सतीश खाडे
Water Management : सामान्य शेतकरी असे विचारू शकतात, ‘‘मी माझ्या पिण्याच्या पाण्याची किंवा शेतातील पाण्याची चिंता करावी, हे ठीक. पण सागरातील पाण्याची का चिंता करावी? समुद्राविषयी माहिती घेऊन काय फायदा?’’ पण आपल्या पृथ्वीच्या एकूणच परिसंस्थेमध्ये समुद्र अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावरच अन्य सर्व परिसंस्था आणि परिस्थितिकी या प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहेत. हे सत्य जितक्या लवकर माणूस समजून घेईल, तितके एकूणच मनुष्यजातीचे, सजीवांचे आणि पर्यायाने पृथ्वीच्या परिसंस्थेचे भविष्य शाश्वत राहण्यास मदत होणार आहे.
आजवर अवकाशामध्ये गेलेल्या अनेक अवकाशयात्रींनी तिथून आपली पृथ्वी कशी दिसते, याचे वर्णन केले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा चमकता निळा रंग संपूर्ण काळ्या अवकाशामध्ये उठून दिसतो. हा अवकाशातून पृथ्वीचा दिसणारा निळा रंग आलाय कोठून? त्याचे सर्वांत महत्त्वाचे व पहिले कारण म्हणजे पृथ्वीचा ७१ टक्के भाग समुद्राखाली आणि २९ टक्के भाग जमिनीचा आहे. जमिनीच्या दुपटीपेक्षा कितीतरी अधिक भाग समुद्राचा आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. तिचा उगमही समुद्रातून झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. पहिला जीव ही समुद्रातच जन्मला. समुद्रातील वनस्पती, सजीव, प्रवाळ आणि अन्य अनेक घटक यांचे जैवविविधताही जमिनीच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे. यातील अनेक घटक हे जमिनीवरील झाडांप्रमाणेच ऑक्सिजनच्या निर्मितीमध्येही मोलाची भूमिका निभावतात. तुम्हाला सांगितले, तर आश्चर्य वाटेल! पण पृथ्वीच्या वातावरणातील एकूण प्राणवायूच्या ५० ते ६० टक्के प्राणवायू समुद्रातील वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमुळे तयार होतो. आज आपण प्रदूषणावर झाडे लावण्याचा उपाय सुचवत असतो. पण ती जमिनीवरील झाडे किंवा जंगले जितका कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात तितकाच, किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सागरात शोषला जातो.
तिसरे मुख्य कारण म्हणजे जगातील ४० टक्के लोकसंख्या ही अन्नासाठी विशेषतः प्रथिनांसाठी सागरावर अवलंबून आहे. भारताची प्रथिनासाठी सागरावरील अवलंबित्त्व आकडेवारी साधारण इतकीच आहे. जमिनीवरील शेतीसाठी जो पाऊस पडतो, त्या पाऊस देणाऱ्या ढगांच्या निर्मितीमागेही समुद्रच आहे. इतकेच नव्हे, तर ते ढग वाहून नेणाऱ्या वाऱ्यांच्या निर्मितीतही सागराचाच महत्त्वाचा वाटा असतो. सागरातील जैवविविधता अन्न तर पुरवतेच, पण अनेक औषधी मूलद्रव्ये देणाऱ्या वनस्पती, सजीव या सागराच्या परिसंस्थेत आहेत. आपण कित्येक प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या बाबतीत माहिती मिळवत आहोत, पण सागराच्या अगदी अनोख्या आणि खूप रमणीय, रोमांचक विश्वाची आपल्याला फारच कमी माहिती आहे.
