डॉ. रामचंद्र साबळेWater Management: या वर्षी कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड, अल्पकालीन पिकांची लागवड, उपलब्ध सिंचन साधनांचा कार्यक्षम वापर यावर भर द्यावा लागेल. पाण्याची उपललब्धता कमी असली तरी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि पीक व्यवस्थापनातून उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यंदाचा हंगाम आव्हानात्मक असला, तरी योग्य तयारीतून नुकसान कमी करता येईल..यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे शेती, पिकांचे उत्पादन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पशुधन व्यवस्थापन यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे केवळ ‘एल निनो’च नव्हे, तर वाढता हवामान बदल (क्लायमेट चेंज) हेही महत्त्वाचे कारण आहे. अमेरिकेची नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने यंदा एल निनो सक्रिय होऊन त्याचा मॉन्सूनवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, युरोप, फिलिपिन्ससह विविध देशांतील हवामान संस्थांनीही याच दिशेने अंदाज वर्तविले. .Weekly Weather: मॉन्सून पावसाचे वितरण वाढण्याची शक्यता.भारतीय हवामान विभाग आणि इतर अनेक संस्थांनी आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने एप्रिल महिन्यापासूनच दुष्काळाच्या चर्चांना वेग आला. पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली, की केवळ एल निनो नव्हे, तर ‘सुपर एल निनो’ येणार असल्याचेही बोलले जाऊ लागले. यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, शेती उत्पादनात घट, पिकांचे नुकसान आणि जलसंकट निर्माण होण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात आल्या..‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यांची भूमिकाप्रशांत महासागरातील समुद्रपाण्याच्या तापमानातील बदलांमुळे एल निनो आणि ला निना या घटना घडतात. समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा सुमारे ०.५ अंश सेल्सिअसने वाढल्यास एल निनोची सुरुवात मानली जाते. तापमानातील वाढ दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास त्याला ‘सुपर एल निनो’ म्हटलं जातं. मॉन्सून उशिरा येण्यामागे एल निनोपेक्षा हवामान बदल हा अधिक मोठा घटक आहे. २००३, २००९, २०१२, २०१५, २०१८ आणि २०२३ मधील दुष्काळी परिस्थिती ही हवामान बदलाचेच परिणाम आहेत. जगभर झालेली जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, वाहनांमधून होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यांसारख्या हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान सुमारे १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे..हवामान बदल आणि भू-राजकीय संघर्षांचाही परिणाम?मॉन्सून उशिरा येण्यामागे केवळ एल निनो जबाबदार नसून हवामान बदल हे मुख्य कारण आहे. यासोबतच अलीकडील इराण-अमेरिका संघर्षाचाही संदर्भ आहे. अत्यंत जबाबदारीने मी हे म्हणतोय, की संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाया, स्फोट आणि दारूगोळ्याचा वापर झाला. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता आणि कार्बन डायऑक्साइडसारख्या वायूंचे उत्सर्जन झाले असण्याची शक्यता आहे. यामुळे उपग्रह चित्रांच्या निरीक्षणातून ढगांची आणि वाऱ्यांची हालचाल नेहमीच्या मॉन्सूनी प्रवाहापेक्षा वेगळी दिसून आली. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातून येणारे ढग पश्चिमेकडे, इराणच्या दिशेने सरकत असल्याचे निरीक्षण मी नोंदवले. यामुळे नैॡत्य मॉन्सूनला अपेक्षित बळ मिळाले नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे..जंगलतोडीचे गंभीर परिणामआशियात ५५ दशलक्ष हेक्टर, आफ्रिकेत ६५ दशलक्ष हेक्टर आणि लॅटिन अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे १० दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट होत आहे. वनक्षेत्राचे प्रमाण ३३ टक्के असणे अपेक्षित असताना महाराष्ट्रात ते सुमारे १७ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. परिणामी कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी नैसर्गिक यंत्रणा कमकुवत होत असून, हवामानातील असमतोल वाढत आहे. हवामान बदलामुळे जगभरात पावसाचे वितरण असंतुलित झाले आहे. काही भागांमध्ये दुष्काळ, तर काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे. तापमान वाढल्याने हवेचा दाब कमी होतो, वाऱ्यांचा वेग वाढतो आणि काही भागांत अतिवृष्टी होते. त्यामुळे हवामानाचा नैसर्गिक समतोल ढासळत आहे..