सांगली जिल्ह्यातील पलूस हा बागायती व सधन मानला जातो. द्राक्ष उत्पादनासोबतच (Grape Production) ऊस पिकासह भाजीपाला पिकांचे उत्पादन (Vegetable Production) घेण्यात तालुक्यातील शेतकरी आघाडीवर असतात. पलूस गावातील आनंदराव तुकाराम सिसाळ यांची २५ एकर शेती आहे.
द्राक्ष हे मुख्य नगदी फळपीक असून सुपर सोनाका, शरद, ज्योती, कृष्णा आदी वाणांची लागवड केली आहे. आनंदराव, मधले बंधू गोविंदराव, लहान बंधू संदीप, आनंदराव यांचा मुलगा संग्राम, त्याच्या आजी श्रीमती यशोदा सिसाळ, श्रीमती वैजयंता सिसाळ यांच्यासह सतरा सदस्यांचा परिवार आहे. मनमोकळ्या पद्धतीने वावर असलेले, स्वभावाने साध्या पद्धतीचे असे हे एकत्रित पद्धतीचे कुटुंब आहे.
शेळी-मेंढीपालन व्यवसाय
शेळी-मेंढीपालन हा सिसाळ कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी ते मेंढ्यांची परिसरासह अन्य ठिकाणी भटकंती करायचे. हळूहळू बागायती क्षेत्र वाढले. मग मेंढ्यांना बाहेर घेऊन जाणे काही प्रमाणात कमी झाले. त्यानंतर शेळीपालनाचा विचार सुरू केला. आनंदरावांना एवढ्या वर्षांच्या अनुभवातून व्यवसायातील बारकावे, व्यवस्थापनातील बाबी आणि विक्री नियोजनाची पुरेशी माहिती होतीच. या पारंपरिक व्यवसायाला मोठे व व्यावसायिक स्वरूप देण्याचे त्यांनी ठरविले.
सन १९९८ मध्ये उस्मानाबादी जातीच्या १० शेळ्या व एक बोकड आणला. हळूहळू व्यवसायावर पकड निर्माण होत गेली. स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणी शेळ्यांची विक्री होऊ लागली. परंतु शेळ्यांचे अपेक्षित न मिळणारे वजन तसेच अन्य कारणांमुळे या जातीच्या शेळ्या कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाजारपेठेत अन्य कोणत्या जातींच्या शेळ्यांना अधिक मागणी आणि दर चांगले आहेत याची चाचपणी केली.
‘आफ्रिकन बोअर’चा फार्म
सन २००३-०४ मध्ये आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे संगोपन सुरू केले. फलटण येथून १० शेळ्या आणि एक बोकड यांची खरेदी केली. या जातीच्या शेळ्या कमी कालावधीत जास्त वाढ देतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली असते. यासोबतच व्यवस्थापनातही सुधारणा केल्याने व्यवसायास गती मिळाली.
पुढे शेळ्यांची संख्या वाढली. मग सन २००५ मध्ये अर्धबंदिस्त पद्धतीच्या शेडची उभारणी केली. सुमारे २७० फूट लांब, तर ७० फूट रुंद आकाराचे हे शेड आहे. त्यामध्ये शेळ्यांसाठी वयोमानानुसार वेगवेगळे कप्पे तयार केले आहेत. बोकडांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. ‘सिसाळ गोटफार्म’ असे नामकरण केले आहे. लहान मोठ्या मिळून सुमारे दीडशेपर्यंत शेळ्यांची संख्या वाढवण्यात आली. शेडमध्येच शेळ्यांसाठी दोन हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे.
शेळ्यांचे व्यवस्थापन
गाभण काळात शेळ्यांची योग्य काळजी घेतल्याने अपेक्षित वजनाची पिले मिळतात. नवजात पिलांकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. आवश्यकतेनुसार सोनोग्राफी केली जाते. सुमारे अडीच एकर क्षेत्रावर मका, हत्तीघास, कडवळ, शेवरी तसेच सुबाभूळ या चारापिकांची लागवड केली आहे.
शेळ्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी चारा दिला जातो. हिरवा आणि सुका चारा संतुलित व सातत्याने उपलब्ध व्हावा असे नियोजन केले जाते. वयोमानानुसार प्रति शेळीला साधारण २५० ग्रॅम मका, २५० ग्रॅम सरकी पेंड आणि खनिज मिश्रण खाद्य म्हणून दिले जाते. यामुळे वजनात अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. सर्व शेळ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. पावसाळ्यापूर्वी लसीकरण केले जाते. प्रत्येक शेळीची नोंद ठेवली जाते. दर तीन महिन्यांनी जंतुनाशक औषध दिले जाते.
विक्रीचे नियोजन
पारंपरिक व्यवसाय असल्याने शेळ्या-मेंढ्यांची विक्री करण्याची जाण तसेच कोणत्या बाजारात किती दर मिळतो याचा अभ्यास होताच. त्यामुळे विक्रीचा प्रश्न फार अवघड गेला नाही. स्थानिक ग्राहकांसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक आदी राज्यांपर्यंत आपली बाजारपेठ वाढवण्यात सिसाळ यशस्वी झाले आहेत. ग्राहक थेट शेडवर येऊन शेळ्यांची खरेदी करतात.
परराज्यांतील बाजारपेठ विस्तारण्यासाठी ‘सोशल मीडिया’ची मदत घेतली जाते. बकरी ईद सारख्या सणाच्या काळात बोकडांना विशेष मागणी असते. त्या वेळी दरही चांगला मिळतो. साधारण ३ ते ४ महिने वयाच्या प्रति पिलाला २५ ते ३० हजार रुपये दर मिळतो. बोकडाची १२०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. वर्षभरात एका बोकडाचे साधारणपणे १०० किलो, तर शेळीचे ७० ते ८० किलोपर्यंत वजन भरते. वर्षाकाठी सुमारे ४०० शेळ्यांची, तर ८० बोकडांची विक्री होते. गेल्या आठवड्यात चिपळूण येथे ४० शेळ्या व १२ बोकडांची विक्री केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.