सागर डोळ्यांनी दिसण्याआधीच दूरवरून त्याची गाज कानांना ऐकू येऊ लागते. सागराची व्याप्ती मोठी तर आहेच, पण त्याच्या प्रदीर्घ पसरलेल्या किनाऱ्यावरच सागराचा प्रभाव पसरलेला आहे. या किनाऱ्यावर असलेल्या वाळूचेही दोन प्रकार पडतात. एक असते भरती ओहोटीच्या लाटांनी चापून बसलेली आणि दुसरी त्या पलीकडे उडून गेलेल्या वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्यांच्या रूपात विखुरलेली. या जमिनीच्या आणि वाळूच्या सीमेवर या वाळूत असते ते रुई, भेंडी, केवडा, सागर फळ, करंज, मोरिंदा, निरगुडी, खुळखुळा अशा झाडांचे जंगल. कुठे असतात नारळी पोफळीची झाडे. वाळू नसलेल्या ठिकाणी उघडे खडक असतात. त्यावर भरती ओहोटीमध्ये सागराचे सिंचन होत असते. त्या खडकांच्या खळग्यात, खडकाभोवती, दोन खडकांच्या मधल्या जागेत पाणी साचूनही एक समृद्ध परिसंस्था तयार झालेली असते. त्याला म्हणतात खाजणस्थळ!
अशाच प्रकारे ज्या ठिकाणी नद्या समुद्राला मिळतात, त्याच्या सीमेवर खाड्यांमध्ये खारफुटीचे जंगल (कांदळवन) असते. वाळू, खाजण, कांदळवन, स्वतः समुद्र ही समुद्राशी संबंधित वेगवेगळ्या सजीवांचे रहिवासस्थळे (Habitats) आहेत. इथल्या प्रत्येक जागेतील, आश्रयस्थानांमधील जैवविविधता विपुल व संपन्न आहे. मासे आणि खेकडे यापलीकडे अक्षरशः हजारो प्रकारचे प्राणी व वनस्पती या आश्रयस्थानात वाढत असतात. चोपून बसलेल्या वाळूत वेगवेगळे प्राणी असतात. वाळूवर नक्षी कोरत जाणारे खेकडे असतात, तर या वाळूवरच बटन शिंपलेही असतात. तसेच हृदयाच्या आकाराचे आर्चिंन (urchin) पाण्यातून वाहून येऊन पडलेले असतात. यातले काही आर्चिन विषारी आणि काटेरी असतात. भरतीतून आलेले अगदी काचेसारखे स्टेनोफोर व कोम्बजेली या प्रकाराचे पारदर्शक मासेही येथे दिसतात. याच वाळूवर बारीक बिळे आणि त्या शेजारी वाळूचे लाडू ही आपल्याला दिसतात. हे लाडू कशाचे? तर खेकडे वाळूतील किडे वा इतर भक्ष्य वाळूसह गिळतात.
त्यातील भक्ष्य पोटात रिचवले जाते, पण वाळू लाडूच्या स्वरूपात बाहेर पडते. वाळूमध्ये काही छोटी तर काही मोठी बिळे असतात. भरतीचे पाणी या वाळूतील बिळात घुसले की बारीक कीटक वा तत्सम प्राणी बाहेर पडतात. त्यांच्यावर किनाऱ्याच्या पक्ष्यांचे लक्ष असते, ते पटकन त्यांना टिपून खातात. अनेक प्रकारचे शंख शिंपलेही इथे वाळूत असतात. यातले काही शिंपले जीवविरहित, तर काहींमध्ये जीव असतात. स्टार फिश मासेही मोठ्या प्रमाणात वाळूवर दिसतात. ‘भूत खेकडे’ ही या वाळूचे रहिवासी.
