Dharangutti Book Village : मोबाइल, इंटरनेटच्या युगात धरणगुत्तीत साकारलं पुस्‍तकाचं घर

Book Village in Maharashtra : सर्व गावांसाठी आदर्श पाटील दांपत्याचा उपक्रम चाळीस हजार पुस्‍तकांचा संग्रह
Dharangutti Book Village
Dharangutti Book VillageAgrowon

राजकुमार चौगुले

Pustakanch Gaav : मोबाइलच्या युगात नवी पिढी पुस्तक संस्कृतीपासून दूर जात आहे. अशावेळी डॉ. सुनील व संजीवनी या पाटील दांपत्याने अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येतून आपल्या निवासी धरणगुत्ती (जि. कोल्हापूर) गावच्या मुलांना पुस्‍तक वाचनाच्या प्रवाहात आणले आहे. चाळीस हजार पुस्तकांचा संग्रह असलेले आपले घर पुस्तक घर म्हणून विकसित केले आहे. छोट्या गावात सुरू झालेली ही वाचन संस्कृतीची चळवळ अन्य गावांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत बनली आहे.

कोल्हापूर शहरापासून पन्नास किलोमीटरवर धरणगुत्ती (ता. शिरोळ) हे गाव आहे. मूळचे मेहकर (बुलडाणा) येथील डॉ. सुनील पाटील शिक्षकी नोकरीच्या निमित्ताने जयसिंगपूर येथे आले. त्यांनी इतिहास विषयातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. काही वर्षे इंग्रजी शाळेत प्राचार्य पदापर्यंत जबाबदारी सांभाळली. लहानपणापासून वाचन आणि पुस्तकांची मोठी आवड असल्‍याने नोकरी सोडून पुस्तक प्रकाशन व तत्सम व्यवसायातच ‘करिअर’ सुरू केले. आज त्यांची स्वतःची प्रकाशन संस्‍था आहे. भाषांतराचे कामही ते करतात.

पुस्तकच झाले आयुष्‍य

पाटील यांना पुस्‍तक संग्रहाचाही प्रचंड छंद आहे. त्यातून घरीच त्यांनी पुस्तक घर अर्थात ‘लायब्ररी’ सुरू केली. तब्बल चाळीस हजार पुस्तकांचा संग्रह येथे पाहण्यास मिळतो. काळाच्‍या प्रवाहात बंद पडलेली नियतकालिके, बाल साहित्य, कथा व काव्‍य संग्रह, समीक्षा, चरित्रे, विज्ञानकथा, कृषी, संशोधनपर,
कादंबरी, ललित गद्य, नाटक, एकांकिका, सामान्य ज्ञान, इतिहास, पर्यावरण, प्रवास वर्णन, अनुभव कथन, व्याकरण, शब्दकोश, आरोग्‍य, सुविचार, मूल्य शिक्षण, व्यवसाय विषयक, व्यक्तिमत्त्व विकास अशी मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांतील सुसज्ज ग्रंथसंपदा इथे आहे. हा संग्रह जपण्यासाठी गावातील गोदामवजा जागा घ्यावी लागली. त्याचे वार्षिक एक लाख रुपये भाडे आहे. पण पुस्तकांच्या प्रेमापोटी हे मोल द्यायला पाटील मागेपुढे पाहत नाहीत.

Dharangutti Book Village
Village of Books : राज्यपाल रमेश बैस गेले पुस्तकांच्या गावी...

घरात पाहावी तिथे पुस्तकेच

पाटील यांच्या घरात संसारोपयोगी साहित्यापेक्षा पुस्‍तकांची संख्याच अधिक असल्याचा भास होतो. खाद्यपदार्थांपेक्षा पुस्तकांनाच जास्त जागा दिलेले त्यांचे एकमेव स्ययंपाकघर असावे. पुस्तके ठेवण्याची रचना वा मांडणीही व्यवस्थित, नीटनेटकी आहे. डॉ. सुनील यांना पत्नी संजीवनी यांनीही साहित्य चळवळीच्या वृद्धीसाठी तेवढेच मोलाचे योगदान दिले आहे. ‘लायब्ररी’ संबंधित अनेक कामांची जबाबदारी त्याच पाहतात. राज्यातील महत्त्वाच्या कारागृहांतील लायब्ररींना येथून पुस्‍तके गेली आहेत. पंतप्रधान कार्यालयाला तसेच वाचकांनाही पुस्तके पोस्‍टाने पाठविण्यात येतात. वाचकाने वाचून परत पाठवले की दुसरे पुस्‍तकही पाठविण्यात येते.

Dharangutti Book Village
Ajit Pawar : तंत्रज्ञानाच्या युगात अपघात हे केंद्र सरकारचे अपयश

ज्ञानातूनच गावाची प्रगती

सध्याच्या युगात स्मार्ट मोबाइल, इंटरनेट व सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाचे प्रमाण लोप पावत आहे. गाव व विशेषतः गावातील
मुले वाचन, पुस्तक, ज्ञानाने समृद्ध झाली तर गावच्या प्रगतीचा मार्ग आणखी धवल होतो हे पाटील यांनी जाणले. मुलांमध्ये पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी यासाठी यंदाच्या उन्हाळी सुट्टीत पाटील यांनी अभिनव उपक्रम राबविला. यात अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’, माजी सरपंच शेखर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय सूर्यवंशी यांचे सहकार्य झाले.
या उपक्रमात पाटील यांच्या लायब्ररीतील पुस्तके उपलब्ध करावीत अशी मागणी विद्यार्थ्यांना पोस्ट कार्डद्वारे करायची होती. पोस्ट ऑफिस, पत्रलेखन कसे करावे व कोणत्याही मागणीसाठी अर्ज कसा करावा आदी व्यावहारिक ज्ञान मुलांना व्हावे हाही एक उद्देश होता. पाटील यांनी गावातील पोस्ट ऑफिसमध्ये पुरेशी पोस्ट कार्ड्स उपलब्ध केली.

