Monsoon Forecast 2025 : आगामी मॉन्सून हंगामात पाऊस चांगला बरसणार; अपेकचा अंदाज

Monsoon Forecast : जुलै ते सप्टेंबर दरम्यान रायलसीमा, दक्षिण कर्नाटका, तमिळनाडू आणि केरळच्या काही भागांत पावसाची कमी शक्यता आहे. तसेच गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागांमध्ये देखील कमी पावसाची शक्यता आहे.
Monsoon 2025
Monsoon 2025Agrowon
Published on
Updated on

Maharashtra Monsoon 2025 : दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं १७ मार्च रोजी पुढील मॉन्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत. परंतु पुढच्या महिन्यात हवामानशास्त्र विभाग मॉन्सूनचा पहिला अंदाज व्यक्त करेल, त्यानंतर मॉन्सूनच्या पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल, असं हवामान अंदाज अभ्यासक सांगतात. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.

अपेक दक्षिण कोरियाचं हवामान केंद्र आहे. प्रत्येक महिन्यात या अपेककडून अंदाज वर्तवला जातो. त्यासाठी ११ देशातील १५ हवामान केंद्राच्या डेटा मॉडेलचा वापर करून एप्रिल ते जुलै दरम्यानचा अंदाज वर्तवला जातो. त्यामध्ये दक्षिण गुजरात, गोवा, किनारी कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तेलंगणा तर महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता अपेकनं वर्तवली आहे.

तर उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांमध्ये पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रात विदर्भ वगळता बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. अर्थात अवकाळी पावसाचा हा अंदाज आहे.

तसेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान रायलसीमा, दक्षिण कर्नाटका, तमिळनाडू आणि केरळच्या काही भागांत पावसाची कमी शक्यता आहे. तसेच गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागांमध्ये देखील कमी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित देशात मात्र सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज अपेकनं दिला आहे. त्यामुळे मॉन्सूनमधील पाऊस शेतकऱ्यांना साथ देईल अशी शक्यता आहे. परंतु महिन्यावार पावसाच्या अंदाजात मात्र अपेकनं पावसाच्या तूटीचेही संकेत दिले आहेत. 

एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज?

एप्रिल महिन्याच्या अंदाजात संपूर्ण वायव्य भारत, पूर्व भारत, पूर्व-मध्य भारत, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर किनारी तामिळनाडूत पावसाची शक्यता कमी आहे. पण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि संपूर्ण कर्नाटक आणि केरळसाठी सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात पावसाची शक्यता अपेकनं वर्तवली आहे.

मे महिन्यात पाऊस कुठे?

मे महिन्यात संपूर्ण राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाची संकेत नाहीत. पण याउलट देशाच्या उर्वरित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर केरळ, कर्नाटक किनारी आणि गोवा येथे जास्त पाऊस पडण्याचा अंदाज अपेकनं व्यक्त केला.

Monsoon 2025
Monsoon 2025: माॅन्सूनचा पाऊस 2025 मध्येही चांगला बरसणार; काही जागतिक हवामान केंद्रांचा अंदाज

मॉन्सूनचं आगमन जोरदार?

जूनमध्ये मॉन्सून हंगाम सुरू होईल. त्यावेळी केरळ आणि शेजारील तामिळनाडूमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर-लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काठावर थोडी तूटीचे संकेत अपेकनं दिले आहेत. परंतु पश्चिम किनारपट्टी, मध्य भारत आणि पूर्व भारतात जोरदार मॉन्सूनचे संकेत आहेत.

जुलै महिन्यात उघडीप?

जुलै महिन्यात चांगला पाऊस पडतो, असं मानलं जातं. जुलै महिन्यात तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि दक्षिण केरळच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. तसेच संपूर्ण गुजरात, नैऋत्य राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज अपेकनं दिला आहे.

ऑगस्टमध्ये पावसाला ब्रेक?

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये सहसा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो. संपूर्ण दक्षिण द्वीपकल्प यामध्ये किनारी तमिळनाडू वगळता, गोवा, संपूर्ण गुजरात आणि लगतच्या नैऋत्य राजस्थानचा समावेश आहे. देशातील उर्वरित भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मॉन्सून शेवटी बरसणार?

मॉन्सूनच्या शेवटच्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यात परिस्थिती अंशतः उलट असते, ज्यामध्ये कर्नाटकचा काही भाग वगळता देशातील बहुतेक भागात सरासरी पाऊस पडू शकतो, जिथे थोडीशी तूट जाणवू शकते. परंतु संपूर्ण गुजरात आणि मध्य भारतात जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज अपेकनं वर्तवला आहे. त्यामुळे आगामी मॉन्सून शेतकऱ्यांना साथ देईल, असा अपेकचा अंदाज आहे.

दरमीन, मागील वर्षी मॉन्सून हंगामात पावसाने चांगली साथ दिली. त्यामुळे आगामी मॉन्सून हंगाम कसा राहील, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. कारण यंदा उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. सध्या राज्यातील धरणात ५२ टक्के पाणीसाठा आहे. परंतु उन्हाळा जसा तीव्र होईल तशी बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढीस लागेल. एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळा अधिकच तीव्र होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मॉन्सूनकडे लक्ष लागून आहे. अर्थात अपेकचा अंदाज हा अंतिम नाही. त्यातून फक्त पुढील संकेत मिळू शकतात. हवामानशास्त्र विभाग पुढच्या महिन्यात मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर करेल. त्यानंतर काहीशी स्पष्टता येऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com