करार शेती करून काही गुन्हा केला का?

साहेब, शासन करार शेतीला प्रोत्साहन देत असताना आम्हाला मात्र करार शेती केली म्हणून मदत मिळाली नाही.
nagpur
nagpur

नागपूर : साहेब, शासन करार शेतीला प्रोत्साहन देत असताना आम्हाला मात्र करार शेती केली म्हणून मदत मिळाली नाही. हा आमचा गुन्हा आहे का, असा प्रश्‍न सोनेगाव राजा येथील राहुल त्र्यंबक महल्ले यांनी केंद्रीय पथकाला विचारत निरुत्तर केले.  खरीप हंगामातील पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.२४) नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव राजा तसेच सिंगारदीप या गावांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल महल्ले यांनी भोसले नामक शेतकऱ्याची शेती करारावर केली आहे. या शेतीमध्ये त्यांनी कपाशीचे पीक घेतले होते. परंतु पुरामुळे सर्व पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर त्यांनी आता टोमॅटोची लागवड केली आहे. केंद्रीय पथकासमोर आक्रमकपणे आपली बाजू मांडत करारधारक शेतकऱ्याला मदत दिली जात नाही, यावर तीव्र रोष व्यक्त केला. त्यांचे राहते घर देखील पुरामुळे उद्‍ध्वस्त झाले. त्यापोटी अवघी सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. गावातील इतरांना मदत देताना आणि आमच्या कुटुंबाला मदत देताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. गावातील शेतकऱ्यांनी या वेळी आक्रमकपणे कमी मदत मिळाल्याचा आणि मदत यादीत ओळखीच्या व्यक्तींचा समावेश, तसेच खऱ्या लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप केला.  सोनेगाव राजा या गावाचे पुनर्वसन गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. गावाचे पुनर्वसन झाले असते तर या वेळी पुराचा फटका गावाला बसला नसता. त्यामुळे केंद्र सरकारपर्यंत आमचे हाल पोहोचवा आणि लवकरात लवकर गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी गावातील महिलांनी केंद्रीय पथकासमोर केली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मध्यस्थी करत गावातील महिलांची समजूत काढली. पुनर्वसनाबाबत लवकरच शासनाला प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी या वेळी ग्रामस्थांना दिले.  त्यानंतर केंद्रीय पथकाने सिंगारदीप या गावाला भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी देखील चर्चा करून त्यांना मिळालेल्या भरपाईबाबत आढावा घेण्यात आला. राज्य सरकारकडून मिळालेली भरपाई यावर ते समाधानी आहेत का, असाही प्रश्‍न केंद्रीय पथकाने ग्रामस्थांना विचारला. त्यावर काही शेतकऱ्यांनी शेतीत पुरामुळे वाळूचा थर साचला. परिणामी, गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाल्याची माहिती दिली. या पिकासाठी देखील भरपाई पाहिजे, अशी मागणी केली.  केंद्रीय पथकाचे सदस्य आर. पी. सिंग, महेंद्र सहारे यांनी रस्त्याने जाताना अनेक ठिकाणी थांबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. धान पिकाची गेल्या काही वर्षांतील उत्पादकता आणि पूर तसेच अतिवृष्टीच्या काळात मिळालेली उत्पादकता याबाबत त्यांनी जाणून घेतले. या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर विभागीय कृषीसह संचालक रवींद्र भोसले, कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्यासह महावितरणची अधिकारी सहभागी झाले होते. आर. पी. सिंग यांनी कृषी विभागाकडून पर्जन्यमान आणि उत्पादकता याबाबत माहिती घेतली.

प्रशासनाने ठेवला पोलिस बंदोबस्त केंद्रीय पथकासमोर दुष्काळ पाहणी करता येणार असल्याने अनुदानापासून वंचित असलेले शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता राहते त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने पथक जाणार असलेल्या गावात पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. -

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com