Pune News : राज्यातील काही भागांमध्ये ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे.
विशेषतः नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम ५ जिल्ह्यांमध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला शक्यता अधिकच दिसते, हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः ही शक्यता नांदेड हिंगोली परभणी ह्या ३ जिल्ह्यांमध्ये अधिक जाणवते.
मुंबईसह कोकण आणि खानदेश वगळता मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आकाश केवळ निरभ्रच राहून सध्याची थंडी कायम राहू शकते, असेही खुळे यांनी सांगितले.
सध्या उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होवून गेलेल्या पश्चिमी झंजावातातून तेथे पाऊस, हिमवृष्टी व काही ठिकाणी गारपीट होत आहे. तेथील अश्या ओलसर वातावरणातून तेथे जोरदार थंडीची नोंद गेल्या दिवसात आपण पाहिली आहे.
तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २७० ते ३०० किमी वेगाने प्रवाही झोताचे ' पश्चिमी' वारे अजुनही वाहत आहे. त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजूनही कायम आहे, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मध्य भारतात थंडीबरोबर, विदर्भालगतच्या छत्तीसगड व ओडिशा दरम्यान हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झाले आहे. त्यामुळे घड्याळ काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत असते.
ह्या वाऱ्यांचा वर्तुळाचा परिघ एवढा विस्तारतो, कि, अति बाहेरील क्षेत्र परिघातील हे वारे बंगालच्या उपसागरातही प्रवेशतात. आणि बंगालच्या उपसागरातून हे वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी प्रचंड आर्द्रता उचलून विदर्भ व परिसरात ओतणार आहे.
आता ओतलेल्या ह्या आर्द्रतेचा, उत्तर भारतातून आपल्याकडे सध्या लोटल्या जात असलेल्या उत्तरी थंड वाऱ्यांशी संगम व सरमिसळता होवून, विदर्भात २-३ दिवस गडगडाटीसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यासोबतच हेही लक्षात असु द्या, कि हीच ती वातावरणाची अस्वस्थ अवस्था कि ज्यामुळे गारपीट घडून येत असते. अर्थात सध्या महाराष्ट्रात गारपीटीचे वातावरण नाही, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.