Silk Farming : रेशीम शेतीतून मिळवला आर्थिक स्रोत अन् बाजारपेठही

Silk Market : पेठ (जि. सांगली) येथील अल्पभूधारक कैलास माळी यांची दोन एकर शेती आहे. मात्र केवळ शेतीवर अवलंबून न राहाता त्यांनी रेशीम शेतीतून उत्पन्नाचा अतिरिक्त, शाश्‍वत व हुकमी स्रोत निर्माण केला आहे. चौदा महिन्यात पाच बॅचेसद्वारे उत्पादन घेत त्यांनी रेशीम कोषांना स्थानिक बाजारपेठही मिळवली आहे. याच व्यवसायातून आर्थिक परिस्थिती सुधारता आल्याचे समाधान त्यांना आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Farmer Success Story : सांगली जिल्ह्यात पुणे- बंगळूर राष्ट्रीय मार्गावर इस्लामपूर नजीक पेठ नाका आहे. त्याच्या पूर्वेला हाकेच्या अंतरावर पेठ गाव (ता. वाळवा) वसलं आहे. हा भाग ऊस पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील बाबूराव माळी यांनी तलाठीची नोकरी करताना शेतीकडेही चांगल्या प्रकारे लक्ष दिले. नायब तहसीलदार पदावरून ते निवृत्त झाले. त्यांचा एक मुलगा सोमनाथ यांनी ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. दुसरा मुलगा कैलास पूर्णवेळ शेती करतात. त्यांना शेतीत पत्नी रूपाली यांच्यासह वडील, आई सौ. सुमन, चुलते सदाशिव, चुलती सौ. अंजना, सोमनाथ व त्यांच्या पत्नी सौ. वर्षा यांची मोठी मदत होते.

Silk Farming
Silk Cocoon Market : रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्राचे भिजते घोंगडे

पूरक उद्योगाचा आधार

कैलास यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती. ऊस हे प्रमुख पीक. जोडीला दहा वर्षे भाजीपाला पिकांचा अनुभव घेतला. मात्र ऊस व भाजीपाला पिकांना पूरक व्यवसायाची जोड देणे कैलास यांना गरजेचे वाटले. सन २०१६ मध्ये सांगली येथील रेशीम कार्यालयातील अधिकारी रेशीम शेतीचा प्रसार करण्यासाठी ग्रामपंचायतीत आले होते. रेशीमकोष निर्मितीतील गटशेतीसाठी त्यांच्यातर्फे प्रोत्साहित केले जात होते. त्या वेळी कैलास यांना रेशीम शेतीचा पर्याय सापडला.

रेशीम शेतीची सुरुवात

कैलास यांच्यासह परिसरातील काहीजण रेशीम शेतीसाठी एकत्र आले. त्यांना रेशीम अधिकारी बाळासाहेब कुलकर्णी, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. उद्योग उभारणीसाठी मनरेगा अंतर्गत सुमारे एक लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी कैलास यांनी अनुभवी शेतकरी आणि अधिकाऱ्यांकडून ज्ञान घेतले. भागातील वैभव माळी, सागर माळी, सुनील पाटील यांच्या संगोपन शेडला भेट देऊन बारकावे समजून घेतले.

Silk Farming
Sericulture Farming : रेशीम शेतीतून अनेक फायदे, कमी खर्चात जास्त उत्पादन

शेडमधील व्यवस्थापन व कोषनिर्मिती

सुमारे ४५ फूट बाय २५ फूट असे रेशीम अळी संगोपन शेडचे क्षेत्रफळ आहे. त्यात तीन रॅक्स असून प्रत्येकाचे आकारमान २५ बाय चार फूट आहे. सुमारे १४ महिन्यांमध्ये पाच बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच १५० अंडीपुंजांची असते. सांगली जिल्हा रेशीम कार्यालयाकडून त्यांचा पुरवठा होतो.

प्रति शंभर अंडीपुजांचा दर एक हजार ३०० रुपये आहे. त्यासाठी अनुदानाची सोयही आहे. पंचवीस गुंठ्यात व्ही वन तुती वाणाची लागवड आहे. छाटणीनंतर तुती २० पानांवर आल्यानंतर बॅचची तयारी सुरू होते. प्रत्येक बॅच आटोपल्यानंतर एक ते पावणेदोन महिन्यांची विश्रांती देण्यात येते. शेडचे दोन वेळा निर्जंतुकीकरण होते. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चुना आणि विजेता पावडरची धुरळणी करण्यात येते. पाला दर्जेदार मिळण्यासाठी तुतीचे व्यवस्थापनही काटेकोर होते. दोन वर्षांतून चार ट्रॉली शेणखताचा वापर होतो. छाटणी केल्याने फुटवे दर्जेदार मिळतात. उच्च प्रतीचा पाला तयार होण्यास मदत होते.

उत्पादन व बाजारपेठ

प्रति १५० अंडीपुंजांच्या बॅचमधून सरासरी १३० ते १४० किलो कोषांचे उत्पादन मिळते. पैकी ८० ते ९० टक्के उत्पादन ‘ए ग्रेड’चे असते. रेशीम कोषांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ कर्नाटकात रामनगर येथे आहे. सुरुवातीला कैलास यांनी तेथे विक्री केली. मात्र दूरची वाहतूक, वेळ, श्रम या बाबींचा विचार करता स्थानिक बाजारपेठेचा शोध त्यांनी सुरू केला. त्यातूनच गावापासून सुमारे १५ किलोमीटरवर कऱ्हाड तालुक्यातील वाठार येथे रेशीमधागा निर्मितीच्या युनिटबद्दल माहिती समजली. तेथे भेट दिल्यानंतर आता चार ते पाच वर्षांपासून याच युनिटला कोषांचा पुरवठा केला जात आहे. त्यास प्रति किलो ५५० ते ६०० रुपये दर मिळत आहे. प्रति बॅच सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो.

चौदा महिन्यांचा म्हणजे सुमारे सव्वा वर्षांचा विचार केल्यास दोन लाखांहून अधिक उत्पन्न हाती येते. रमझान, ईद, दिवाळी किंवा अन्य काही सणांदरम्यान बाजारात कोषांना मागणी कमी असते. त्या वेळी दरही प्रति किलोमागे ५० ते ६० रुपयांनी कमी असतात. अशा कालावधीत कोष विक्रीस येणार नाहीत या पद्धतीने बॅचचे नियोजन केले जाते. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी होते.

कैलास माळी, ७०२०३८५१४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com