर बाजारात पोहोचविणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही नवीन सुविधा ऑस्ट्रेलियन उत्पादकांना काचगृहामध्ये पीक उत्पादनातील नवीन संशोधन आणि पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहित करते. या सुविधेमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील मोठे उद्योग समूह आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहयोगाने हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थांना शिक्षण, प्रकल्प उभारणी आणि संशोधनाचा चांगला अनुभव मिळत आहे.

Glasshouse
Modern Agriculture Technology : भाजीपाला पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

...असे आहे तंत्रज्ञान

वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील अत्याधुनिक काचगृहात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आर्द्रता, तापमान, प्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड यांचे खूपच अचूक नियंत्रण केलेले आहे. यामुळे पिकांच्या वाढीसाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण होते. यामध्ये संशोधक विविध प्रकारच्या पिकांवर आणि पिकांच्या विविध अवस्थांवर संशोधन करून विविध परिस्थितीमध्ये पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम जाणून घेतात.

उच्च उत्पादकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ऊर्जा आणि पाण्याचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उष्णतेचा पुनर्वापर, एलईडी प्रकाश व्यवस्था आणि इतर सुधारित तंत्रज्ञानामुळे ऊर्जा वापर कमी होतो. उत्पादनाची कार्यक्षमता वाढते. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून पाणी आणि खतांचे व्यवस्थापन केले जाते.

Glasshouse
Dubai Success Story : वाळवंटातील संपन्न आनंदवन : दुबई

ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारची आणि या प्रमाणातील ही पहिलीच सुविधा आहे, यामुळे संशोधकांना संरक्षित वातावरणात पिकांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या संशोधनाचे परिणाम म्हणजे पिकांच्या उत्पादनात वाढ आणि उत्पादक, पर्यावरणासाठी कमी खर्च हा आहे.

या काचगृहामध्ये वनस्पतींची वाढ जलद आणि चांगली होते. वनस्पतींना जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश मिळतो आणि त्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रिया वाढून पिकांची वाढ जलद होते, गुणवत्तादेखील सुधारते. काचगृहात तापमान नियंत्रित करण्यासाठी उच्च दर्जाच्या तापमान नियंत्रण प्रणाली उपलब्ध आहे, त्यामुळे हंगामी तसेच अवकाळी बदलांमुळे होणारे नुकसान वाचते. नियंत्रित आर्द्रता पातळीमुळे रोगांचा धोका कमी होतो, पिके निरोगी राहतात, उत्पादनाची गुणवत्ता वाढते. वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे किडींच्या प्रादुर्भावावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते. उत्पादन विश्‍लेषणानुसार काचगृहामध्ये पारंपरिक शेतीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते. नियंत्रित वातावरणामुळे उत्पादनाचा काळ कमी होतो, उत्पादनात वाढ मिळते.

या काचगृहामध्ये अत्याधुनिक जल व्यवस्थापन प्रणाली आहे. ज्यामुळे पाणी वापर कमी होतो. नियंत्रित पाण्याच्या वापरामुळे पिकांना आवश्यकतेनुसार पाणी मिळते आणि पाण्याची बचत होते. पर्यावरणीय ताण कमी होतो. ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर, नियंत्रित रासायनिक निविष्ठांचा वापर आणि उच्च उत्पादनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

हे काचगृह नवीन तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. संशोधक येथे विविध तंत्रज्ञानाच्या प्रयोगातून पिकांच्या उत्पादनातील वाढ आणि कार्यक्षमतेवर परिणाम जाणून घेऊ शकतात. संशोधनाच्या बरोबरीने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे उत्तम साधन आहे. शेतकरी आणि विद्यार्थी इथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकतात.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे काचगृह ऑस्ट्रेलियामध्ये एक अग्रगण्य संशोधन आणि शिक्षण सुविधा केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारचे संशोधन आणि शिक्षण प्रकल्प राबविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नुकताच वेस्टर्न सिडनी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे.

डॉ. विनायक पाटील ७४९९४३६२५७

(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com