मॉडेलवर आधारित पावसाचा अंदाज२००३ पासून विकसित केलेल्या आणि भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झालेल्या मॉन्सून मॉडेलच्या आधारे गेली २३ वर्षे पावसाचे अंदाज दिले आहेत. या मॉडेलमध्ये महाराष्ट्रातील विविध हवामान केंद्रांचा डेटा वापरला जातो. यामध्ये दापोली, पुणे, राहुरी, सोलापूर, पाडेगाव, कोल्हापूर, कराड, नाशिक, धुळे, जळगाव, परभणी, अकोला, नागपूर, यवतमाळ आणि शिंदेवाही या स्थानकांचा समावेश आहे. या मॉडेलच्या आधारे विश्लेषणातून काही भागांत सरासरीच्या जवळपास पाऊस होण्याची शक्यता दिसून आली. कोकण, नागपूर, यवतमाळ, परभणी परिसर आणि पुणे या भागांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस राहू शकतो. .Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता.मुंबईत अलीकडेच २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या अंदाजाची सुरुवातीची पुष्टी मिळाली. मॉडेलच्या निष्कर्षानुसार धुळे आणि त्याच्या आसपासचा भाग, राहुरी परिसर, कराड, पाडेगाव, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळी पट्ट्यात सध्या १४ जिल्हे आणि १२० हून अधिक तालुके समाविष्ट आहेत. या पट्ट्यात धुळे, नाशिकचा पूर्व भाग, नगर, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, आटपाटी परिसर, संपूर्ण सोलापूर जिल्हा, लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष नियोजनाची आवश्यकता भासणार आहे..उशिरा मॉन्सून आणि मोठे खंडगेल्या २४ वर्षांच्या अनुभव असं सांगतो, की दुष्काळी वर्षांमध्ये मॉन्सून सहसा उशिरा येतो. सुरुवातीला पावसाची चांगली सुरुवात होते; मात्र त्यानंतर मोठा खंड पडतो. १ जूनला दिलेल्या अंदाजातही मी म्हटलं होतं, की महाराष्ट्रात सरासरीच्या ९८ टक्के (अधिक -वजा ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचा मोठा खंड पडेल अशीही शक्यता व्यक्त केली होती, त्या प्रमाणे प्रत्यक्षातही खंड पडला. आता मॉन्सूनचे पुनरागमन सुरू झाले असून, काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. ३० जूननंतर ते ७ जुलैदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. .बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होत असून, महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कलवरून १००२ हेप्टापास्कलपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. मात्र यंदाच्या मॉन्सूनमध्ये दोन मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. पहिला खंड आधीच अनुभवास आला असून, दुसरा खंड जुलैच्या अखेरीपासून १५ ऑगस्टपर्यंत राहू शकतो. पावसातील या खंडाचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होईल. परिणामी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, चवळी, मका, कडधान्ये तसेच ऊस यांसारख्या पिकांचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे..ऊस उत्पादनावरही परिणामपावसाचा ताण आणि अपुरे पाणी यामुळे उसाची वाढ खुंटू शकते. ऊसातील कांड्यांची संख्या आणि लांबी दोन्ही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनाही ऊस उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. हेक्टरी उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग या दोघांनाही आर्थिक फटका बसू शकतो..फळबागांसाठी ठिबक सिंचनाचा सल्लाहळद, आले, फळबागा आणि इतर बागायती पिकांसाठी सिंचनाचा वापर वाढवण्याची गरज आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचा वापर केल्यास कमी पाण्यातही बागा टिकवून ठेवता येतील. २००३, २००९, २०१२, २०१५, २०१८ आणि २०२३ या दुष्काळी वर्षांचा अभ्यास करताना अनेक फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी झाडे वाळून गेली होती. त्यामुळे यंदाच्याही हंगामात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी..शासनाने तयारी करणे आवश्यकदुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने आतापासूनच पाणी, चारा आणि पशुधन व्यवस्थापनाची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांच्या शेतजमिनींवर अतिरिक्त चारा उत्पादनासाठी विशेष अनुदान देण्यात यावे. तसेच आवश्यक ठिकाणी ‘कॅटल कॅम्प’ उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महसूल प्रशासन आणि संबंधित विभागांनी वेळेपूर्वी नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळाचा प्रभाव कमी करता येईल..शेतकऱ्यांनी करावे पीक नियोजनपावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या प्रकारानुसार पीक निवड करणे आवश्यक आहे.उथळ जमिनीत मूग, मटकी, उडीद आणि चवळी यांसारखी अल्पकालीन पिके घ्यावीत.मध्यम खोल जमिनीत बाजरी आणि तूर यांची आंतरपीक पद्धत फायदेशीर ठरू शकते.खोल जमिनीत मराठवाडा आणि विदर्भात कपाशीची लागवड करता येईल.विदर्भात अलीकडे १०० मिमीपर्यंत पाऊस झाल्याने तेथे कपाशी लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.