Jackfruit Processing : नव्या पिढीने जोपासला फणस प्रक्रिया उद्योगाचा वारसा

Processing Industry : सातत्य, संघर्ष, काळानुरूप उद्योगात बदल यातून आपली उत्पादने परराज्यांपर्यंत लोकप्रिय करून साठ लाखांपर्यंत उलाढालीची मजल गाठली आहे. सध्या श्रद्धाच्या रूपाने कुटुंबाच्या नव्या पिढीने उद्योगाचा हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे.
Jackfruit Processing
Jackfruit Processing Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे (ता. सावंतवाडी) येथील नारायण गावडे यांनी आज यशस्वी अन्नप्रक्रिया उद्योजक म्हणून आपली ओळख तयार केली आहे. अर्थात, त्यासाठी सुमारे २२ वर्षांची तपश्‍चर्या त्यांना करावी लागली आहे. जिल्ह्यातील झोळंबे (ता. दोडामार्ग) हे गावडे यांचे मूळ गाव आहे.

काही वर्षांपूर्वी बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे येथे त्यांचे कुटुंब स्थायिक झाले. प्रतिकूल परिस्थितीत बीकॉमपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीसाठी भटकंती केली. परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे नारळ, केळी, सुपारी आदींच्या माध्यमांतून घरच्या शेतीची नाळ कायम ठेवली होती.

प्रकिया उद्योगात पदार्पण

कोकणातील विविध शेतीमालावर आधारित प्रकिया उत्पादनांना सातत्याने मागणी असल्याचे गावडे जाणून होते. त्या दृष्टीने काजू प्रकिया उद्योगात उतरण्याचे त्यांनी ठरवले. माणगाव (ता. कुडाळ) येथील डॉ. हेडगेवार प्रकल्प संस्थेत प्रशिक्षण घेऊन छोटेखानी काजू प्रकिया युनिट सुरू केले. परंतु या उद्योगाला असलेल्या मोठ्या भांडवलाची गरज पूर्ण करणे शक्य होईना. अखेर हा व्यवसाय थांबवला. दोडामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीची फणस आणि रायवळ आंबा लागवड आहे.

दोन्ही फळांवर त्या भागात फारशी प्रकिया होत नव्हती. काही वेळा अधिक शेतीमाल वायाही जायचा. त्यातच गावडे यांना मोठी संधी दिसली. त्यांनी त्यावर आधारित प्रकिया उद्योग सुरू करण्याचे निश्‍चित केले. डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा प्रशिक्षण घेतले. राहत्या घरानजीकच्या गोठ्याची साफसफाई व सुधारणा करून प्रक्रियेसाठी योग्य जागा तयार केली. तेथे घरगुती पद्धतीने रुचकर फणसपोळी तयार होऊ लागली.

Jackfruit Processing
Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

विक्रीचे प्रयत्न

विक्री हे मोठे आव्हान होते. वाहतुकीसाठी जवळ वाहन नव्हते. अशावेळी एसटी बसने फणसपोळी घेऊन गावडे गोवा मार्केटला जायचे. परंतु ओळख वा संपर्क नसल्याने व्यापारी, ग्राहक माल घेण्यास उत्सुक नसायचे. परंतु गावडे यांनी जिद्द सोडली नाही. दररोज एसटीने जाऊन, गोव्यातील संपूर्ण बाजारपेठेत आपले पदार्थ घेऊन फिरायचे असा नित्यक्रम सुरूच ठेवला. हळूहळू एकेक व्यापारी माल घेऊ लागले. फणसपोळीचा दर्जा उत्तम असल्याने मागणी वाढू लागली.

व्याप्ती वाढविली

हळूहळू व्यवसायाची व्याप्ती वाढू लागली. मग डेगवे येथे तीन गुंठे जमीन खरेदी करून युनिट उभारून उद्योग तेथे स्थलांतरित केला. सन २००८ मध्ये तीन हजार चौरस फूट इमारतीचे बांधकाम स्वगुंतवणुकीतून केले. गावागावांत जाऊन गावडे फणस खरेदी करायचे. त्यातून शेतकऱ्यांचाही फायदा होऊ लागला.

बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन आंबा, आवळा, कोकम आदी कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेत त्यापासून उत्पादनांची श्रेणी वाढवली. सन २०२० च्या दरम्यान दोन ड्रायर्स, खवा यंत्र, आवळा क्रश यंत्र, कोकम फोडणी यंत्र आदी सामग्री सुविधा तयार केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँकेचेही त्यासाठी सहकार्य झाले. संपूर्ण कुटुंबाचीही मोठी साथ मिळाली. अशा रीतीने अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांमधून उद्योग नावारूपाला आणण्यास यश आले.

Jackfruit Processing
Agriculture Processing : डाळिंब दाणे, ज्यूस अन् जोडीला शहाळ्याची मलई

आजचा विस्तारलेला उद्योग

  • सध्या फणसपोळी, फणस वेफर्स, आंबा पोळी, अमृत व गोड कोकम, कोकम आगळ, आवळा सरबत, लेमन जिंजर आदी सुमारे आठ-नऊ उत्पादनांची निर्मिती.

  • वर्षभरात सुमारे ४० टन फणस, ३० टन आंबा, १५ टन कोकम, पाच टन आवळा याप्रमाणे प्रकिया.

  • बहुतांश कच्चा माल शेतकऱ्यांकडूनच घेतला जातो.

  • ‘एसके सन्स आणि कृष्णाई या दोन ब्रॅण्डने उत्पादनांची विक्री.

  • कोकणातील झांट्ये समूहाचे विपणनासाठी सहकार्य. त्यांच्याकडून होते उत्पादनांची खरेदी.

  • गोवा, सिंधुदुर्ग, गुहागर, रत्नागिरी, कोल्हापुर, पुणे, मुंबई या ठिकाणी होते उत्पादनांची विक्री.

  • ऑनलाइन पद्धतीने दिल्ली, गुजरात, राजस्थान, बंगळूर आदी ठिकाणीही उत्पादने पोहोचली आहेत.

  • सुरुवातीला काही हजार रुपयांमध्ये वार्षिक उलाढाल होती. मागील तीन वर्षांची उलाढाल सांगायची तर २०२१-२२ मध्ये ३१ लाख, २०२२-२३ मध्ये ४५ लाख तर २०२३-२४ मध्ये ती ६२ लाखांपर्यंत पोहोचली.

  • सावंतवाडी येथे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारानेही गावडे यांच्या उद्योजकतेचा झाला सन्मान.

  • कोकणातील फणस, आंबा व अन्य जैवविविधता टिकून राहावी यादृष्टीने गावडे दरवर्षी त्यांची ५०० ते एक हजारांपर्यंत रोपे इच्छुकांना मोफत देतात. त्यात शाळा व शेतकऱ्यांचा समावेश. अनेक वर्षांपासून या उपक्रमात सातत्य.

नव्या पिढीकडे जबाबदारी

नारायण गावडे यांना सुरुवातीपासून वडील शिवराम, आई कशीबाई यांचे मार्गदर्शन लाभले.पत्नी गायत्री व वहिनी सुषमा यांनी भक्कम साथ दिली. नोकरीत असलेले बंधू सीताराम यांचेही पाठबळ राहिले. एमबीए झालेला पुतण्या शिवम मोठी मदत करतो. आज उद्योगाची मुख्य जबाबदारी कृषी पदवीधर झालेली नारायण यांची मुलगी सिद्धी सांभाळते आहे. प्रकिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञान तिने आत्मसात केले आहे.

पॅकेजिंग, ग्रेडिंग, आकर्षक लेबल यासह उत्पादनाच्या दर्जात अधिकाधिक सुधारणा करण्याचा तिचा प्रयत्न राहिला आहे. कोकणातील आंबा, कोकम, जांभूळ, आवळा आदींचे रस बाटलीबंद करून विक्री करता येतात. सिद्धीने आपले कौशल्य पणाला लावून फणसाचा रसही बाटलीबंद करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. अद्याप विक्रीयोग्य उत्पादन तयार होण्यास कालावधी लागणार आहे.

नारायण गावडे, ९४२१०३७३२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com