डॉ. रामचंद्र साबळे
Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज (ता. २४)पासून गुरुवार (ता. २८)पर्यंत हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहील. मात्र शुक्रवार (ता. २९)पासून तापमानात वेगाने वाढ होऊन हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढेल. दुपारी उष्णतेच्या लाटा जाणवण्यास सुरुवात होईल. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान उष्ण व कोरडे राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल.
कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. पूर्व विदर्भात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. यापुढील काळात उष्णतेच्या तीव्रतेमध्ये वाढ होत जाईल. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशात उष्णतेच्या झळा जाणवतील.
प्रशांत महासागराच्या विषववृत्तीय भागात पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान केवळ १८ अंश सेल्सिअस इतके कमी झाले असून, उर्वरित भागात ते २५ ते २७ अंश सेल्सिअस आहे. तर केवळ पनामाजवळ तापमान ३० अंश सेल्सिअस असल्याने प्रशांत महासागराच्या विषववृत्तीय भागावर हवेचे दाब वाढतील. यावरून ‘ला-निना’ विकसित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या मॉन्सून हंगामात पाऊसमान सरासरीपेक्षा अधिक राहणे अपेक्षित आहे. तसेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या बऱ्याच भागांत समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होऊन त्यातून ढगनिर्मिती होईल. ही स्थिती मॉन्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल ठरेल.
कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस व रत्नागिरी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आज (ता.२४) सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४५ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २० ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. दुपारी हवामान उष्ण व कोरडे जाणवेल.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात २३ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३२ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात या आठवडाअखेरीस आणखी वाढ होईल. दुपारी उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ होऊन ते २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान हिंगोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धाराशिव, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर जालना व बीड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १४ ते १८ टक्के इतकी कमी राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६ ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी १५ ते २० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान सकाळी आणि दुपारी अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते २० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ९ ते १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी आणि दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २४ ते २६ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३७ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी १० ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात १७ टक्के इतकी कमी, तर उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २८ ते ३६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी म्हणजेच १० ते १४ टक्के इतकी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.
कृषी सल्ला :
तापमानात वाढ होत असल्याने फळबागांमध्ये आच्छादनांचा वापर करावा.
फळबागा तसेच भाजीपाला लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
फळबागांमध्ये केओलिनची फवारणी करावी.
उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग, सूर्यफूल या पिकांना नियमित सिंचन करावे.
कुक्कुटपालन शेड तसेच जनावरांच्या गोठ्यावर गवत पसरावे. शेडच्या बाजूने पोती लावून त्यावर सतत पाणी शिंपडावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.