खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात तयार केली ओळख

दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून खपली गव्हाचे उत्पादन घेऊन त्यापासून पीठ आणि बिस्किटे निर्मिती उद्योग सुरू केला आहे. यासोबत हळद पावडर निर्मितीदेखील करतात.
process products
process products

दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून खपली गव्हाचे उत्पादन घेऊन त्यापासून पीठ आणि बिस्किटे निर्मिती उद्योग सुरू केला आहे. यासोबत हळद पावडर निर्मितीदेखील करतात. गेल्या तीन वर्षात वैशाली पाटील यांनी प्रक्रिया उद्योगातून  परिसरातील बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

दसनूर (ता.रावेर, जि.जळगाव) गाव शिवार केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. यासोबत हळद, आले लागवडदेखील या भागामध्ये वाढत आहे. काळी कसदार जमीन आणि तापी नदीच्या पाण्यामुळे शिवारात पिकांचे चांगले उत्पादन मिळते. शेतीसाठी समृद्ध भाग म्हणून या परिसराची खानदेशात ओळख आहे. या परिसरातील दसनूर गाव शिवारामध्ये वैशाली प्रभाकर पाटील यांची शेती आहे. वैशालीताईंवर काळाने आघात केले आणि  कुटुंबाच्या सुमारे ६१ एकर शेतीची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. वैशालीताईंचे वडील प्रभाकर यांचे ५८ व्या वर्षीच हृदयरोगामुळे तर बंधू संजय यांचे अकाली निधन झाले. तर अलीकडेच आईचेही निधन झाले. हे सगळे आघात सहन करत वैशालीताईंनी त्यांच्या वहिनी संगीता तसेच भाचा राज, भाची श्रेया यांच्या सोबत कुटुंबाच्या शेतीला नवी दिशा दिली आहे. राज आणि श्रेया सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.   शेतीला दिली दिशा  वैशालीताईंनी २००३ पासून शेती आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. वैशालीताईंनी पुणे येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर व्यवसाय व्यवस्थापन विषयातील (बीबीएम) पदविकादेखील घेतली आहे. त्यांचा भाचा राज याने देखील बारामती येथील महाविद्यालयातून ॲग्री पॉलीटेक्निक पदविका पूर्ण केली आहे. राज याची वैशालीताईंना शेती व प्रक्रिया उद्योगामध्ये मदत होते. वैशाली ताईंच्या कुटुंबाच्या ६१ एकर शेतीमध्ये १० विहिरी, एक ट्रॅक्टर, दोन बैलजोड्या आणि पाच गीर गायी आहेत. शेती व्यवस्थापनासाठी सहा सालगडी, एक व्यवस्थापक आहे. शेतीच्या नियोजनामध्ये नातेवाईक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. शेतीमध्ये केळी प्रमुख पीक असून दरवर्षी मृग बहारातील केळी (जून व जुलै) लागवड ही २३ एकरात असते. तसेच १८ ते २० एकर क्षेत्रावर बीटी कापूस लागवड असते. उर्वरित क्षेत्रात मका, हळद आणि रब्बीमधील हंगामी पिके असतात. त्या खासकरून खपली गव्हाची लागवड करतात. आई आजारी असल्याने खपली गहू त्यांच्या आहारात असावा यासाठी वैशालीताईंनी  बारामती येथील एका संस्थेकडून खपली गहू  बियाणे खरेदी केले. मागील चार वर्षांपासून त्या साडेतीन एकर क्षेत्रावर खपली गव्हाचे उत्पादन घेत आहे. त्यांना एकरी सरासरी १२ क्विंटल उत्पादन मिळते. खपली गहू हा मधुमेह व इतर रुग्णांसह सर्वांच्या आहारात महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यापासून विविध पदार्थ निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री करण्यास त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात केली.

