Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतका मध्यम स्वरूपाचा हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग साधारणच राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे हवामान कोरडे राहील. मात्र थंडीची लाट नसेल.
प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागातील पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान काही ठिकाणी २४ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी २९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सुपर एल निनोची शक्यता सध्या तरी नाही. मात्र हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढलेले असून, ते २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामान बदल जाणवत आहेत. त्यातच अरबी समुद्र व हिंदी महासागरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात हवामान बदल दिसून आला. हवामान बदलामुळे पावसाळ्याप्रमाणे ढगाळ हवामान, थंड वारे आणि अल्पशा प्रमाणात हलका पाऊस झाला. यासाठी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागातील तापमान बदल कारणीभूत होते.
सागरी तापमान वाढ त्या अनुषंगाने तयार होणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र त्यातून वाहणारे चक्राकार वारे या मुळे मोठ्या प्रमाणात हवामान बदल होत आहेत. पृथ्वीचा साधारण २/३ भाग समुद्र व सागराने व्यापलेला असून या पुढीला काळात हवामान अंदाज देताना त्याचाही विचार करणे गरजेचे ठरणार आहे.
त्यानुसार या सदरातून समुद्र व सागरी तापमानाची माहिती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. एल-निनोचा प्रभाव सध्या कमी झाल्याने या पुढील उन्हाळी हंगामात अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे तापमान वाढल्यास अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोकण
कमाल तापमान रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.
आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व पालघर जिल्ह्यांत ६० टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ५२ ते ५४ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३४ टक्के, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ४८ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ५० ते ५३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान धाराशिव व बीड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील.
त्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात थंडीच्या प्रमाणात विविधता दिसून येईल. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ५० ते ५१ टक्के तर धाराशिव, बीड, परभणी जिल्ह्यांत ४८ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा धाराशिव जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर बीड, परभणी व संभाजीनगर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. तसेच लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४९ टक्के, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ५१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. आणि दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस इतके समान राहील. आकाश निरभ्र राहील.
सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २७ टक्के इतकी समान राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील.
आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ४१ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४३ ते ४४ टक्के राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २७ टक्के, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २० ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, सांगली व सातारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, सातारा व सोलापूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यांत ४५ टक्के तर पुणे, नगर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ५० ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के, तर सोलापूर, पुणे, नगर व सांगली जिल्ह्यांत २६ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ३ ते ४ किमी, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला
उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारी तीळ, मूग, बाजरी ही पिके घ्यावीत.
पाण्याची सोय असल्यास भुईमूग, सूर्यफूल ही पिके घ्यावीत.
बागायत क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुरू उसाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी.
भाजीपाला पिके, फळबाग रोपवाटिका तसेच फळबागेस गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.
पालवी, मोहोर आणि फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
सध्याच्या वातावरणामुळे कांदा तसेच टोमॅटो पिकावर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन करावे.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.