Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज (ता. १९) १००६ हेप्टापास्कल तर उद्या (ता. २०) १००४ हेप्टापास्कल आणि मंगळवारी (ता.२१) १००२ हेप्टापास्कल असे कमी हवेचे दाब राहतील. बुधवार (ता.२२)पासून हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. हवेचे दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत आहे. मॉन्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल अशी सध्याची हवामान स्थिती आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनन दाखल होण्याची निर्धारित वेळ २२ मे असून, दक्षिण अंदमानात निर्धारित वेळेपूर्वी मॉन्सूनन दाखल होण्यास हवामान घटक अनुकूल आहेत. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात मंगळवारी (ता. २१) १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे वेगाने मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होऊन तो निर्धारित वेळेपूर्वी म्हणजेच १९ मे दरम्यान दाखल होईल.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. श्रीलंकेवर मॉन्सून २६ मे दरम्यान दाखल होईल. केरळमध्ये १ जूनपूर्वी, तसेच दक्षिण कोकणात ५ जून, मुंबईस १० जून आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल, अशी शक्यता आहे.
उत्तर भारतात आज (ता. १९)पासून हवेचे दाब ९९८ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १६ अंश सेल्सिअस, कॉलिफोर्निया जवळ १३ अंश सेल्सिअस, तर सॅनफ्रान्सिस्को येथे ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदले आहे. त्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढतील आणि वारे हिंदी महासागर व प्रशांत महासागरावरून भारतावर मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. तसे ‘ला-निना’चा प्रभाव तसेच इतर हवामान घटक अनुकूल असल्याने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मॉन्सून दाखल होईल.
कोकण
आज आणि उद्या (ता. १९ आणि २०) सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २ मि.मी.पर्यंत पावसाची शक्यता आहे. संपूर्ण कोकणात वाऱ्याची दिशा सध्या वायव्येकडून असली तरी थोड्याच कालावधीत ती नैर्ऋत्येकडून होईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील.
सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८५ टक्के, रायगड जिल्ह्यात ७७ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६१ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५४ ते ६३ टक्के, रायगड जिल्ह्यात ४४ टक्के तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअसपर्यंत, तर जळगाव जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नंदुरबार जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील.
नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ टक्के, धुळे जिल्ह्यात ३० टक्के, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात २१ ते २८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १० ते १४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन ताशी २० ते २६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर हिंगोली जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.१९,२०) अल्पशा पावसाची शक्यता राहील. या आठवड्यात किमान तापमानातही वाढ होईल.
किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर लातूर व बीड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ ते २९ टक्के तर नांदेड व हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत ३५ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात अत्यंत कमी म्हणजे १५ ते २० टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० ते २४ कि.मी., धाराशिव व बीड जिल्ह्यात १५ ते १७ कि.मी तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २९ टक्के, तर दुपारची ८ ते ९ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा जिल्ह्यात २१ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १४ कि.मी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. अमरावती जिल्ह्यात ०.४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.१९,२०) १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता राहील.
पूर्व विदर्भ
आज आणि उद्या (ता.१९,२०) गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ४३ ते ४४ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १७ टक्के इतकी अल्पशी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता. १९) कोल्हापूर जिल्ह्यात १४ मि.मी. तसेच सांगली व सातारा जिल्ह्यांत ०.६ मि.मी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २०) कोल्हापूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत वाढेल.
वारे ताशी १६ ते २२ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. कमाल तापमान सांगली जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कमाल तापमान पुणे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. मात्र सोलापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९० टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७५ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ टक्के राहील.
कृषी सल्ला
उन्हाळी पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करून साठवण करावी.
खरीप पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
हळद व आले लागवडीच्या कामांस सुरुवात करावी.
आडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.