
New Delhi News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ९ टक्के अधिक पाऊस पडला आहे, मात्र हा पाऊस देशभरात सर्वदूर समान प्रमाणात झाला नाही.
भारतीय हवामान विभागाकडील नोंदीनुसार झारखंड, राजस्थान आणि लडाख यांसारख्या काही राज्यात खूप जास्त पाऊस झाला आहे. तर ईशान्य भारत व दक्षिण भारतातील अनेक भागांत पावसाची मोठी कमतरता आहे.
१ जून ते १६ जुलै या कालावधीत देशातील पावसाची सरासरी ३०४.२ मिलिमीटर आहे. प्रत्येक्षात या काळात देशात एकूण ३३१.९ मिमी (९ टक्के अधिक) पाऊस झाला आहे. राजस्थानमध्ये २७१.९ मिमी पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा ११६ टक्के अधिक, झारखंडमध्ये ५९५.८ मिमी सरासरीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तसेच लडाखमध्ये १५.८ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा ९७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. या तीनही राज्यात सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे.
हरियाना, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांसह दादरा-नगर हवेली आणि दीव-दमणमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस, म्हणजेच २० टक्के ते ५९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. यात मध्य प्रदेशामध्ये २८१.३ मिमीच्या तुलनेत ४७०.६ मिमी (६७ टक्के अधिक) पाऊस झाला आहे. तर गुजरातमध्ये ३८८ मिमी (६४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी, सिक्कीमसह अंदमान-निकोबारमध्ये पावसाने सरासरी (कमी किंवा अधिक १९ टक्के) गाठली आहे.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटकचा शिवमोग्गा भाग, पश्चिम बंगाल, गुजरात, हिमाचल प्रदेश राज्यात जोरदार पावसामुळे पुराचा सामना करावा लागला. यातही हिमाचल प्रदेश हे राज्य सर्वाधिक प्रभावित झाले आहे. तेथे मानवी हानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. मंडी जिल्ह्यात भीषण स्थिती असून, या हंगामात पुरामुळे १०५ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मॉन्सूनचा पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे. सुमारे ४२ टक्के लोकसंख्या यावर अवलंबून असून तो देशाच्या एकूण उत्पादनात कृषी क्षेत्राचे योगदान १८ टक्के आहे. शिवाय पावसामुळे जलाशयामध्ये होणारा पाणीसाठा पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे.
जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. यात ९६ ते १०४ टक्के पाऊस ‘सामान्य’ मानला जातो. देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
तर लडाख, हिमाचल प्रदेश लगतची क्षेत्रे, ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशाच्या काही भागांत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, केरळ आणि तमिळनाडूतील काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.