Contract Farming : करार शेतीद्वारे राबविला व्यावसायिक शेतीचा ‘पॅटर्न’

Success Story : नियोजन नेटके असेल व स्वतः राबण्याची तयारी असेल, तर शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळविता येते. हा विश्‍वास रुजविला आहे वर्धा जिल्ह्यातील दहेगाव (गोसावी) येथील रवींद्र अंभोरे यांनी.
Contract Farming
Contract FarmingAgrowon
Published on
Updated on

Wardha News : वर्धा जिल्हा मुख्यत्वे अधिक पावसाचा प्रदेश व भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील दहेगाव (गोसावी) या गावी सुधाकर अंभोरे यांची वडिलोपार्जित नऊ एकर शेती आहे. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय आहे.

पाण्याची उपलब्धता मुबलक असल्याने गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेत जे विकले जाईल तेच पिकविण्यावर भर दिला आहे. त्याकरिता बाजारपेठेचा केलेला अभ्यास त्यांना उपयोगी ठरला आहे. सध्या त्यांचा मुलगा रवींद्र शेतीची सारी जबाबदारी पाहतो. त्यांना पत्नी मिनाक्षी यांची मोलाची साथ मिळते.

करार शेती व पीक पद्धती

केवळ नऊ एकरांतून आर्थिक बाजू भक्कम होणे शक्य न वाटल्याने रवींद्र यांनी करार शेती करायचे ठरवले. आज त्यांनी परिसरातील तीन शेतकऱ्यांकडील ४० एकर शेती कराराने करण्यासाठी घेतली आहे.

यामध्ये १४ हजार रुपये प्रति एकर असा दर निश्‍चित केला आहे. पाण्याची सोय पाहून पीकपद्धतीची निवड केली आहे. त्यानुसार स्वतःच्या नऊ एकरांत भाजीपाला व कलिंगड तर करारावरील शेतीत मुख्य हंगामी पिके घेतली जातात.

Contract Farming
करार शेती करून काही गुन्हा केला का?

पिकांचे नियोजन

दरवर्षी सुमारे २५ ते ३० एकरांवर कपाशी, २० एकर सोयाबीन, अलीकडील तीन वर्षांत काही क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन, २० एकरांवर हरभरा व सुमारे सहा ते सात एकरांत भुईमूग असे नियोजन केले जाते. कपाशी एकरी ८ ते ९ क्‍विंटल, सोयाबीन १० क्‍विंटल, भुईमूग ९ ते ११ क्विंटल असे उत्पादन दरवर्षी मिळते.

इंदूर येथून त्यांनी सोयाबीनचे एक वाण आणून त्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागात त्याची लागवड अधिक असल्याचे अंभोरे सांगतात. त्याच भागातील शेतकऱ्यांकडून त्यांनी हे वाण घेतले आहे.

या वाणाचा परिपक्‍व होण्याचा कालावधी सुमारे ८५ दिवसांचा आहे. अधिक पाऊस झाल्यास त्याची शेंग तडकत नसल्याचे अंभोरे यांचे निरीक्षण आहे. यंदा नऊ एकरांत उन्हाळी भुईमूग घेतला असून, जानेवारीत त्याची लागवड केली आहे.

कलिंगड व भाजीपाला

हंगामी पिके थोड्या अधिक कालावधीची असतात. मात्र शेतीतून कमी कालावधीत चांगले व ताजे उत्पन्न मिळावे असा अंभोरे यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच दरवर्षी सुमारे अडीच एकरांत पॉलिमल्चिंगवर कलिंगड घेतले जाते. त्याचे एकरी २० टनांपुढे उत्पादन मिळते. किलोला नऊ रुपयांपासून ते दहा ते ११ रुपये प्रति किलो दर मिळतो.

नागपूर, हिंगणघाट बाजारपेठेत विक्रीवर भर राहतो. दोन वर्षे कोरोना टाळेबंदीचा फटका त्यांना बसला. कृषी विभागाच्या सहकार्याने त्यांना शेतमाल मालवाहतुकीची परवानगी मिळाली. त्याआधारे नागपूर शहरातील अनेक भागात सात ते आठ रुपये प्रति किलो दराने त्यांनी कलिंगडाची विक्री केली. बहुपीक पद्धती शेतीतील जोखीम कमी करते.

त्याच उद्देशाने सुमारे १० ते १५ गुंठे क्षेत्रावर पालक, ढेमसे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर यांसारखी भाजीपाला पिके घेतली जातात. उन्हाळ्यात भाज्यांचे दर तेजीत राहतात याची कल्पना असल्याने त्यात सातत्य राखले आहे.

रेशीम शेतीचा प्रयत्न

प्रयत्नवाद हा अंभोरे यांचा महत्त्वाचा गुण म्हणायला हवा. करार शेती सांभाळताना त्यांनी पूरक म्हणून रेशीम व्यवसायावरही भर दिला होता. त्यासाठी ६० बाय २४ फूट आकाराचे शेड उभारले.

रेशीम संचलनालयाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून अनुदानही मिळाले. उत्पादन, दर असे गणितही बसले होते. मात्र कोरोना काळात खरेदीदार न मिळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

त्यामुळे सात वर्षे धडपडीतून चालवलेला हा व्यवसाय थांबवला. तो पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे.

जनावरांचे संगोपन

रेशीम व्यवसायाला खीळ बसली तरी अंभोरे डगमगलेले नाहीत. त्यांनी दुग्ध व्यवसायातून पुन्हा एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. त्यांच्याकडे आज जर्सी आणि एचएफ संकरित मिळून सुमारे सात गायी आहेत.

दररोज ५० ते ६० लिटर दूधसंकलन होते. गावातच मदर डेअरी आणि अन्य खासगी कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे. फॅटनुसार दुधाला प्रति लिटर सरासरी ३४ ते ३७ रुपये दर मिळतो.

चाऱ्यासाठी एक एकरवर नेपियर गवत तसेच मका, मालदांडी ज्वारी लागवड केली आहे. वडिलांसह कृषी पर्यवेक्षक रवींद्र राऊत, कृषी सहाय्यक हनुमंत भालके, आबासाहेब रूपनर यांचे त्यांना सहकार्य मिळते.

Contract Farming
Success Story : शिरुर तालुक्यातील नंदा भुजबळ यांनी पौष्टिक डाळींचा तयार केला ब्रॅण्ड

मेहनतीचे फळ मिळतेच

सर्व क्षेत्राचे नियोजन रवींद्र अत्यंत कुशलपणे व एकट्याने समर्थपणे करतात. दोन ट्रॅक्टर्स व दोन कायम स्वरूपी मजूर आहेत. गरज भासेल त्यानुसार बाहेरून त्यांची मदत घेतली जाते.

स्वतः राबल्यास व सातत्यपूर्ण नियोजनबद्ध काम केल्यास शेतीत यश मिळतेच असे ते म्हणतात. शेतीच्या जोरावर तीन एकर शेती विकत घेणे त्यांना शक्य झाले आहे.

संपर्क - रवींद्र अंभोरे, ९९२२१९७८५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com