El Nino Update : महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता.२६) १०१० हेप्टापास्कल इतके राहतील; मात्र, उद्या (ता.२७) पासून सलग एक आठवडा हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होणे शक्य आहे.
वायव्य भारतावर हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहण्यामुळे पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव पुन्हा वाढण्यास हवामान (Weather) अनुकूल बनण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने पश्चिमी चक्रवाताचे प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात वादळी वारे, गारपीट (Hailstorm) व पाऊस (Rainfall) झालेला आहे.
हे सर्व हवामान बदलामुळेच घडत असून तापमानात होणाऱ्या वाढीमुळे हवेच्या दाबात बदल होतात. हवेच्या दाबातील फरकामुळे वाऱ्याचा वेग वाढतो. वारे मोठ्या प्रमाणात जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात. वारे येताना मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग वाहून आणतात.
वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होत आहे. एल निनोची तटस्थ भूमिका असून देखील हे सर्व जागतिक तापमानवाढ व त्या अनुषंगाने होणाऱ्या हवामान बदलास कारणीभूत ठरत आहेत.
त्याचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असल्याचे स्पष्ट आहे. वातावरणातील वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे सध्या राज्यात सध्या हवामानाची आणीबाणी निर्माण झाली आहे.
अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९.४ ते २९.६ अंश सेल्सिअस इतके राहील. तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान, आणि प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजेच २९ अंश सेल्सिअस असून एल निनो सध्या तटस्थ स्थितीत आहे.
वातावरणातील वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे सध्या राज्यात सध्या हवामानाची आणीबाणी निर्माण झाली आहे.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअसपर्यंत तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होऊन ती ६८ ते ७२ टक्केपर्यंत राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २४ ते २८ टक्के इतकी कमी राहील.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी रायगड जिल्ह्यात ताशी ७ किमी, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ताशी ८ ते १० किमी राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नंदूरबार जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५४ टक्के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४१ ते ४९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ किमी तर दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील.
नांदेड, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४८ टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ५५ टक्के तर नांदेड जिल्ह्यात सर्वात अधिक ६४ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व संभाजीनगर जिल्ह्यांत २० टक्के तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १९ टक्के इतकी कमी राहील.
लातूर, नांदेड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव, बीड व जालना जिल्ह्यांत ताशी १६ ते १९ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व वायव्येकडून राहील. लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किमी राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी तर गडचिरोली जिल्ह्यात ताशी ५ किमी, चंद्रपूर जिल्ह्यात ताशी ९ किमी राहील.
गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, गोंदिया जिल्ह्यात नैऋत्येकडून तर चंद्रपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. आज काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २५ ते ४९ मिमी पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ते ३८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.
सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २३ किमी इतका वाढेल. इतर सर्व जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला
१) गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी व मळणीची कामे पूर्ण करावीत.
२) आंबा बागेत फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावावेत.
३) गायी-म्हशी आणि शेळ्यांना रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
४) उन्हाळी भुईमुगामध्ये आऱ्या सुटताना पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.