मुलांना लागली शिस्त

तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड उपक्रमात भाग घेतला. तर शंभरहून अधिक विद्यार्थी पुस्तके घेऊन गेली. घरच्या लायब्ररीत बसून वाचण्याबरोबर पुस्तके घरी नेण्याचीही सोय होती. त्यातून पालक व घरातील अन्य सदस्यांमध्येही वाचन संस्कृती वाढण्यास चालना मिळाली. सत्तरहून अधिक पुस्तके अशा रीतीने मुलांनी उन्हाळी सुट्टीत वाचली. वाचलेल्या पुस्तकांसंबंधी संक्षिप्त नोटही पोस्ट कार्डवर लिहून मुलांना द्यावयाची होती. काही विद्यार्थ्यांनी लेखकांना पुस्तक आवडल्याची प्रतिक्रियाही कार्डवर लिहून पाठवली. लेखकांना त्याचा वेगळा आनंद मिळाला.

मुलांना लागली शिस्त

पाटील यांच्या पुस्तकाच्या घरात नीटनेटके यायचे. अनवाणी न येता पायात चप्पल असावे. कोणताही अपशब्द वा शिवीचा उच्चार करायचा नाही असे नियम लागू केले. त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी व शिस्त लागली. पुस्तकातील कोणता भाग आवडला याबाबत मुले निरीक्षणे नोंदवायची. मुलांच्या माध्यमातून काही ग्रामस्‍थांनीही पुस्तकांची मागणी केली. त्यांनाही पुस्तके देण्यात आली. गावात या चळवळीचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा हाच हेतू होता. एका छोट्या गावात रुजत असलेली ही वाचन संस्कृती राज्यातील गावे आणि शाळांसाठी दिशादर्शक ठरत आहे. निरपेक्ष भावनेने पाटील दांपत्याकडून त्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

‘पोस्टल लायब्ररी’ची अनोखी संकल्‍पना

याच उपक्रमाचे पुढील पाऊल पाटील यांनी उचलले आहे. धरणगुत्ती गावातील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेत त्यांनी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ संकल्पना सुरू केली आहे. तेथे दर शनिवारी एखाद्या वर्गात पुस्तके मांडली जातात. पहिली ते आठवीपर्यंतची मुले आपल्याला हवी ती पुस्तके निवडून ती घरी वाचायला घेऊन जातात. एक पुस्तक वाचून झाल्यानंतरच पुढील पुस्तक मिळते. मुलांचा त्यास प्रतिसाद उदंड आहे.

ग्रंथतुला

‘बुके नव्‍हे बुक द्या’ ही संकल्पना घेऊन पाटील यांचा मुलगा प्रिन्स याची ग्रंथतुला दरवर्षी केली जाते. त्याच्या वजनाइतकी पुस्तके सरकारी शाळेला दान केली जातात. तो पहिलीत असल्यापासून केक, फटाके आदींवर खर्च न करता हा आगळा वेगळा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. प्रिन्स सध्या सहावी इयत्तेत शिकत असून, त्याच्यावरही वाचनाचे संस्कार झाले आहेत. या उपक्रमाची नोंदही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (२०१६) मध्ये झाली आहे. या उपक्रमावरून प्रेरणा घेत अनेकांनी अशी ग्रंथतुला सुरू केली.

लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पाटील यांनी तीन हजारांहून अधिक मराठी कवितासंग्रहाचे संकलन केले आहेत. आंतरराष्ट्रीय कविता संग्रहांचाही त्यात समावेश आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने याची दखल घेत २०१५ च्या ‘स्पेशल लिटरेचर एडिशन’मध्ये प्रमाणपत्र देत त्याची नोंद घेतली आहे. नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही पाटील आघाडीवर असतात. त्यांनी दीडशेहून अधिक कविता संग्रह प्रसिद्ध केले आहेत. यात ६० टक्के कवितासंग्रह नवोदित कवींचे आहेत. लेखकाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्‍यांची स्वाक्षरी त्याच्या पुस्तकावर घेण्याचा छंदही पाटील यांना आहे. अशी सुमारे १४०० पुस्‍तके त्यांच्या संग्रहात आहेत. काही लेखकांकडे आपल्या पुस्तकाची आवृत्ती काही कारणामुळे उपलब्ध नसते. असे लेखक देखील पाटील यांच्याकडून आपले पुस्तक घेऊन गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रतिक्रिया

विविध विषयांवरील माहिती जाणून घेणे, प्रश्‍न विचारणे आणि सामान्य ज्ञान वाढवणे हे मला आवडते. त्यामुळे ‘लायब्ररी’च्या उपक्रमात मला सहभाग घेता आला. ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट ठरली.
- सौरभ कांबळे, इयत्ता पाचवी

‘लायब्ररी’तून आणलेली पुस्तके स्वतः तर वाचलीच. परंतु बहि‍णीने जास्त आवडीने वाचली. खास करून तिच्यासाठी मी अनेक पुस्तके आणली. आमचा संपूर्ण परिवार वाचनाचा आनंद घेत आहे.
- यश धेंडे, इयत्ता सहावी


आतापर्यंत शालेय पुस्तके सोडली तर अन्य पुस्तके वाचायला अभावानाचे मिळायची. पोस्टल लायब्ररी या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून आता ज्ञानाचा खजिनाच खुला झाला आहे.
- समीक्षा कुंभार, इयत्ता आठवी

डॉ. सुनील पाटील, ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com