सेंद्रिय पद्धतीने गहू, हळद उत्पादन वैशालीताई दरवर्षी साडेतीन एकर खपली गहू आणि पाच एकरावरील हळदीचे सेंद्रिय पद्धतीनेच उत्पादन घेतात. या पिकांसाठी सुरुवातीपासून स्लरी, शेणखत आणि सेंद्रिय कीडनाशकांचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. त्यामुळे गहू, हळदीचे दर्जेदार उत्पादन मिळते. त्यामुळे या उत्पादनांना मागणी देखील वाढली आहे.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात  वैशालीताई  मागील तीन वर्षांपासून किमान १५ क्विंटल खपली गव्हाची परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विक्री करतात. प्रति किलोस त्यांना ८० रुपये दर मिळतो. दरवर्षी १० क्विंटल गहू घरी   बियाणे आणि खाण्यासाठी ठेवतात. चार क्विंटल गव्हापासून उपपदार्थ पीठ,रवा, बिस्किटे तयार करून घेतली जातात. वैशालीताईंनी गेल्या तीन वर्षांपासून परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन खपली गव्हाचे पीठ, रवा, बिस्किटे निर्मितीस सुरुवात केली. त्याचबरोबरीने स्वतःच्या शेतातील हळदीपासून तीन क्विंटल पावडर निर्मिती देखील करतात. पहिल्या टप्यात त्यांनी प्रक्रिया व्यवसाय मर्यादित स्वरुपात ठेवला, कारण बाजारपेठेमध्ये  मागणी कशी राहील याचा अंदाज नव्हता. जळगावमधील बेकरीतून वैशालीताई खपली गव्हाच्या पिठाची बिस्किटे तयार करून घेतात. दरवर्षी एक क्विंटल गव्हाची बिस्किटे, एक क्विंटल गव्हाचा रवा आणि एक ते दीड क्विंटल गहू पिठाची विक्री होते. गव्हाचे पीठ, रवा आणि  हळद पूड त्या घरीच महिला मजुरांच्या मदतीने तयार करून घेतात. बिस्किटात मैद्याचा वापर केला जात नाही. हे सर्व उपपदार्थ आरोग्यदायी असल्याने त्यांना चांगली मागणीदेखील आहे. दरवर्षी प्रक्रिया उद्योगातून दोन लाखांची उलाढाल होते.

महिला गटाची स्थापना यावर्षी वैशालीताईंनी गावातील १५ महिलांना एकत्र करून श्री प्रभुराम महिला शेतकरी गटाची स्थापना केली. खपली गव्हाची स्वच्छता, प्रतवारी, पीठ आणि रवा निर्मितीसाठी त्यांना चार लाख रुपयांची यंत्रणा आत्मा (कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा) यांच्या मदतीने उपलब्ध झाली. येत्या काळात वैशालीताई शेतावरच लघू प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. सध्या कोरोना लॉकडाउनच्या अडचणींमुळे मागील चार महिने या प्रक्रिया उद्योगासह इतर कार्यवाहीला अडथळे आले आहेत.   गहू प्रक्रियेसोबतच वैशालीताईंनी केळीपासून वेफर्स व इतर उपपदार्थ निर्मिती उद्योगाचे देखील नियोजन केले आहे. शेती आणि प्रक्रिया उद्योगासाठी जळगाव जिल्ह्याच्या कृषी विभागातील उपसंचालक अनिल भोकरे, पाल (ता.रावेर, जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ महेश महाजन आणि यावल येथील कृषी पर्यवेक्षक एम.डी.पाटील यांची मदत झाल्याचे वैशालीताई सांगतात.

प्रदर्शनातून थेट विक्री

गव्हासह उपपदार्थांची  थेट ग्राहकांना विक्री व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्यात विविध भागात आयोजित केल्या जाणाऱ्या शेतीसंबंधी प्रदर्शनात वैशालीताई मागील तीन वर्षे हिरिरीने सहभाग घेत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित बहिणाबाई बचत गट महोत्सवातही त्या सहभागी होतात. या महोत्सवामधून त्यांच्या प्रक्रिया उत्पादनांची हातोहात विक्री होते. यामुळे शहरी बाजारपेठ, मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी अजूनतरी त्यांना संपर्क करावा लागलेला नाही. अलीकडे त्यांनी पदार्थांच्या विक्रीसाठी रिचलाईफ फूड्स ॲण्ड हर्बल या नावाने प्रक्रिया उद्योगाची नोंदणी केली आहे.  

- वैशाली पाटील, ७६२०२३९१३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com