इथे चक्क वाळूतही वाढणाऱ्या काही बहाद्दर वनस्पती आहेत. त्यांची मुळे उथळ असतात. जांभळी फुले येणारी ‘बाय बाय’, ‘स्पिनिफेक्स’ नावाच्या काटेरी वनस्पतीचे पुंजके, काही गवतांचे प्रकार या वाळूवर वाढतात. इतकेच काय वाळूच्या प्रत्येक कणांभोवती असलेल्या पाण्याच्या वलयात एकपेशीय प्राणी, वनस्पती, समुद्र कीटक, कवच असलेले सूक्ष्मजीव आणि काही कीटकांच्या अळ्या अशा सूक्ष्मतर जिवांच्या राशीच असतात. खरंतर वाळूचा एक कण हा सुद्धा एक स्वतंत्र परिसंस्था ठरू शकते, तिथे संपूर्ण समुद्रांमध्ये किती परिसंस्था कार्यरत असतील, किती समृद्धी असेल? समुद्रामध्ये एक दुसऱ्याचा भक्ष्य तर दुसरा तिसऱ्याचा, तिसरा आणि कोणा चौथ्याचा... अगदी एकपेशीय सजीवांपासून, शेवाळांपासून सुरुवात होऊन, ती लहान मोठ्या माशांपर्यंत आणि समुद्रावर विहरणाऱ्या थेट पक्ष्यांपर्यंत ही अन्नसाखळी (food chain) किंवा अन्न मनोरा (Food chain Pyramid) येथे स्थापलेला दिसतो.
खाजण (रॉक पूल) परिसंस्था
किनाऱ्यावर सगळीकडे वाळूच असते असे काही नाही. बऱ्याच ठिकाणी वाळूऐवजी खडकांचीही किनार असते. या खडकांवर अहोरात्र लाटा आदळत असतात. खडकांच्या भेगांत, खडकांवर असलेल्या खड्ड्यात, खोबणीत, दोन खडकांमध्ये भरती ओहोटीच्या वेळी पाणी येत जात असते. या छोट्या-मोठ्या पाणी साठलेल्या डबकीवजा जागांना खाजण असे म्हणतात. या खाजणांमध्येही रंगीबेरंगी आणि विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशा विपुल एकपेशीय वनस्पती, सजीवांपासून मासे व इतर मध्यम आकारांच्या जलचरांची मोठी वस्ती असते. (इंटरनेटवर ही रंगीबिरंगी दुनिया नक्कीच पाहता येईल.) खाजण हे स्वतंत्र आश्रयस्थाने (हॅबिटॅट) आहेत. तिथे स्वतंत्र परिसंस्था आहे. या खाजणांव्यतिरिक्त खडकांवरही ओल्या सुक्या अवस्थेत सतत राहणारी एक स्वतंत्र परिसंस्था असते. या भागाला आणि वाळूवरचा ही ओलेपणा व कोरडेपणा यामध्ये सतत दोलायमान राहणारी ही परिस्थिती विलक्षण आहे. खरे तर हाच इथल्या पर्यावरणाचा आत्मा आहे. बदलणारे तापमान, सतत बदलत असलेला हवेचा वेग, २४ तासांत किंवा ऋतूप्रमाणे बदलत जाणारे तापमान, पाण्याच्या खारेपणात होणारे बदल या परिसंस्थेतील जिवांना चांगलेच जाणवतात.
या बदलांनुसार स्वतःमध्ये बदल घडवत लवचिक राहणारे सजीव टिकाव धरून राहतात. त्यांनी इथे सुंदर विश्व तयार केले आहे. खडकांच्या या जल कुंभात काही माशांचे प्रकार, खेकडे, रॉक्स क्रिपर हा माशासारखा दिसणारा प्राणी, तर खडकांवर नळ्यांच्या आकाराचे घर करणारे सॅबिल आर्या कीटक असतात. या कीटकांच्या अशा असंख्य नलिकागार घरांची वसाहत इथे असते. ऑक्टोपस, समुद्र कीटक, सागरी गोगलगायी, सीसकट आणि मॉल ब्रिटन स्टार अशी एक ना अनेक ज्ञान अज्ञात व त्यामुळे नावे दिलेले व नावे नसलेले अनेक सजीवांची मोठी प्रजा नांदत असते. त्यांच्यासोबत असतात ती लहानमोठी झाडे, छोटी झुडपे, शेवाळे आणि स्पंज नावाचे प्राणी. एकमेकांवर अवलंबून असलेली जीवनसाखळी नांदत असते.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.